अग्रिमा जोशुआ: शिवाजी महाराजांवरील वक्तव्याप्रकरणी कॉमेडिअन अग्रिमाची माफी

स्टँड-अप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हिच्या गेल्या काही दिवसांपासून तिच्या एका व्हिडिओतल्या उल्लेखामुळे शिवप्रेमी टीका करत होते.

यामध्ये अग्रिमाने शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आक्षेप अनेकांनी ट्विटरवरून घेतला होता.

हा व्हिडिओ ज्या स्टुडिओत शूट झाला, तिथे जाऊन मनसेने तोडफोडही केली. यानंतर अग्रिमा जोशुआने याबद्दल शिवप्रेमींची माफी मागितली आहे.

काय घडलं?

स्टँड अप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हिच्या एका अॅक्टमधली व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली, ज्यात ती अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाविषयी बोलताना दिसते.

यावरून शिवप्रेमींमध्ये नाराजी उमटली. या व्हीडिओमध्ये अग्रिमाने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला असा आक्षेप अनेकांनी घेतला.

अनेकांनी ही नाराजी ट्विटरवर व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत आणि त्यांची थट्टा सहन केली जाणार नाही असा सूर सोशल मीडियावर उमटल्यानंतर ट्विटरवर याविषयीचा हॅशटॅगही ट्रेंड व्हायला लागला.

अग्रिमाचा हा व्हिडिओ ज्या स्टुडिओत शूट करण्यात आला होता, तिथे जाऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. मनसे वृत्तांत अधिकृत या फेसबुक पेजवर याचा व्हिडिओदेखील पोस्ट करण्यात आलेला आहे.

अग्रिमाने आपल्या ट्रोलिंगबद्दल ट्वीट केलं होतं. भाजपच्या आयटी सेलने आपल्यावर ट्रोल आर्मी सोडली असल्याचं म्हणत तिने या ट्वीटमध्ये आदित्य ठाकरेंना टॅग केलं होतं.

अग्रिमाचा माफीनामा

यानंतर शुक्रवारी (10जुलै) रात्री ट्वीट करत तिने शिवप्रेमींची माफी मागितली.

अग्रिमाने ट्वीटमध्ये म्हटलंय, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक चाहत्यांच्या भावना दुखावल्याबद्दल मी माफी मागते. मी या महान नेत्याचा खरंच आदर करते. त्यांच्या समर्थकांची मी मनापासून माफी मागते. हा व्हिडिओ आधीच काढून टाकण्यात आलेला आहे, याची कृपया दखल घ्यावी."

अग्रिमा जोशुआच्या स्टँडअप कॉमेडीचा संपूर्ण व्हिडिओ आता उपलब्ध नाही, पण अनेकांनी यातल्या वादग्रस्त ठरलेल्या भागाची क्लिप ट्विटरवर शेअर केली आहे.

कोरा या वेबसाईटवर आपण शिवस्मारकाविषयी माहिती वाचत असताना तिथे काय काय लिहीलं होतं याविषयी ती बोलताना दिसते.

'हा व्हिडिओ 2019 मधला आहे, तिने टोमणा मोदी आणि पुतळाप्रेमाबद्दल मारलाय' असं पत्रकार राजू परुळेकर यांनी याविषयी ट्वीट करत म्हटलंय.

'कला टिकवण्यासाठी सेल्फ सेन्सॉरशिप उत्तम मार्ग'

मराठीमध्ये स्टँड-अप कॉमेडी रुळवणाऱ्या 'भाडिपा'चे सहसंस्थापक आणि स्टँड अप कॉमेडिअन सारंग साठ्ये याविषयी म्हणतात, "मला असं वाटतं की कुठलीही कला टिकवण्यासाठी सेल्फ सेन्सरशिप हा उत्तम मार्ग असतो. जेव्हा एखादी कला स्वतःच्याच नियमांचं उल्लंघन करू लागते, तेव्हा त्याच्यावर अशा प्रकारचा परिणाम होतो. मला असं वाटतं की सध्या दोन प्रकारचे कॉमेडियन आहेत. एक अशा प्रकारे विनोद निर्मिती करतात की त्यांना त्यातून काही म्हणायचं असतं. आणि दुसरे आहेत त्यांना फक्त विनोद निर्मितीची इच्छा असते, त्याच्या पलिकडे त्याचा काही वाव नसतो.

"याचा विचार सर्व कॉमेडिअनने केला पाहिजे की आपण हे फक्त विनोद निर्मितीसाठी करतोय की त्यातून आपल्याला काही सांगायचं आहे. एकूणच मी म्हणेन की जर आपल्याला एखाद्या विचारसरणीचा प्रॉब्लेम असेल तर त्या विचारसरणीवर आपण विनोद करावा, त्याच्या स्रोतावरचा अभ्यास पूर्णपणे वेगळा असावा. माझा हा स्टान्स असतो. स्पेशली कॉमेडिअन आणि लेखकांनी आपल्या तोंडातून कुठले शब्द बाहेर पडतात याचा विचार करायला हवा. मग त्यांच्यावर संकट येत नाही, असं माझं मत आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)