You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अयोध्या : या तीन मशिदीसुद्धा 'बाबरी' आहेत?
- Author, नितीन श्रीवास्तव
- Role, बीबीसी प्रतिनिधी
उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येत विवादित बाबरी मशिदीचं बांधकाम 1528 मध्ये करण्यात आलं होतं.
रामाच्या जन्मस्थळावरील मंदिर तोडून ही मशीद बांधल्याचा हिंदू संघटनांचा दावा आहे.
पण, मशिदीसंबंधीच्या अभिलेखांनुसार, ही मशीद मुघल शासक बाबर यांचे सेनापती मीर बाकीनं बनवली होती.
1992 मध्ये मशीद पाडण्यात आली, पण या भागात अशा तीन मशिदी आहेत, ज्या बाबर यांच्या काळातल्याच असल्याचं सांगितलं जातं.
यापैकी एक आहे 'मशीद बेगम बालरस'. ही मशीद अयोध्येतील वादग्रस्त जागेपासून थोड्या अंतरावर आहे, तर दुसरी आहे 'मशीद बेगम बलरासपूर', जी फैजाबाद जिल्ह्यातल्या दर्शन नगर भागात आहे.
तिसऱ्या मशिदीचं नाव 'मशीद मुमताज शाह' असं आहे आणि ती लखनौहून फैजाबादल्या जाणाऱ्या मुमताज नगरमध्ये आहे.
आकारानं या तिन्ही मशिदी बाबरीपेक्षा लहान आहेत, पण मी स्वत: बाबरी मशीद अनेकदा पाहिल्यामुळे हे नक्कीच सांगू शकतो की, या मशिदी आणि बाबरी मशिदीमध्ये अनेक साम्यस्थळंही आहेत.
तिन्ही मशिदींवर एकही मिनार नाही. तिन्ही मशिदींवर एक मोठा आणि दोन छोटे घुमट आहेत. असेच घुमट बाबरी मशिदीवर होते.
लखनौमधील इतिहासकार रोहन तकी सांगतात की, या प्रदेशात हिंडल्यावर तुम्हाला अशा अनेक मशिदी मिळतील, ज्या बाबरकालीन आहेत आणि हुबेहूब एकमेकींसारख्या दिसतात.
ते म्हणाले, "मशिदीला मिनार नसणं आणि तीन घुमट असणं, ही सगळ्या मशिदींमध्ये खास असलेली बाब आहे. अवधच्या नवाबांचा कार्यकाळ सुरू होण्याच्या जवळपास 200 वर्षं आधी बांधलेल्या या मशिदी आहेत. दुसरं म्हणजे या भागात तुम्हाला 16 व्या शतकात बांधलेल्या अनेक मशिदी दिसतील. या मशिदींवरील घुमटांची संख्या 1, 3 किंवा 5 अशी आहे. दोन घुमटांची कोणतीही मशीद दिसणार नाही, कारण ती दिल्ली सल्तनतीच्या शैलीनुसार उभारलेली होती."
इतिहासकार आणि जेएनयूतील माजी प्राध्यापक हरबन्स मुखिया यांच्या मते, मुघल शासक बाबर यांनी आपल्या 'बाबरनामा'मध्ये दोनदा अयोध्येला गेल्याचा उल्लेख केला आहे.
त्यांनी म्हटलं, "बाबर दोन दिवस या भागात राहिले होते. कदाचित अवध साम्राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी ते गेले होते. त्यांच्या पुस्तकात ते शिकारीसाठी गेले असल्याचं म्हटलं आहे. या पुस्तकात कोणत्याही मशिदीचा उल्लेख नाही. असं असलं तरी बाबरकालीन काळात बहुतेक मशिदींची रचना एकसारखी होती."
जी बाबरी मशीद पाडण्यात आली ती जौनपूर साम्राज्यामधील वास्तु शैलीवर आधारित होती. जौनपूरमधील अटाला मशिदीला पश्चिमेकडून बघितल्यास ती बाबरी मशिदीसारखीच दिसते.
या तीन मशिदींपैकी दोन मशिदी वाईट स्थितीत आहेत. मुमताज नगरमधील मशिदीला मात्र व्यवस्थित रंगरंगोटी दिसली.
ही मशीद बाबरकालीन असल्याची भावना या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या मनात आहे.
मशीद मुमताज शाहजवळ राहणारे विरेंद्र कुमार सांगतात की, त्यांच्या तीन पिढ्या इथंच राहत आल्या आहेत.
त्यांनी म्हटलं, "मी खूप लहान होतो तेव्हा अयोध्येतील बाबरी मशिदीचा घुमट पाडण्यात आला होता. तेव्हा माझे वडील जिवंत होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं की, बाबरी मशीद आणि आपल्या शेजारील मशीद अगदी एकसारखीच होती, तसंच ही मशीद बाबरीसारखीच बनवण्यात आली होती."
प्रसिद्ध इतिहासकार सतीश चंद्र यांनी त्यांच्या 'मेडिएव्हल इंडिया : फ्रॉम सल्तनत टू द मुघल्स' या पुस्तकात उल्लेख केला आहे की, सुरुवातीच्या काळात मुघल शासक आणि त्यांच्या सुभेदारांनी ज्या वास्तुकलांचा वापर केला, त्या एकसारखच होत्या. याची सुरुवात बाबर यांच्या काळापासून झाली होती आणि मशिदीपासून मुघलसरायपर्यंत सगळ्या गोष्टी एकमेकांशी जुळत होत्या.
मात्र तरीही अयोध्या-फैजाबादजवळ बनलेल्या या तीन छोट्या मशिदींमध्ये असा कोणताही पुरावा मिळाला नाही, ज्यात या मशिदी कुणी आणि कधी बनवल्या होत्या, याचा उल्लेख असेल.
पण, रोहन तकी यांच्या मते, या मशिदीसाठी वापरला जाणारा चुना, माती याच्या अभ्यासातून मशीद कधी बांधली गेली याचा अंदाज लावता येऊ शकतो.
त्यांनी सांगितलं, "बाबरचे सेनापती मीर बाकी यांनी या मशिदी अत्यंत घाईघाईनं बनवल्या असाव्यात. कारण जिथं जिथं त्यांची फौज थांबायची, तिथं हजारो लोक काही दिवसांसाठी थांबत असत. त्यामुळे मग प्रार्थनेसाठी जागा गरजेची असे आणि घाईघाईत मशिदींची निर्मिती केली जायची. फैजाबाद ते जौनपूर दरम्यान अशा अनेक मशिदी सापडतील ज्यामध्ये आत जाण्यासाठी एक छोटासा दरवाजा असायचा आणि मागच्या भागात एकही रस्ता बनवलेला नसायचा."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)