जयललिता यांच्याजवळ किती सोनं, चांदी, साड्या, एसी होते तुम्हाला माहीत आहे का?

तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या बंगल्यात 4 किलो सोनं, 601 किलो चांदी आणि 8376 पुस्तकं असल्याची माहिती तामिळनाडू सरकारने दिली आहे.

5 डिसेंबर 2016 रोजी तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जे जयललिता यांचं आजाराने निधन झालं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर तामिळी जनतेसाठी त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांनी मिळवलेलं यश लोकांपुढे यावं, यासाठी त्यांच्या बंगल्याचं स्मारकात रुपांतर करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला.

स्मारक उभारणीसाठीचा अध्यादेश तामिळनाडू सरकारने काढला आहे. त्यानुसार जमीन आणि बंगला अधिग्रहणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता चेन्नईतल्या पोएस गार्डन भागातल्या 'वेद निलायम' घरात रहायच्या.

स्मारक उभारणीसंदर्भात काढलेल्या अध्यादेशात बंगल्यातल्या सर्व वस्तूंची यादीही देण्यात आली आहे.

या यादीनुसार जयललिता यांच्या घरी सोन्याच्या 14 वस्तू आहेत. त्यांचं एकूण वजन 4 किलो 372 ग्रॅम आहे. तर 867 चांदीच्या वस्तू आहेत. चांदीच्या वस्तूंचं एकूण वजन 601 किलो 424 ग्रॅम इतकं आहे. 162 चांदीची भांडीही आहेत.

याशिवाय जयललिता यांच्या घरी 11 टिव्ही, 10 फ्रिज, 38 एअर कंडिशनर्स, 556 फर्निचर, 6514 स्वयंपाकघरातली भांडी, 1055 शोभेच्या कटलरी वस्तू, 15 पूजेची भांडी, 10438 कपडे (यात घालायचे कपडे, चादरी, अभ्रे, पडदे यांचाही समावेश आहे.), 29 टेलिफोन आणि मोबाईल फोन, 8376 पुस्तकं आणि 6 घड्याळं आहेत. याशिवाय 65 सूटकेस, 108 सौंदर्य प्रसाधनं, 1 झेरॉक्स मशीन आणि 1 प्रिंटरही आहे.

17 ऑगस्ट 2017 रोजी तामिळनाडू सरकारने दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या बंगल्याचं स्मारकात रुपांतर करण्याची घोषणा केली होती. हे स्मारक सर्वांसाठी खुलं असणार आहे.

त्यानंतर प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झाली. जयललिता यांचा कुणीही उत्तराधिकारी नाही. त्यामुळे बंगला आणि बंगल्यातल्या वस्तू गेल्या तीन वर्षांपासून देखभाली अभावी पडून आहेत. त्या खराब होऊ नये, यासाठी अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंगला राज्य सरकारला तात्पुरता हस्तांतरित करण्यात आला आहे.

जमीन आणि बंगल्याच्या अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकार पुरात्ची थलायवी डॉ. जे. जयललिता मेमोरियल फाऊंडेशनची स्थापना करेल आणि जमीन आणि बंगला या फाउंडेशनला सुपूर्द करण्यात येईल. त्यानंतर स्मारक उभारणीचं काम सुरू होईल.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माहिती आणि प्रसिद्धी मंत्री, अर्थ सचिव, तामिळ विकास आणि प्रसिद्धी विभागाचे सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे चीफ इंजीनिअर, पुरानवस्तू संग्रहालयाचे संचालक आणि इतर 4 नामनिर्देशित सदस्य या फाऊंडेशनचे सदस्य असतील. मुख्यमंत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष असतील. तर उप-सचिव दर्जाचे अधिकारी स्मारक बांधकामाच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवतील.

बंगल्याचं स्मारकात रुपांतर करण्यासाठीचा कृती आराखडा तयार करून तो सरकारकडून मंजूर करून स्मारकाचं बांधकाम सुरू करण्याची जबाबदारीही या फाऊंडेशनचीच असेल. बंगला आणि तिथल्या वस्तूंची देखभाल आणि दुरुस्ती करणं, चोरी, आग लागणे किंवा इतर कुणल्याही आपत्तीपासून घराचं आणि घरातल्या वस्तूंचं रक्षण करणं, ही या फाउंडेशनची जबाबदारी असेल.

घरासाठीची रक्कम राज्य सरकारने यापूर्वीच दिवाणी न्यायालयात भरली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)