कोरोना व्हायरस : हॉस्पिटलचं बिल भरलं नाही अलिगडमध्ये मारहाण करून रुग्णाची हत्या केली का?

फोटो स्रोत, ANI
- Author, दिलनवाज पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
हॉस्पिटलचा बिल भरता न आलेल्या रुग्णाला हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी मारझोड केल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. अलिगडमधील एनबी या खासगी हॉस्पिटलवर रुग्णाच्या हत्येचा आरोप करण्यात आला आहे. सुल्तान खान असं मृत रुग्णाचं नाव आहे.
रुग्णाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.
अलिगड शहराचे पोलीस अधीक्षक अभिषेक यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, "मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे."
"हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही आमच्या हाती लागला आहे. त्यात मारझोड होताना दिसतेय. मृताच्या नातेवाईकांच्या दाव्यानुसार, हॉस्पिटलच्या प्रशासनानं रुग्णासह त्यांच्यावर हल्ला केला," अशी माहिती अभिषेक यांनी दिली,
रुग्णाच्या नातेवाईकांचा बिलावरून हॉस्पिटलच्या प्रशासनासोबत काही वाद झाला होता, अशीही माहिती अभिषेक यांनी दिली. मृत रुग्णाचा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मूत्रनलिकेसंदर्भातील त्रासानंतर सुल्तान खान यांना अलिगडच्या एनबी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. मात्र, या हॉस्पिटलनं खर्चाची रक्कम जास्त सांगितल्यानंतर नातेवाईकांनी सुल्तान खान यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, यादरम्यान वाद सुरू झाला आणि हॉस्पिटलशी संबधित लोकांनी रुग्णाच्या नातेवाईकांवर हल्ला केला.
रुग्णाच्या नातेवाईकांचा आरोप काय आहे?
सुल्तान खान यांचे नातेवाईक चमन खान यांच्या माहितीनुसार, "आम्ही सुल्तान यांना एनबी हॉस्पिटलमध्ये आणलं. भरती करण्याआधीच किती खर्च येईल हे विचारलं. आम्हाला पैसे जमत असतील, तरच इथे उपचार करू. मात्र, हॉस्पिटलनं सांगितलं की, तपासणी झाल्यानंतरच खर्च सांगितला जाईल."
"अल्ट्रासाऊंड करण्याआधीच त्यांनी 5000 रुपयांची औषधं दिली आणि सांगितलं की, रोज 5000 हून अधिक रुपयांचा खर्च येईल. इतका खर्च परवडणार नसल्याचं आम्ही सांगितलं. ते औषध परत देऊन आम्ही 3700 रुपये भरले," असं चमन खान सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, हॉस्पिटलने आणखी 4 हजार रुपये मागतिल्याचं चमन खान म्हणतात. "आणखी 4 हजार कशासाठी, असं आम्ही विचारल्यावर हॉस्पिटलनं सांगितलं, रुग्णाला भरती केल्याचं इतकं शुल्क आहे. आम्ही इतके पैसे देऊ शकणार नसल्याचं सांगितलं. आम्ही रुग्णाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेऊ इच्छित होतो. मात्र, ते जाऊ देत नव्हते. आम्हाला जवळपास 15 मिनिटं त्यांनी रोखून ठेवलं. आम्ही विनवणी केली. तरीही त्यांनी मानलं नाही. मग मी धक्का दिला, तर त्यांनी आमच्यावर हल्ला केला. माझ्या काकांना (सुल्तान खान) काठीनं मारझोड केली, त्यात त्यांचा मृत्यू झाला."
हॉस्पिटल प्रशासनाचं काय म्हणणं आहे?
हॉस्पिटल प्रशासनानं चमन खान यांचे आरोप फेटाळले आहेत. बीबीसीशी बोलताना एनबी हॉस्पिटलचे मालक शान मियाँ यांनी म्हटलं की, हॉस्पिटलच्या बिलावरून संपूर्ण वाद झाला.
शाना मियाँ म्हणाले, "ते रुग्णाला घेऊन आले आणि तपासणी करून घेतली. हॉस्पिटल प्रशासनानं त्यांना खर्चाची पूर्ण कल्पना दिली होती. रुग्णाचं ऑपरेशन करावं लागेल आणि त्यासाठी कोरोनाची चाचणी घेणं आवश्यक आहे, असं हॉस्पिटलनं सांगितलं, तेव्हा रुग्णांच्या नातेवाईकांनी कोरोना चाचणी करण्यास नकार दिला. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करू, असं ते म्हणाले."

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

"हॉस्पिटलचं बिल न देताच ते रुग्णाला घेऊन जात होते. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी पैसे मागितल्यावर नातेवाईकांनी हल्ला केला. रुग्णाला रिक्षात बसवून, ते कुठेतरी घेऊन गेले होते. मग थोड्या वेळानं पुन्हा आले आणि गोंधळ घालू लागले. हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या हल्ल्यातच रुग्णाचा मृत्यू झाला असा आरोप करू लागले."
कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांतील आकडेवारी-
रुग्णाच्या नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलीस चौकशी करत असून, हॉस्पिटल प्रशासन पोलिसांना सहकार्य करेल, असं शान मियाँ यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, EPA/FAROOQ KHAN
"मृत रुग्णाचा अद्याप पोस्टमार्टम अहवाल आला नाहीय. जर काठीनं रुग्णाचा मृत्यू झाला असेल, तर पोलिसांनी कारवाई करावी. मात्र, विनाकारण आम्हाला त्रास देऊ नये," असंही शान मियाँ म्हणतात.
शान मियाँ सांगतात, कोरोनामुळे रुग्णांमध्ये एकप्रकारची भीती आहे. त्यात एनबी हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार होत नाहीत. कोरोनाचा कुणीही रुग्ण इथे आणल्यास, त्याला मेडिकल कॉलेजमध्ये पाठवलं जातं.
कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन करायचं असल्यास सर्वांत आधी कोरोना चाचणी घेतली जाते, असंही शान मियाँ यांनी सांगितलं.
हॉस्पिटलचा खर्च
कुठल्याही रुग्णाला पाहण्यासाठी आलेल्या डॉक्टरची प्रत्येक व्हिजिटनिहाय हजार रुपये फी असते. त्याशिवाय इतर तपासणीचा खर्च वेगळा असतो. हा सर्व खर्च रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना आधीच सांगितलं जातो, असं शान मियाँ यांनी सांगितलं.
शान मियाँ यांचा आरोप आहे की, "सुल्तान खान या रुग्णासोबत आलेल्या नातेवाईकांनी तापसणीचे पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे सर्व वाद झाला. त्यांनी हॉस्पिटलमध्ये झालेला कुठल्याच खर्चाची रक्कम दिली नाही."

फोटो स्रोत, Reuters
अलिगडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी भानू प्रताप यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "काही दिवसांपूर्वीच हॉस्पिटलची फी वाढवण्यात आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन हे दर ठरवत असते."
अलिगडमधल्या प्रकरणाबाबत भानू प्रताप म्हणाले, कुठल्याही स्थितीत रुग्णाला मारहाण करणं चुकीचंच आहे. हॉस्पिटलला नोटीस पाठवली जाईल.
तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सध्या मारहाणीच्या कलमांअंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच रुग्णाच्या मृत्यूचं नेमकं कारण कळू शकेल. त्यानुसार मग पुढील कारवाई होईल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








