बारावी निकाल : बोर्डाच्या विद्यार्थ्यांना आजकाल एवढे टक्के कसे काय मिळतात?

मुली

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

"आपल्या काळात का नाही मिळाले आपल्याला 90 टक्के गुण? तेव्हा तर 80 टक्क्यांच्या घरात असलेला विद्यार्थी बोर्डात यायचा. त्याकाळी आम्ही फर्स्ट क्लास मिळवला हेच खूप होतं. मी त्याकाळी बोर्डाची परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास झालो, हे आजही मी अभिमानाने सांगू शकतो."

बारावी बोर्डाचे निकाल जाहीर व्हायला सुरुवात झाल्यानंतर अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिसू लागल्या. साधारण 7-8 वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या कुणाच्याही दहावी, बारावीच्या बॅचमध्ये इतक्या संख्येनं विद्यार्थ्यांना 90 टक्के गुण का मिळत नव्हते? असा प्रश्न आपल्याला अगदी सहज पडतो. याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

"मला दहावीच्या परीक्षेत 95.6 टक्के गुण मिळाले होते. मला प्रचंड आनंद झाला होता. माझ्या आई-बाबांनीही. माझे खूप कौतुक केले. पण, मग बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर मला 76 टक्के गुण मिळाले. बारावीत अभ्यासाचा आकार जास्त असल्याने गुण थोडे कमी होतात याची कल्पना मला होती. पण इतके कमी होतील याचा अंदाज नव्हता."

ही प्रतिक्रिया आहे पुण्याच्या फर्ग्यूसन महाविद्यालयात बीएससीच्या तिसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या अगस्ती चासकर या विद्यार्थ्यांची.

2015 ला तो दहावी पास झाला आणि 2017 ला बारावी. त्याच्या मते, "शिक्षण व्यवस्थेनं माझी एकप्रकारे फसवणूक केली आहे. केवळ माझी नाही तर माझ्यासारख्या हजारो,लाखो विद्यार्थ्यांची ही फसवणूकच आहे."

कोरोना
लाईन

90 टक्क्यांचे सिक्रेट काय आहे?

सहा विषयांपैकी ज्या पाच विषयांना उत्तम मार्क मिळालेत, त्यांच्या बेरजेला पाचाने भागून गुणांची टक्केवारी काढली जाते. सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशातील सरशी पाहता आघाडी सरकारच्या काळात 'बेस्ट ऑफ फाईव्ह' हे पॅटर्न लागू करण्यात आले.

शिवाय, पूर्वीप्रमाणे आता बोर्डाच्या सर्व विषयात केवळ लेखी परीक्षेच्या आधारे गुण दिले जात नाहीत, तर प्रत्येक विषयासाठी 20 गुणांची तोंडी परीक्षा घेतली जाते.

विद्यार्थिनी

फोटो स्रोत, Getty Images

याविषयी बोलताना शिक्षक भाऊसाहेब चासकर सांगतात, "आता स्टेट बोर्डातही प्रत्येक विषयाचे अंतर्गत मूल्यमापनाचे 20 टक्के गुण शाळांच्या हातात असतात. शाळेत विज्ञानाची धड प्रयोगशाळा नसली, तरी विज्ञानात प्रात्यक्षिक परीक्षेत जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेले पाहून ही किमया नेमकी कशाची, याचे राहून राहून नवल वाटत राहते."

शाळांमध्येच शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना गुणांची खैरात वाटण्यात येते असं खुद्द शिक्षकच सांगतात. "ज्याची पात्रता 20 गुण मिळवण्याचीही नसते, त्याला हे गुण सहज मिळतात. तोंडी परीक्षेला कोणते प्रश्न विचारण्यात येतील याचीही साधारण कल्पना मुलांना असते. त्याचा रट्टा मारला की शिक्षक गुण देतात," मुंबईतल्या शाळेचे शिक्षक विलास परब सांगतात.

शिक्षण व्यवस्थेकडून विद्यार्थ्यांची फसवणूक होत आहे का?

'काबिल बनो कामयाबी अपने आप तुम्हारे पीछे आएगी' 3 इडियट्स सिनेमातल्या या डायलॉगची आठवणही या निमित्ताने होते. आपल्या शिक्षण पद्धतीत आजही काही चुकतंय का? गुणांचा हा फुगवटा आहे का? या शिक्षण पद्धतीमुळे खरंच मुलं सक्षम बनत आहे की केवळ पाठांतर सुरू आहे? की खरंच गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांना हे मार्क मिळतायत?

"आम्हाला मिळत असलेले 90 - 98 टक्के गुण हे गुणवत्तेच्या आधारावर मिळत आहेत, असंच आम्हाला वाटते. मग बारावी आणि त्यापुढील प्रवेश परीक्षांमध्ये असा काय बदल होतो की विद्यार्थ्यांच्या हाती निराशा येते?" असाही प्रश्न बारावीत JEE,NEET यांसारख्या परीक्षेत अपेक्षित स्कोअर करता न आलेले विद्यार्थी विचारतात.

विद्यार्थी

फोटो स्रोत, Getty Images

"दहावी बोर्डाच्या परीक्षेत पाठांतराच्या आधारावर आम्ही मार्क मिळवतो. बारावी परीक्षेनंतर प्रवेश परीक्षांमध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न अधिक असतात. त्यामुळे जर आम्हाला संकल्पना कळाल्या असतील, विषय समजला असेल तर त्यात आम्ही स्कोअर करू शकतो," असं मत प्रतिक झगडे या विद्यार्थ्याने बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केले.

शिक्षण तज्ज्ञांच्या मते, दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत भरघोस मार्क मिळाले याचा अर्थ JEE, NEET अशा प्रवेश परीक्षेत तितकेच चांगले मार्क मिळतील असे नाही.

"JEE,NEET या परीक्षांचे स्वरुप वेगळे आहे. हा रस्ता विद्यार्थ्यांसाठी अनोळखी आहे. अनोळखी रस्त्याने जाताना आपल्यालाही वेळ लागतो. त्यामुळे प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी वेगळी तयारी करावी," असं मत शिक्षणतज्ज्ञ वसंत काळपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केले.

CBSE आणि SSC बोर्डामध्ये स्पर्धा?

गेल्या काही वर्षात CBSE शाळांची संख्या शहरांपासून ते अगदी ग्रामीण भागातही झपाट्यानं वाढली. त्यामुळे राज्य शिक्षण बोर्डाच्या (SSC) बोर्डाच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी झाली.

CBSE शाळांच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना नव्वदीपार मिळणाऱ्या गुणांमुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेत SSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, अशी भावना बोर्ड आणि शिक्षकांमध्ये कालांतरानं रुजू झाली.

याविषयी बोलताना बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि शिक्षणतज्ज्ञ वसंत काळपांडे यांनी सांगितले, "बोर्डांमध्ये स्पर्धा आहे हे सत्य नाकारता येणार नाही. अकरावीमध्ये आपल्या मुलांना चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा असंच शिक्षकांनाही वाटते. मग आपल्या मुलांना संधी मिळायला हवी या हेतूने स्पर्धा सुरू झाली."

विद्यार्थी

फोटो स्रोत, Getty Images

1970, 1980 अगदी 90 च्या दशकातही 70-85 टक्के गुण मिळवणं म्हणजे त्या विद्यार्थ्यांची मिरवणूक काढली जायची. "कारण पूर्ण गुण द्यायचे नाहीत. अशी भावना त्यावेळी शिक्षकांची होती," असंही वसंत काळपांडे यांनी सांगितले.

आता 90 टक्के मिळाले तरी अनेकदा पालक आपल्या मुलांच्या निकालावर समाधानी नसतात, असं चित्र दिसते.

"यासाठी जर सीबीएसईचे स्वत:चे कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले आणि त्या त्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश मिळू लागले तर ही स्पर्धा कमी होईल. सरकारने असा काही कायदा आणता येईल का याचाही विचार करायला हवा," असा सल्लाही वसंत काळपांडे यांनी दिला.

मुल्यांकन पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज?

"ही खरी गुणवत्ता आहे का? तर नाही. कारण ही शिक्षण व्यवस्थेने केलेली सोय आहे. मार्क देताना तटस्थपणे विचार केला जात नाही. त्यामुळे पात्रता नसतानाही विद्यार्थ्यांना मार्क मिळत आहेत," असं मत शिक्षक विलास परब यांनी व्यक्त केले.

हे प्रश्न केवळ एक शिक्षक नाही तर असे अनेक शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि पालकही उपस्थित करत आहेत. वर्षानुवर्ष ठरलेले प्रश्न, उत्तर लिहिण्याची ठरलेली पद्धत, कोचिंग क्लासकडून एका ठराविक पॅटर्नमध्ये विद्यार्थ्यांकडून करवून घेतली जाणारी तयारी, अशा सर्व बाबींचा परिणाम आपल्याला निकालामध्ये दिसतो.

"अपेक्षित प्रश्नांची अपेक्षित उत्तरे दिली की गुण मिळतात. हे शास्त्र कोचिंग क्लासकडून विद्यार्थ्यांनी चांगलंच शिकून घेतलंय. हा 'फॉर्म्युला' वापरला की गुण मिळणार हे विद्यार्थ्यांनाही कळून चुकलंय," असं भाऊसाहेब चासकर सांगतात.

विद्यार्थिनी

शिक्षकांच्याही हे लक्षात येतंय. ही मुल्यांकन पद्धती बदलण्याची गरज आहे असं मत शिक्षकांनीही व्यक्त केलंय. पण त्यासाठी राज्य सरकारचा शिक्षण विभागा, राज्य शिक्षण मंडळांकडूनही प्रयत्न होणं अपेक्षित आहे. पाठांतरापेक्षा आकलनावर अधिक भर देणारी शालेय शिक्षण व्यवस्था अस्तित्वात आली, की यातले अनेक प्रश्न मार्गी लागतील असंही शिक्षकांना वाटतं.

बेस्ट ऑफ फाईव्ह, तोंडी परीक्षेचे मार्क किंवा लेखी परीक्षेचे मार्क विद्यार्थ्याला त्याच्या आकलन क्षमतेवर कितीही जास्त मार्क मिळाले तरी त्याला कुणाचीही हरकत नाहीय. पण जर हे मार्क गुणवत्तेच्या आधारे न मिळता केवळ मुल्यांकन पद्धतीच्या आधारावर मिळत असतील तर ही विद्यार्थ्यांचीही फसवणूक नाही का?

विद्यार्थिनी

फोटो स्रोत, Getty Images

शिक्षणाचा बाजार

महाराष्ट्रात घरोघरी कोचिंग क्लासचे फॅड आहे हे उघड आहे. कोचिंग क्लासची एकमेकांसोबत असलेली स्पर्धा आपल्याला नाक्यानाक्यावर लावलेल्या जाहिरातींच्या फ्लेक्सवरुनही लक्षात येते. आमच्या कोचिंगच्या अमुक इतक्या विद्यार्थ्यांनी 95 टक्के मिळवले असे फ्लेक्स विद्यार्थ्यांच्या फोटोसहीत लावलेले असतात.

आता तर दहावीनंतर कनिष्ठ महाविद्यालयांना जोडलेले कोचिंग क्लास सुरू झालेत. विद्यार्थ्यांना JEE,NEET,CET या परीक्षांची तयारी करण्यासाठी महाविद्यालयात न जाता मुलं थेट कोचिंग क्लासला हजेरी लावत आहेत.

वसंत काळपांडे सांगतात, "कोचिंग क्लासवर पालकांचा प्रचंड विश्वास आहे. शाळांपेक्षा अधिक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या क्लासेसच्या माध्यमातून शिक्षणाचाही बाजार झालाय. हुशार विद्यार्थी कोचिंग क्लासकडे वळले पाहिजेत असाही प्रयत्न कोचिंग क्लासकडून केला जातो."

केवळ कोचिंग क्लासच नव्हे तर खासगी शाळाही या स्पर्धेत मागे नाहीत. आपल्या शाळेचे अधिकाधिक विद्यार्थी 90 टक्क्यांच्या रांगेत आले पाहिजेत असा प्रयत्न शाळांकडूनही होताना दिसतो.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)