You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वटपौर्णिमा : सावित्री - महाभारतातली नायिका की नेभळट पतिव्रता?
- Author, जाह्नवी बिदनूर
- Role, महाभारतावरील संशोधक
आज वटपौर्णिमा. त्या निमित्ताने महाभारतावरील संशोधक जान्हवी बिदनूर यांनी बीबीसी मराठीकरिता लिहिलेला लेख रिशेअर करत आहोत...
------------------------------------------------------------------------------------------------
काल सहज गप्पा मारता मारता आईने विषय काढला, "चला ज्येष्ठ महिना सुरू झाला आता ५ तारखेला वटपौर्णिमा येईल." तिनं असं म्हणता क्षणी वटपौर्णिमा आणि वटसावित्री या दोन्ही गोष्टी डोळ्यासमोर तरळल्या.
वटसावित्री म्हटलं की नटूनथटून वडाच्या पूजेला जाणाऱ्या आणि स्वतःच्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करणाऱ्या बायका डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. पण मग असं वाटलं की यावर्षी कोरोनाच्या कृपेने हे दृश्य दिसणार नाही. तर मग हीच वेळ आहे थोडेसं अंतर्मुख होण्याची आणि कोण होती ही सावित्री, तिचं नेमकं स्थान काय आहे ह्या संस्कृतीमधलं, काय काय शिकण्यासारखं आहे तिच्याकडून -- हे सगळं जाणून घेण्याची.
वड म्हणजे दीर्घायुष्याचं प्रतीक आहे, मग सावित्री ही नेमकं कशाचं प्रतीक आहे? फक्त पातिव्रत्याचं का?
पुरुषसत्ताक संस्कृतीने ज्या सावित्रीचा फक्त 'पातिव्रत्य' हाच गुण टिकवण्यात आणि पिढ्यानुपिढ्या लोकांपर्यंत पोचवण्यात धन्यता मानलेली दिसते, त्या सावित्रीची कथा ही मुळात महाभारतात येते. महाभारतातील वनपर्वात (३.२७७ -२८३) युधिष्ठिर आणि मार्कण्डेय ऋषींच्या संवादात ही कथा येते.
त्या कथेत सावित्री ही द्रौपदीसारखी देदिप्यमान अशी स्त्री असल्याचे वर्णन येते. मुळात याज्ञसेनी आणि सावित्री ह्या दोघीही तेजाची प्रतीके आहेत. सावित्रीची कथा ही पातिव्रत्यापेक्षाही उत्कट प्रेमाची, मृत्यू या न टाळता येण्याजोग्या वास्तवाची आणि त्याहीपलीकडे जन्म, मत्यू, पुनर्भव, अमरत्व अशा अनेक मोक्षविषयक संकल्पनांची झाडाझडती घेणारी कथा आहे.
पण इथे एक मुद्दा महत्त्वाचा आहे : कोणत्याही विशिष्ट स्त्रीवादी भूमिकेतून केलेलं हे प्रतिपादन नाही. जे यथार्थ आहे ते लोकांपर्यंत पोचावं हा ह्या लेखाचा हेतू.
सावित्रीची महाभारतातली मूळ कथा
मद्रदेशाचा राजा अश्वपती याची सावित्री ही कन्या. ती अत्यंत सुंदर, बुद्धिमान आणि तेजाने तळपणारी अशी होती. तिच्या या तेजामुळे तिच्याशी विवाह करायला कोणीही तयार होईना.हा तर अगदीच आपलासा वाटणारा अनुभव! बुद्धिमान, तेजस्वी, स्वतंत्र विचारांची मुलगी मैत्रीण म्हणून चालते, पण पत्नी म्हणून मात्र "mother figure"च बरी! याच मानसिकतेचे आविष्कार आपल्याला सभोवती वावरताना दिसतात. इतक्या सुंदर, बुद्धिमान मुलीशी लग्न करायला कोणी तयार नाही म्हणून तिच्या वडिलांना चिंता वाटू लागते.
शेवटी ते नाइलाजाने तिला सांगतात, "आता तूच तुझ्यासाठी पती शोध." एखाद्या तीर्थयात्रेला जावं त्याप्रमाणे ही मुलगी बरोबर काही सचिवांना घेऊन विवाहासाठी योग्य मुलगा शोधत स्वतःच वने धुंडाळत, दानधर्म करत फिरू लागते.
ही मनस्विनी सहचर म्हणून निवड करते ती सत्यवानाची. तो शाल्वदेशाचा राजा द्युमत्सेन याचा पुत्र. राजा अंध झालेला आणि त्याच्या शत्रूंनी कपटानं त्याचं राज्य हरण केलेलं. आणि आता तो त्याच्या पत्नी आणि पुत्रासह वनात रहाणारा. चंद्राप्रमाणे सौम्य दिसणारा, उदार, संयमी, शूर, मृदुभाषी, दानशूर अशा अनेक गुणांनी युक्त असणाऱ्या सत्यवानाच्या गुणांकडे पाहून सावित्री स्वतःच स्वतःसाठी वनवास निवडते.
तर्काच्या जागी कर्मकांड
यानंतरची कथा आपल्या सगळ्यांना माहिती असणारी. पण सावित्री सत्यवानाचे प्राण परत मिळवण्याकरता 'व्रतवैकल्यं' करते का? तर नाही. ती यमधर्माशी संवाद साधते. सावित्री आणि यम यांचा संवाद म्हणजे अतिशय तर्कसुसंगत अशा प्रश्नोत्तरांची एक मालिकाच आहे.
एखाद्या तत्त्ववेत्त्याप्रमाणे सावित्री यमाशी अक्षरशः सर्व पातळ्यांवर चर्चा (negotiation) करते. जन्म-मृत्यू यांच्या वास्तविक स्वरूपाविषयी (logos) चर्चा करते. भावनिक पातळीवर (pathos) ती यमाला समजावून सांगते की सत्यवानाचं जिवंत रहाणं कसं आणि किती गरजेचं आहे. त्याचे वडील अंध आहेत, तोच त्याच्या घराचा आधार आहे. त्याचं जिवंत राहणं हे गरजेचं आहे.
तिचं बोलणं हे अत्यंत सुस्पष्ट, तर्कसुसंगत, तत्त्ववेत्त्यांनाही मागे टाकेल, असं असल्याचं वर्णन महाभारतात येतं. (३.२८१.२५-३५).
सत्यवानाला यमाकडून परत मिळवून आणते ती व्रतवैकल्यातून निर्माण होणारी निष्ठा की तिचं खरं उत्कट प्रेम - हा या निमित्ताने उपस्थित केला जावा असा प्रश्न. या इतक्या चांगल्या कथनाची जागा एका कर्मकांडाच्या (ritualistic) कृतीने घ्यावी यासारखा दुसरा दैवदुर्विलास नाही. जिथे उत्कट प्रेम आहे तिथे निष्ठा ही आपोआप येतेच. बर तिच्या अशा प्रदर्शनाची गरज भासत नाही.
पण हे कथन आज फक्त या व्रताबरोबर वाचल्या जाणाऱ्या कथेपुरतं मर्यादित राहिलं आहे. शिवाय नोकरी, घर सांभाळून मी सगळं करते, या नादात कित्येकदा नुसतेच वडाच्या झाडाला दोरे गुंडाळले जातात, कथा वाचलीच जात नाही. सावित्रीने तिच्या पतीला यमाकडून परत मिळवले ह्याचा अर्थ या व्रतात जो लावला गेला आहे, तो तर खूपच हास्यास्पद आहे.
काय तर हे व्रत करणाऱ्या स्त्रीला पुढचे सात जन्म तोच नवरा मिळणार आहे. अशा तऱ्हेचं कुठलंही वचन (promise) या कथनात नाही. शिवाय ज्या सत्यवानाला परत आणण्यासाठी सावित्री धडपडते त्याचे गुण हा पण एक महत्त्वाचा निकष ठरतो. म्हणजे थोडक्यात, कुणाची पूजा बांधायची, कुणासाठी आपली व्रतवैकल्यं आणि निष्ठा पणाला लावायची हा पण मुद्दा महत्त्वाचाच आहे. केवळ सण म्हणून साजरा करण्याचा हा दिवस नाही.
सावित्रीची प्रतिमा अशी कशी झाली?
ह्या चर्चेतून आणखी एक प्रश्न समोर येतो: हे असं का झालं असेल? म्हणजे सावित्रीच्या कथनाचं असं विपर्यस्त रूप आपल्यापर्यंत का पोचलं असेल? या सावित्रीचा प्रवास जर लक्षात घेतला तर काही कारणं मिळतात. हे कथन मत्स्यपुराण (२०९-२१३), त्यानंतर धर्मसिंधू, निर्णयसिंधू आणि व्रतशिरोमणी अशा ग्रंथांमधून येऊन अगदी अलीकडच्या संपूर्ण चातुर्मास या संकलनात आढळते.
ज्या क्षणी एखाद्या कथनाची सांगड एखाद्या धार्मिक व्रतवैकल्याशी घातली जाते, त्याच क्षणी त्या कथनाचं स्थान दुय्यम होऊन जातं आणि त्याच्याकडे एक accompaniment म्हणून पाहिलं जातं. त्याचा अर्थ सर्वसामान्य माणूस असाही घेतो, माझा संबंध काय तो या विधीशी (praxis) आणि 'षोडश उपचारांशी'! त्या कथनाचा अर्थ, त्याचं चिंतन (theory, philosophy) वगैरे हा तर विचारवंतांचा किंवा तत्त्ववेत्त्यांचा प्रांत. त्यात मी कशाला शिरायला जाऊ?
मग त्या कथनाचं नीटपणे वाचन करणं आणि त्याचा अर्थ समजावून घेणं हे बाजूलाच राहतं. मुळातच या मराठी कथेत फक्त 'पातिव्रत्य' या गुणावरच सगळं लक्ष केंद्रित केलं गेलं आहे, हे जरा विचित्रच वाटतं.
एखादी 'सावित्री' ही अशी तिचीतिचीच, स्वतंत्रपणे अस्तित्वात राहूच कशी शकते? हीच खटकणारी गोष्ट असू शकते. मग तिची सांगड एका सत्यवानाशी घातली जाते. मग ही वैयक्तिक गोष्ट सामाजिक केली जाते. तिची नाळ अन्य स्त्रियांशी आणि त्यांच्या पातिव्रत्याशी जोडली जाते.
मनात असाही विचार येऊन जातो की पुरुषसत्ताक विचारांच्या ज्या आविष्कारांची आपण वरती चर्चा केली, ते अनादि काळापासून 'स्त्री' या एका अफाट सृजनशक्तीमुळे धास्तावलेलेच आहेत. त्यामुळे तिच्या अन्य गुणांची, क्षमतांची जाणीव अन्य स्त्रियांना करून देण्यापेक्षा सोयिस्करपणे "पातिव्रत्य" या चौकटीत तिला नटवणं हे अधिक सोपं आणि कमी त्रासदायक वाटत असावं.
पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आणखीही काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. 'जुनं ते सगळंच सोनं' हा दष्टिकोन जसा सकस नाही, तसंच 'जुनं ते सगळंच बुरसटलेलं' हाही दष्टिकोन तपासून घ्यायला पाहिजे.
आधुनिकतेने आपल्याला आपल्यालाच साहित्याकडे, संस्कृतीकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन दिले, हे जरी बरोबर असलं तरी फक्त काळाच्या दृष्टीने अलीकडे जन्माला आलेलं साहित्य सकस विचार देणारं आणि जुनं साहित्य भलतंच काहीतरी रुजवणारं असा काहीसा समज रूढ झाला आहे, तोही दूर होणे गरजेचे आहे. साहित्य कोणत्याही काळातील असलं तरी त्याचं डोळस 'वाचन' होणं नितांत गरजेचं आहे.
सावित्रीची जेव्हा नेभळट नायिका होते...
या कथेतील सावित्रीची तुलना द्रौपदीशी करता येईल. सभेमध्ये पांडवांचा आणि प्रत्यक्ष द्रौपदीचा ज्या अतिशय हीन पातळीवर अपमान होतो, तो म्हणजे पांडवांसारख्या पराक्रमी वीरांसाठी मृत्यूहूनही भयंकर प्रसंग होता.
त्यातून त्यांना द्रौपदी बाहेर काढते आणि स्वतः त्यांच्याबरोबर वनवासाला जाते. या प्रसंगाचं वर्णन महाभारतात द्रौपदीने पांडवांना एखाद्या नावेप्रमाणे तारलं या शब्दांत केलं आहे.
जीवनात अनेक वेळा माणसावर 'श्रेयस्' (ultimately good) आणि 'प्रेयस्' (प्रिय, immediately palatable) यातील एकाची निवड करण्याची वेळ येते. त्यावेळी तो नेमकी कशाची निवड करतो त्यावरून त्याचं मूल्य ठरतं.
आयुष्यातील सर्व चढ-उतारांमध्ये घराला सावरून धरणारी एखादी स्त्री असेल, तर तिने नाही केलं एखादं व्रत तर फारसं काही बिघडत नाही. सावित्रीची आत्मनिर्भरता, यमासारख्या धर्म जाणणाऱ्या देवतेशी संवाद साधण्याची क्षमता किंवा प्रसंगी वाद घालण्याची क्षमता हे गुण आत्मसात करणं महत्त्वाचं.
'पतिव्रता' या शब्दाचे आजच्या काळात समोर येणारे काही अर्थ विचित्र वाटतात. स्वतंत्र विचार नसणारी, पतीच्या अयोग्य विचारांना किंवा निर्णयांनाही "मम" म्हणून साथ देणारी, अशी काहीतरी एका तद्दन मराठी कुटुंबप्रधान चित्रपटातील नेभळट नायिका डोळ्यासमोर उभी रहाते.
पण सावित्रीचं वास्तविक रूप हे याच्या अगदी विरुद्ध - अत्यंत स्वतंत्र विचारांची, बुद्धिमान, जीवनात प्रेयसापेक्षा श्रेयसाला महत्त्व देणारी, प्रत्यक्ष यमधर्माशी वाद घालण्याची क्षमता असणारी असं आहे. म्हणूनच इथून पुढे एखाद्या स्त्रीला "सती-सावित्री" म्हणताना महाभारतातल्या उपाख्यानाच्या या नायिकेची आठवण ठेवलेली बरी!
(जाह्नवी बिदनूर या संस्कृत आणि महाभारत या विषयांवरच्या संशोधक आणि लेखिका आहेत. त्यांनी फर्गिवसन महाविद्यालयात संस्कृतचं अध्यापन केलं आहे. त्यांचे महाभारत आणि भाषाविज्ञान या विषयांवरील शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. 'लौकिकन्याय' या पुस्तकाच्या लेखिका आहेत. डेक्कन कॉलेजच्या संस्कृत अध्यासनावर कोषशास्त्राचं काम केलं आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात महाराभाताशी संबंधित प्रकल्पांवर त्यांनी काम केलं आहे. लेखातील विचार त्यांचे वैयक्तिक विचार आहेत.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)