शरद पवार: 'उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत शिवसेनेची आहे, आदेश आल्यानंतर चर्चा होत नाही'

अशोक चव्हाण, उद्धव ठाकरे, शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

"सध्याचं सरकार हे तीन पक्षांचं आहे. त्यामुळे आम्हा दोघांची जी मतं आहेत, ती जाणून घेण्याचाही प्रयत्न व्हावा. म्हणून आमची एक सूचना असते, की आपण चर्चा करूया. संसदीय लोकशाहीमध्ये संवादाला महत्त्व आहे. ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीत आम्हाला काही उणं दिसत नाही, फक्त संवाद हवा," असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. तीन भागात घेतलेल्या या मुलाखतीत शरद पवार यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं आहे.

काँग्रेसचे नेते सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची तसंच सरकारमध्ये राष्ट्रवादीला झुकतं माप मिळतंय अशी तक्रार करत असतात. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, संजय राऊत यांनी विचारलेल्या या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीबद्दल मत व्यक्त केलं. त्यांनी तिन्ही पक्षात संवाद ठेवला तर अशा चर्चा होणार नाहीत, असं पवार यांनी म्हटलं.

शरद पवार यांनी म्हटलं, "उद्धव ठाकरेंची काम करण्याची पद्धत ही आम्हा सगळ्यांपेक्षा थोडी वेगळी आहे. त्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत ही सेनेच्या कामाची पद्धत आहे. मी शिवसेनेमध्ये अनेक वर्षं पाहतोय, म्हणजे अगदी स्थापनेपासून. तिथे आदेश येतो आणि आदेश आल्यानंतर त्यावर चर्चासुद्धा होत नसते."

कोरोना
लाईन

"काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये आम्ही वरिष्ठांच्या मताचा आदर करतो, पण वरिष्ठांकडून आदेशच येतो असं नाही. समजा एखादं मत कोणी मांडलं, तर त्यावर आम्ही चर्चा करू शकतो. ही आमची कामाची पद्धत आहे. शिवसेनेत नेतृत्वानं भूमिका घेतल्यानंतर त्या रस्त्यानं जायचं आणि त्याची अंमलबजावणी करायची अशी पद्धत आहे."

पण आता तीन पक्षांचं सरकार असल्यामुळे संवाद ठेवायला हवं, असं त्यांनी आवर्जून नमूद केलं.

2014 सालचं 'ते' वक्तव्यं सेना-भाजपमध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी?

2014 साली भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा जाणूनबुजून केली असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं. शिवसेना आणि भाजपच सरकार बनू नये म्हणून आपण तसं विधान केल्याचं शरद पवारांनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर सरकार स्थापनेबद्दल जे आरोप केले त्याबद्दल संजय राऊत यांनी प्रश्न विचारला होता. 2014 साली तुम्हाला भाजपसोबत सरकार बनवायचं होतं. तुम्ही पाठिंबा जाहीर केला, पण त्यानंतर सरकार शिवसेनेसोबतच बनलं. मधल्या काळात तुम्ही आणि भाजपचे वरिष्ठ नेते सरकार बनवण्याबद्दल चर्चा करत होते, असं फडणवीस यांनी ठामपणे सांगितल्याचं राऊत यांनी म्हटलं.

शरद पवार, संजय राऊत, सामना मुलाखत

फोटो स्रोत, Saamana Online

या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार यांनी सांगितलं, "माझ्याही वाचनात तसं आलं. पण त्यावेळेस ते कुठे होते माहीत नाही. डिसीजन मेकिंग प्रोसेसमध्ये त्यांचं काय स्थान होतं? मुख्यमंत्री झाल्यानंतर ते चर्चेत आले. त्यापूर्वी विरोधी पक्षातला एक जागरुक आमदार म्हणूनच ते सगळ्यांना माहीत होते. पण संबंध राज्यातल्या किंवा देशातल्या नेतृत्वासोबत बसून निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना होता की नाही हे मला माहीत नाही. ते म्हणतात त्याप्रमाणे मी कॉन्शसली एक विधान केलं...सेना आणि भाजपचं सरकार बनू नये म्हणून. माझी पहिल्यापासूनची इच्छा होती की सेनेनं भाजपसोबत जाऊ नये. पण ते जातील असं दिसलं तेव्हा मी जाणीवपूर्वक विधान केलं, की आम्ही तुम्हाला बाहेरुन पाठिंबा देतो."

सेना भाजपपासून दूर व्हावी यासाठी केलेली ती राजकीय चाल होती, पण तसं घडलं नाही, अस शरद पवारांनी म्हटलं.

'मी स्वतः पंतप्रधानांना सत्तास्थापनेसाठी नकार दिला'

2019 म्हणजे आताच्या निवडणुकीनंतरही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा भाजपसोबत सरकार बनवण्यासाठी अंतिम टप्प्यात चर्चा करत असल्याचाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला होता. नंतर पवार साहेबांनी यूटर्न घेतल्याचंही फडणवीसांनी म्हटलं.

या आरोपाबाबत बोलताना शरद पवारांनी म्हटलं,"साधी सरळ गोष्ट आहे. आम्हाला शिवसेनेसोबत सरकार बनवायचं नाहीये आणि तुम्ही आमच्यासोबत सरकार बनवा, असं आम्हाला भाजपमधल्या काही लोकांकडून सांगण्यात आलं. पक्षातील माझ्या काही सहकाऱ्यांशी, माझ्याशीही ते बोलले, हे खरं आहे. त्यांची अपेक्षा होती की, पंतप्रधानांचे आणि माझे संबंध चांगले आहेत. ते स्वतः यात हस्तक्षेप करतील आणि मी संमती देईन. हा निरोप माझ्यापर्यंत आला."

पवार

फोटो स्रोत, PTI

"त्यावेळी मी विचार केला की, देशाच्या पंतप्रधानांपर्यंत आपल्याबद्दल, आपल्या पक्षाबद्दल चुकीची माहिती जाऊ नये, म्हणून मी स्वतः संसदेमध्ये पंतप्रधानांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की, आम्ही तुमच्यासोबत येणार नाही. आम्ही सेनेसोबत सरकार बनवू किंवा विरोधी पक्षात बसू."

'हे मी सांगायला जाताना एक गृहस्थ संसदेमध्ये माझ्या शेजारी होते, त्यांचं नाव संजय राऊत,' असं म्हणत शरद पवार यांनी या घडामोडींचे साक्षीदार तुम्ही स्वतः असल्याचं संजय राऊतांना जाणवून दिलं.

प्रशासनावर नोकरशाहीचा प्रभाव आहे?

काँग्रेसचे मंत्री सध्याच्या सरकारमध्ये प्रशासनाचा जास्त जोर आहे, नोकरशाहीचा प्रभाव आहे अशी टीका करत असल्याबद्दल संजय राऊतांनी शरद पवारांना विचारलं.

"बाकीचे सगळे प्रश्न बाजूला ठेवून कोरोनाचा सामना करण्याचा आव्हान होतं. त्यामुळे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांची भूमिका महत्त्वाची होती. प्रशासन यंत्रणेची मदत घेण्याची आवश्यकता होती. नंतर कदाचित हे राहणार नाही. मनोहर जोशीही मुख्यमंत्री होते, ते शिवसेनेचे होते. पण त्यांच्याकाळात असा आरोप कधी झाला नाही. आताही कोरोनाचं संकट कमी झाल्यानंतर पुन्हा तशाच पद्धतीनं सरकार चालवलं जाईल," असं शरद पवारांनी म्हटलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)