भारत कोरोना व्हायरसचा हॉटस्पॉट होतोय का?

फोटो स्रोत, Huw Evans picture agency
- Author, अपर्णा अलुरी आणि शादाब नाझ्मी
- Role, बीबीसी
कोरोना संक्रमणाचा वेग भारतात सुरुवातीला मर्यादित होता मात्र सहा महिन्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या यादीत भारत रशियाला मागे टाकून तिसऱ्या स्थानी आहे.
सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी असलेल्या भारतातले बहुतांश नागरिक दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये राहतात. त्यामुळे भारत कोरोनाचं हॉटस्पॉट होणं साहजिकही आहे.
मात्र कोरोना रुग्णांचा आकडा प्रश्न विचारायला लावणारा आहे. कारण भारतात अजूनही कोरोना चाचण्यांचं प्रमाण कमी आहे. लोकसंख्येच्या तुलनेने मृत्यूदराची टक्केवारी शास्त्रज्ञांना बुचकळ्यात टाकणारी आहे.
कोरोना विषाणूच्या देशभरातल्या संक्रमणाविषयी पाच गोष्टी जाणून घेऊया.
1. भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय
भारतात दररोज हजारो लोकांना कोरोनाचा संसर्ग होतो आहे. कठोरपणे लागू करण्यात आलेलं लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे.
7 जुलै रोजी भारतात 719,664 कोरोना रुग्ण होते.
परंतु कोरोनाचा संसर्ग नेमका किती प्रमाणात झाला आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही असं व्हायरॉलॉजिस्ट शाहीद जमील यांना वाटतं.
सरकारतर्फे मे महिन्यात 26,000 नागरिकांची रँडम चाचणी घेण्यात आली. त्यानुसार 0.73 टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
काहींना सँपल सर्व्हेसाठी निवडण्यात आलेल्या संख्येवरही आक्षेप आहे. मात्र जमील यांच्या मते देशातील संसर्गाचं प्रमाण समजून घेण्याचा हाच एक मार्ग आहे.

कोरोना रुग्णांची संख्या दर 20 दिवसांनी दुप्पट होते आहे. त्यामुळे हा आकडा 30 ते 40 दशलक्षपर्यंत वाढण्याची भीती आहे.
कोरोनाचा संसर्ग आणि प्रत्यक्ष कोरोना रुग्ण यामध्ये प्रत्येक देशात तफावत आढळते. कोरोना चाचणी करणं हा त्यावरचा उपाय आहे. तु्म्ही जेवढ्या चाचण्या कराल, तेवढा तुम्हाला कोरोनाचा नेमका संसर्ग कळू शकेल, असं डॉ. जमील सांगतात.
गेल्या काही दिवसांमध्ये भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे, कारण चाचण्यांचं प्रमाण वाढतं आहे. 13 मार्चपासून देशात 10 दशलक्ष चाचण्या झाल्या आहेत. मात्र यापैकी 1 दशलक्ष चाचण्या 1 जूननंतर झाल्या आहेत.

2. भारतात पुरेशा चाचण्या नाहीत
सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानी आहे. मात्र लोकसंख्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांची टक्केवारी काढली तर भारत मागे आहे.
भारतात लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णांची संख्या कमी आहे कारण चाचण्यांचं प्रमाण मर्यादित आहे असं डॉ. जमील सांगतात. अन्य देशांमध्ये त्यातुलनेत खूप चाचण्या होत आहेत.
कोरोना चाचणी कोणाची घेतली जाते हेही महत्त्वाचं आहे. भारतात सुरुवातीला हाय रिस्क आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचीच चाचणी केली जात असे. लक्षणं आढळणाऱ्या व्यक्तींचीच चाचणी केली जात असे. त्यामुळे बहुतांश जनता चाचण्यांपासून दूर आहे.
कोरोनासारख्या आजाराचा संसर्ग वाढू लागल्यानंतर टेस्ट अँड ट्रेस हे पुरेसं नाही, असं हिमांशू त्यागी आणि आदित्य गोपालन या गणिततज्ज्ञांना वाटतं. प्रादुर्भाव रोखायला याची मदत होऊ शकते मात्र नवे रुग्ण याद्वारे मिळू शकत नाहीत.

ते समजण्यासाठी भारतात प्रचंड प्रमाणावर चाचण्या करणं आवश्यक आहे. कोणाच्या चाचण्या होत आहेत हे कसं कळणार?
विविध देशांनी किती प्रमाणात चाचण्या घेतल्या याचा तुलनात्मक अभ्यास केला तर असं लक्षात येतं की काही देश किती लोकांच्या चाचण्या घेतल्या याची आकडेवारी ठेवतात तर काही देश कोणत्या आणि किती चाचण्या घेतल्या याची आकडेवारी ठेवतात. भारतात एकापेक्षा अधिकवेळा चाचणी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही हे कळण्यासाठी किती चाचण्या घेण्यात आल्या याला शास्त्रज्ञ महत्त्व देतात. हे प्रमाण जेवढं जास्त तेवढं संसर्ग अधिक. अन्य देशांच्या तुलनेत भारताची कामगिरी यथातथाच आहे.
रुग्ण पॉझिटिव्ह आहे की नाही कळण्यासाठी जेवढ्या जास्त चाचण्या घेतल्या जातील तेवढं पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी असेल. म्हणूनच न्यूझीलंड आणि तैवान इथे पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे.
भारतात हे प्रमाण एप्रिलमध्ये 3.8% होतं. आता जुलैमध्ये 6.4% आहे. ते वाढत राहिलं तर याचा अर्थ चाचण्या मर्यादित प्रमाणात होत आहेत.

3. रुग्ण बरं होण्याचं प्रमाण चांगलं
कोरोना संसर्ग होण्याच्या प्रमाणाच्या तुलनेत बरं होण्याचं प्रमाण भारतात चांगलं आहे. संसर्ग होण्याचं प्रमाण आणि बरं होण्याचं प्रमाण यांचं गुणोत्तर समजून घेण्यासाठी रुग्णाला कोरोना झाला आहे का हे कळण्यास लागणारा वेळ, बरं होण्यास लागणारा वेळ आणि मृत्यू ओढवण्याचं प्रमाण हे पाहिलं जातं. जितका जास्त वेळ लागतो तेवढं चांगलं मानलं जातं.

कोरोनाच्या भारतातल्या डबलिंग रेटबद्दल शास्त्रज्ञ साशंक आहेत. कमी चाचण्यांमुळे नव्या रुग्णांची नोंद होण्याचं प्रमाण कमी आहे.
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण त्याला कोरोना झाला आहे की नाही याच्या तुलनेत जास्त आहे. मृत्यूचा डबलिंग रेट हा भारतात 26 असल्याचं डॉ. जमील सांगतात.
तो वेगाने वाढला तर हॉस्पिटल्सवर ताण येऊ शकतो. कोरोनाचा फटका बसलेल्या देशांमध्ये भारताचा आलेख चांगला आहे. देशातलं कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण अमेरिका तसंच ब्राझीलच्या तुलनेत चांगलं आहे.

बरं होण्यासंदर्भात आकडेवारी अस्पष्ट आहे. भारतामध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला व्यक्ती काही आठवडयांनंतर कोरोना निगेटिव्ह आढळला की तो आजारातून बरा झाला असं म्हटलं जातं.
युकेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येऊन घरी सोडण्यात आलेल्या व्यक्तींना आजारातून बऱ्या झालेल्या अशी गणती केली जाते.
म्हणूनच युकेतलं बरं होण्याचं प्रमाण कमी आहे. कोणत्या देशात किती लोक कोरोनातून बरे होत आहेत याच्या तुलनेत भारतातलं कोरोनातून बरं होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे, कारण कोरोना मृतांची नोंदच कमी प्रमाणात झालेली आहे.
4. मृत्यूदराचं प्रमाण कमी
कोव्हिड 19मुळे भारतात आतापर्यंत 20,160 मृत्यू झाले आहेत. आकडेवारीच्या दृष्टीकोनातून पाहायचं झालं तर जगाच्या क्रमवारीत भारत आठव्या स्थानावर आहे. पण लोकसंख्येच्या दर दहा लाखांमागे किती जणांचा मृत्यू झालाय असा विचार केल्यास हे प्रमाण कमी आहे. "पश्चिम युरोपातल्या परिस्थितीकडे पाहता हे प्रमाण अतिशय कमी आहे," ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूशनच्या अर्थतज्ज्ञ आणि सिनीयर फेलो शमिका रवी सांगतात. भारताच्या या मृत्यूंविषयीच्या आकडेवारीबद्दल अनेक प्रश्नही उपस्थित करण्यात आले आहेत. कमी मृत्यूंची नोंद होत असल्याच्या मतावर बहुतेक तज्ज्ञांचं एकमत आहे. पण यावरून भारत आणि युरोपातल्या मृत्यूंच्या आकड्यांमधल्या मोठ्या अंतराचा उलगडा होत नसल्याचं डॉ. शमिका रवी म्हणतात. "जर आपल्याकडे खरंच मृत्यूंचं प्रमाण जास्त असतं तर ते कोणत्याही प्रकारे आकडेवारीतून लपवता आलं नसतं. कारण हे प्रमाण आताच्या मृत्यूंच्या 20 ते 40 पटींनी जास्त आहे," त्या सांगतात.

या भागातल्या पाकिस्तान किंवा इंडोनेशिया प्रमाणेच भारतातला मृत्यूदरही कमी आहे. यासाठीची अनेक कारणं सांगितली जातायत. या भागामध्ये इन्फेक्शन्स आढळण्याचं प्रमाण जास्त आहे, इथपासून ते या भागांत आढळणारा 'व्हायरस स्ट्रेन' (Virus Strain) फारसा घातक नाही ते पश्चिमेकडच्या देशांच्या तुलनेत या देशांमधल्या तरूण लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे आणि कोव्हिड 19 मुळे वृद्धांचा जीव जाण्याचं प्रमाण जास्त आहे अशा अनेक कारणांमुळे मृत्यूदर कमी असल्याचं म्हटलं जातंय."प्रत्येक देश काही त्यांच्या आकडेवारीत गडबड करणार नाही, कदाचित या देशाच्या लोकसंख्येतली रोगप्रतिकार शक्ती ही इतर रोगांमुळे जास्त आहे. पण या देशांमधला मृत्यूदर इतका कमी का आहे, यामागचं नेमकं कारण आपल्याला माहित नाही."
5. प्रत्येक राज्याची वेगवेगळी कहाणी
अमेरिका तसंच युरोपियन युनियनमधल्या अन्य देशांप्रमाणेच भारतातल्या राज्यांची कोरोना आकडेवारी विभिन्न आहे. देशातले 60 टक्के रुग्ण महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडू राज्यांमध्ये आहेत.
काही ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे तर काही ठिकाणी वाढते आहे. दक्षिणेत कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये रुग्णांची संख्या वाढते आहे.

भारतात कोरोनाला दिलं जाणारं प्रत्युत्तर हे केंद्रीय धोरणाधिष्ठित आहे आणि हे बदलायला हवं असं तज्ज्ञांना वाटतं.
भारतात कोरोनाला रोखताना जिल्हानिहाय विचार व्हायला हवा, असं डॉ. जमील यांना वाटतं. कारण पुन्हा संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला तर तो पहिल्या लॉकडाऊनप्रमाणे परिणामकारक ठरणार नाही, असं डॉ. जमील यांना वाटतं.

जिल्हानिहायप्रमाणे स्थानिक ग्रामीण पातळीवर काय परिस्थिती आहे, काय आकडेवारी आहे ती समजायला हवी. लक्षणं आढळलेल्या प्रत्येक माणसाची माहिती हवी, असं डॉ. रवी यांना वाटतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








