शिवराज सिंह चौहानः मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांनीच त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली.

शिवराजसिंह चौहान यांनी ट्विटरवरून माहिती दिली की, "माझ्या प्रिय मध्य प्रदेशावासियांनो, मला कोव्हिड-19 ची लक्षणं दिसत होती. चाचणीनंतर माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझ्या सपंर्कात आलेल्या सर्व सहकाऱ्यांना चाचणी करण्यास मी सांगितलं आहे. माझ्या अत्यंत जवळ राहिलेल्या लोकांनी क्वारंटाईन व्हावं."

"मी कोव्हिड-19 च्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करतोय. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वत:ला क्वारंटाईन करेन. मध्य प्रदेशातील जनतेला आवाहन करतो की, त्यांनी काळजी घ्यावी. कोरोनापासून वाचण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, विविध विषयांसाठी लोक भेटत होतेच," असंही चौहान यांनी पुढे सांगितलं.

25 मार्चपासून मध्य प्रदेशातील कोरोनाच्या स्थितीसाठी रोज संध्याकाळी शिवराजसिंह चौहान बैठक घेत असत. त्यांनीच याबाबत माहिती दिली.आता ही बैठक मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, नगरविकास आणि प्रशासन मंत्री भूपेंद्र सिंग, आरोग्यशिक्षण मंत्री विश्वास सारंग आणि आरोग्य मंत्री डॉ. प्रभूराम चौधरी यांच्या उपस्थितीत होईल.शक्य झाल्यास व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपणही या बैठकीला उपस्थित राहू, असं शिवराजसिंह चौहान यांनी ट्विटरवरून सांगितलं आहे.

शिवराजसिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाल्यानं, मुख्यमंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीला भारतात पहिल्यांदाच कोरोनानं गाठलं आहे.

महाराष्ट्रात जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे आणि अशोक चव्हाण यांसारखे कॅबिनेट मंत्री कोरोनावर मात करून घरी परतले आहेत, तर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हेही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं आता उपचार घेत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)