तुकाराम मुंढे : ...अन्यथा नागपूरमध्ये कर्फ्यू लावावा लागेल

तुकाराम मुंडे

फोटो स्रोत, IASTukaram Mundhe

फोटो कॅप्शन, तुकाराम मुंढे
    • Author, प्रवीण मुधोळकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने दिलेले नियम पाळणं अत्यावश्यक आहे. या नियमांचं पालन झालं नाही तर पुन्हा लॉकडाऊन लागू करावं लागेल असा इशारा नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

गुरुवारी झालेल्या फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. मुंढे यांनी मराठी आणि हिंदीतून लोकांशी संवाद साधला.

ते पुढे म्हणाले, "दीड महिन्यानंतर पुन्हा लॉकडाऊनवर बोलायची वेळ आली आहे. स्थिती खराब होत चालली आहे. आपण निवडलेला मार्ग योग्य आहे का हे तपासण्याची वेळ आली आहे. शहरासाठी योग्य काय ते आपण निवडू. आकडेवारी पाहिली ३ जून नंतरची, आधीचं तर नागपूरमध्ये ४०० केसेस होत्या, आज २४०० पेक्षा केसेस आहेत. प्रति १०० केसेस मृत्यूदर एक टक्क्यापेक्षा खाली होता तो १.५६ एवढा झाला आहे. केसेस कमी होणं, मृत्यूदर कमीत कमी करणं हे आपलं उद्दिष्ट आहे."

कोरोना
लाईन

४५ दिवसानंतर मिशन बिगिन नंतर मृत्यूदर तीन पटींनी वाढला आहे. ही चिंताजनक गोष्ट आहे. हे रोखण्यासाठी राहणीमान बदल करण्यासाठी आवश्यक. राहणं-खाणंपिणं-भेटणं यात बदल करायला हवा. कोव्हिडनुरुप जगायला हवं, असं मुंढे म्हणाले

"मिशन बिगिन सुरू झालं, लोकांनी बदल अंगीकारलेले नाहीत. इन्फेक्शन रेट वाढलेला आहे. नियमावली आहे त्याचं पालन झालेलं नाही. ४५ दिवसात २००० पेक्षा जास्त केस. आपण कुठेतरी चुकतोय हे बघायला हवं. नियम परिपूर्ण पद्धतीने पाळले जात नाहीत. लॉकडाऊन लावायचं का कर्फ्यू लावायचं ही वेळ आली आहे, असा इशारा मुंढे यांनी दिला आहे.

"हे आपल्याला नको असेल तर वागण्यात बदल करायला हवेत. आपल्या जगण्यात बदल घडायला हवा. तसं झालं नाही तर लॉकडाऊन लावायला लागेल. कर्फ्यू लावावा लागेल," असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

लॉकडाऊनला महापौरांचा विरोध

नागपूर शहरातील कोरोनाचे वाढते रुग्ण ही चिंतेची बाब आहे. मात्र लॉकडाऊन हा त्यावर पर्याय असू शकत नाही. लॉकडाऊन सामान्य नागरिकांसाठी आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडणारा ठरेल. त्यामुळे लॉकडाऊन घोषित करताना शंभर वेळा विचार करावा, असं महापौर संदीप जोशी यांनी म्हटलं आहे.

लॉकडाऊन केला अथवा कर्फ्यु लावला म्हणजे रुग्णसंख्या कमी होईल, हे १०० टक्के खरे नाही. कोरोनावर विजय मिळविण्यासाठी लॉकडाऊन हा १०० टक्के उपाय नाही. दुर्दैवाने ही संख्या वाढत असेल तर तुम्ही, आम्ही, व्यापारी आणि सर्वांनाच एकत्रितपणे, संघटितपणे कार्य करणे गरजेचे आहे, असं महापौर संदीप जोशींचं म्हणणं आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा विरोध

आयुक्त मुंढे यांच्या या पावलाला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी विरोध दर्शविला आहे.

लॉकडऊनचा हा निर्णय महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एकट्यानेच घेतला, असा अंदाज प्रशासनातून व्यक्त केला जात आहे.

पाच दिवसांअगोदर गृहमंत्री अनिल देशमुख आणि पालकमंत्री नितीन राऊत यांनी बैठक घेऊन लॉकडाऊनचा निर्णय अधिकाऱ्यांनी एकत्र बसून चार ते पाच दिवसांचा वेळ देऊन करावा अशी सूचना केली होती.

पण पाच दिवस उलटूनही महापालिका आयुक्त यांनी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे आणि पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांच्यासोबत कुठलीही बैठक झाली नाही. शिवाय जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी खरिपाचा काळ असल्याने शेतकऱ्यांना लॉकडाऊनमुळे अडचण होईल अशी भूमिका घेतल्याने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एकट्यानेच लॉकडाऊन करण्याबाबत तयारी केल्याचं बोललं जातंय.

नागपुरातील कोरोनाची सध्याची स्थिती काय?

नागपुरात गेल्या दोन दिवसांपासून दररोज शंभरावर कोरोनाचे पॉझिटिव्ह पेशंट आढळत आहेत. लॉकडाऊनच्या काळात नागपुरातील कोरानाची स्थिती इतर शहरांच्या तुलनेत नियंत्रणात होती. पण 3 जूनला सुरु झालेल्या अनलॉक 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत देण्यात आलेल्या सवलतींमुळे स्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेल्याचं चित्र आहे.

अनलॉक नंतरच्या कोरोनाबाधित आणि रुग्णांच्या मृत्यू संख्येची आधीच्या लॉकडाऊनसोबत जर तुलना केली तर त्यात मोठी तफावत आहे.

तुकाराम मुंढे

फोटो स्रोत, BBC/Praveen Mudholkar

फोटो कॅप्शन, तुकाराम मुंढे

3 जून पूर्वी कोरोनामुळे नागपूर शहरात फक्त 11 जणांचा मृत्यू झाला होता, तर 400 च्या जवळपास पॉझिटीव्ह रुग्ण होते. आता अनलॉकमध्ये कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा 37 तर कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 293 एवढा पोहोचला आहे.

नागरिकांच्या प्रतिक्रिया काय ?

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी फक्त लॉकडाऊन हा एकमेव उपाय नाही, असं महापालिकेनं वेळोवेळी जाहीर केलं असतानाही पुन्हा लॉकडाऊनचे संकेत महापालिका आयुक्तांनी दिल्याने लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काही नागरिकांनी सध्याच्या अनलॉकमधील सोयीचा गैरफायदा घेणाऱ्यांवर लॉकडाऊन हाच उपाय असल्याचं सांगितलं आहे. तर काही नागरिकांनी लॉकडाऊन करून गरिबांचे कसे होणार असा प्रश्न विचारला आहे.

ज्येष्ठ पत्रकार श्याम पांढरीपांडे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "लॉकडाऊनमुळे हजारो लोकांवर उपाशी मरायची पाळी येईल त्याचं काय? हे महापालिका आयुक्तांना विचारले पाहिजे. सर्व लोकांनी कायम मास्क लावावा आणि गर्दी करू नये हे सांगण्यासाठी लॉकडाऊनची गरज नाही. दुकाने दिवसभर उघडी राहू देणे हा गर्दी टाळण्याचा उपाय आहे. वस्तू विकत घेऊन झाल्यावर कोणी एक तास तिथे उगाच उभं राहणार आहे का? त्यामुळे लॉकडाऊन हा एकमेव उपाय वाटत नाही."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)