सिन्नरमध्ये शिवसेनेचे 5 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला, दोन्ही पक्षात पुन्हा ठिणगी?

    • Author, प्रवीण ठाकरे
    • Role, बीबीसी मराठी

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी बंडखोरी केली आहे.

आता हे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागल्यानं शिवसेनेला राजकीय धक्का बसला आहे.

यापूर्वी पारनेर इथल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनीही बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाल्यामुळे हे प्रकरण बरंच तापलं होतं.

त्यानंतर या नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता.

या प्रकरणाविषयी बोलताना अजित पवारांनी म्हटलं होतं, "आमचं महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळे फोडाफोडीचं राजकारण करायचं नाही, हे ठरलं आहे."

असं असतानाही आता सिन्नरमध्ये बंडखोरीचं प्रकरण समोर आलं आहे.

सिन्नरचं प्रकरण काय?

बुधवारी (29 जुलै) सिन्नरचे उपनगराध्यक्ष गोविंद कोंबडे यांच्या राजीनाम्यानं रिक्त झालेल्या जागेवर ऑनलाईन पद्धतीनं निवडणूक पार पडली.

सिन्नर नगरपालिकेत एकूण 29 नगरसेवक असून स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे समर्थक यांच्यासहित 10 नगरसेवक आहेत. माणिकरान कोकाटे आधी भाजपमध्ये होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले आहेत. तर सत्ताधारी शिवसेनेचे अपक्षसहित 19 नगरसेवक आहेत.

शिवसेनेनं उपनगराध्यक्षपदासाठी अपक्ष असलेल्या प्रणाली गोळेसर यांना उमेदवारी दिल्यानं शिवसेनेतील अंतर्गत खदखद वाढल्यानं शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे.

शिवसेनेचे गटनेते हेमंत वाजे यांनी निवडणुकीपूर्वी 19 नगरसेवकांना व्हॉट्स अॅप आणि व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकृत व्हीप बजावला होता.

मात्र अचानक सेनेच्या 5 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्कात येऊन शिवसेना बंडखोर उमेदवार बाळासाहेब उगले यांना उमेदवारी जाहीर केली.

त्यानंतर भाजपच्या कोकाटे समर्थक नगरसेवकांनी उगले यांना मतदान केल्याने सेनेच्या अधिकृत उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव झाला.

यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे आणि शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यात गेल्या 10 वर्षांपेक्षा जास्त काळापासून असलेला राजकीय वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

"शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांना सत्ता सांभाळता येत नसून नगरपालिकेच्या कामकाजात प्रचंड अनागोंदी कारभार आहे शिवाय भ्रष्टाचार वाढला आहे. ठरावीक नगरसेवक इतर नगरसेवकांना विश्वासात घेत नसल्याने शिवसेनेच्या 5 नगरसेवकांची नाराजी होती. ते स्वतःहून माझ्याकडे आले होते. आम्ही शिवसेनेचाच उमेदवार निवडून आणल्याने महाविकास आघाडीचा धर्म आम्ही पाळला आहे," आमदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितलंय.

30 जुलै रोजी दुपारी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर यांनी सिन्नरमध्ये जाऊन नगरसेवकांची बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमामनशी बोलताना राष्ट्रवादीला आघाडी धर्माची आठवण करून दिली होती.

"स्थानिक राष्ट्रवादी आमदारांनी आमच्या नगरसेवकांना फूस लावणे योग्य नाही, असेही त्या पदाला जास्त महत्त्व नाही, आम्ही याला शिवसेना स्टाईलने उत्तर देऊच. पण जे अमिषाला बळी पडले अशा लोकांवर कारवाई होईलच," असं ते म्हणाले होते.

कुणालाही पक्षात घेतलेलं नाही - भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रसचे नेते छगन भुजबळ यांनी याबाबत बीबीसी मराठीला प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, "माझ्या माहितीनुसार सिन्नर उपनगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेने ऐनवेळी अपक्ष असलेला उमेदवार दिला. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक नाराज होते. त्यावेळी राष्ट्रवादी शिवसेनेबरोबरच होती. शिवसेनेचा हा त्यांचा अंतर्गत वाद होता. आम्ही कुणालाही पक्षात घेतलेलं नाही, हा स्थानिक पातळीवरचा वाद आहे. निवडून आलेला उमेदवार हा शिवसेनेचा आहे, कुणीही पक्षातर केलेलं नाही. शिवसेनेनं ऐनवेळी अपक्ष उमेदवार दिला त्यामुळे शिवसेनेतले स्थानिक पातळीवरील हेवेदावे बाहेर आले आणि अजून एक उमेदवार दिला गेला."

सर्व आरोप चुकीचे - कोकाटे

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे यांनी सर्व आरोप आणि शक्यता फेटाळून लावल्या आहेत.

"आम्ही कोणताही पक्ष फोडला नाही किंवा नगरसेवकांना फूस लावलेली नाही. निवडून आलेला उमेदवार हा शिवसेनेचाच आहे. त्यालाच राष्ट्रवादीने मदत केली आहे. त्यामुळे महाआघाडीमध्ये मतभेद असल्याचे सर्व आरोप चुकीचे आहेत," असं त्यांनी म्हटलं आहे

"स्थानिक भाजपचे नगरसेवक हे माझ्याच गटातले आहेत त्यामुळे त्यांनीही आम्हाला मदत केली. मी मुंबईत होतो त्यावेळी शिवसेनेच्या नागरसेवकांचा फोन आला की मदत हवीय, त्यानुसार मी मदत केली. शिवसेनेत अंतर्गत कलह आहे."

शिवसेनेचे वरिष्ठ अंधारात?

शिवसेनाचे नाशिक संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी मात्र या सर्व प्रकारापासून अनभिज्ञ होते, असा त्याचा दावा आहे.

"मला आजच याविषयी समजले आहे. जिल्हाध्यक्ष आज सिन्नरला गेले आहेत. त्यांनी बैठक घेतली असून झालेल्या घटनेबाबत अहवाल ते पाठवतील. त्यानुसार पक्ष शिस्तीनुसार आम्ही कारवाई करू," असं त्यांनी म्हटलंय.

"राष्ट्रवादीनं असं नको करायला होतं. याची तक्रार वरिष्ठ पातळीवर नक्कीच करणार. 5 नगरसेवक नाराज होते त्यामुळे हे घडले. सिन्नरच्या नगरसेवकांनी आपआपसांत दिलेले शब्द पळाले नाहीत त्यामुळे नाराजीनाट्य घडलं असावं. तिथं राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे आणि शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे हे परस्पर विरोधात निवडणूक लढलेले आहेत. त्यामुळे वाद असणार तरीही स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीने असं करणं अपेक्षित नव्हतं. आम्ही वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवू," असं चौधरी यांनी सांगितलं आहे.

हा सर्व वाद स्थानिक पातळीवरचा आहे, असं राजकीय विश्लेषक आणि दैनिक सकाळच्या उत्तर महाराष्ट्र अवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांना वाटतं.

"सिन्नरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे आणि शिवसेनेचे माजी आमदार राजभाऊ वाजे हे पारंपरिक राजकीय शत्रू आहेत. माणिकराव कोकाटे हे आता आमदार असल्याने त्यांनी आपल्या गटाचा उमेदवार निवडून आणून एकप्रकारे वाजे गटाला शाह द्यायचा प्रयत्न केला आहे," असं माने सांगतात.

"कोकाटे हे पहिले काँग्रेस आणि शिवसेनेतही होते. त्यामुळे शिवसेनेत त्यांच्या गटातले लोक आहेत. वाजे गटाची सत्ता सिन्नरला आहे आणि त्यांच्यातील अंतर्गत कलह हा स्थानिक पातळीवरचा आहे.

त्यामुळे यामध्ये आघाडी धर्म किंवा वरच्या पातळीवर दाखल घ्यावी असं काही नाहीये. शेवटी नगरपरिषदेत उपाध्यक्षपदाला तितकसं महत्त्व नाहीये. राज्य पातळीवर याची कुणी दाखल घेईल असे वाटत नाही. शिवसेना त्यांच्या नगरसेवकांवर कारवाई करू शकते, पण हा स्थानिक वाद आहे. त्यामुळे राज्य पातळीवर काही फरक पडणार नाही," असं माने यांना वाटतं.

दरम्यान राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असली तरीही स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीतील नेत्यांचं राजकीय गणित जुळताना दिसत नाहीये.

याधीही पारनेरमध्ये असंच प्रकरण घडलं होतं.

पारनेर नगर पंचायतीच्या निवडणुकीला 3 महिने असताना 5 शिवसेना नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये या नगरसेकांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमचा विरोध स्थानिक माजी आमदारांना आहे उद्धव ठाकरेंना नाही, असं त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं होतं.

काही दिवसांनी पारनेर प्रकरणी बोलताना अजित पवार यांनी म्हटलं, "ते नगरसेवक भाजपमध्ये चालले होते, असं मला सांगण्यात आलं. पण, नंतर कळालं की ते शिवसेनेचे नगरसेवक आहेत. आमचं महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळे फोडाफोडीचं राजकारण करायचं नाही, हे ठरलं आहे. त्यामुळे मी त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांचे प्रश्न सोडवू असं म्हटलं."

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हे नगरसेवक शिवसेनेत परतले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)