कोरोना व्हायरस लस: भारतात लसीचं काम कुठवर आलं आहे?

भारतीय बनावटीची कोव्हिड-19 विरोधातील लस 15 ऑगस्टपर्यंत लोकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे असा दावा देशातील सर्वोच्च संशोधन संस्था इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) केला होता.
हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीसोबत जुलैमध्ये करार केला होता. क्लिनिकल ट्रायलच्या यशानंतर कोरोनाविरोधातील ही लस देशाच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्टला लोकांसाठी उपलब्ध करून देण्याचं आयसीएमआरने म्हटलं होतं.
आता 15 ऑगस्ट उलटून गेला आहे. तेव्हा या लसीचं काम कुठवर आलं आहे.
देशभरातली कोरोना रुग्णांची तसंच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. स्वातंत्र्यदिनी अर्थात 15 ऑगस्टला स्वदेशी बनावटीची लशीची घोषणा होईल असं चित्र होतं. मात्र तसं होऊ शकलं नाही. जगभरात दीडशे विभिन्न ठिकाणी लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशात एक नव्हे तर तीन लसींवर काम सुरू आहे.
सद्यस्थितीला दोन लशी फेझ-1 आणि फेझ-2 या क्लिनिकल ह्यूमन ट्रायल अर्थात माणसांवर लशीचे प्रयोग सुरू आहेत. कोव्हॅक्सिन नावाची लस भारत बायोटेक, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात येत आहे. दुसरी लस झायडस कॅडिलातर्फे बनवली जात आहे.
दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला मानवी चाचण्यांसाठी परवानगी मिळाली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्ट्राझेनेका यांच्या पाठिंब्याने सीरम इन्स्टिट्यूट ही लस तयार करत आहे. भारत तसंच अन्य विकसनशील देशांना ही लस तयार करून उपलब्ध करून देण्यासाठी सीरम इन्स्टिटयूट आणि ब्रिटिश-स्वीडन कंपनीत करार झाला आहे.
या तीन लशी कधी उपलब्ध होणार याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेलं नाही. कोरोनावर लस तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. लशीचं प्रचंड प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी सिद्धता सुरू आहे. कमीत कमी वेळात ही लस तयार व्हावी यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात सांगितलं होतं.
याआधी काय घडलं?
भारतात विकसित करण्यात आलेल्या कोरोनाविरोधी लसीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी देशातील 12 संस्थांची निवड करण्यात आली आहे. आयसीएमआरचे (ICMR) संचालक डॉ.बलराम भार्गव यांनी 2 जुलैला देशातील या 12 संस्थांना पत्र लिहून 7 जुलैपर्यंत या ट्रायलसाठी सर्व आवश्यक परवानगी घेवून नोंदणी करण्याची सूचना केली आहे.
देशातील 12 संस्थांना लिहीलेल्या पत्रात आयसीएमआरचे (ICMR) संचालक डॉ. बलराम भार्गव म्हणतात, आयसीएमआरने भारतात विकसित करण्यात आलेल्या कोरोनाविरोधातील लसीच्या फास्ट-ट्रॅक ट्रायलसाठी भारत बायोटेक या कंपनीशी करार केला होता. ही संपूर्णत: भारताने विकसित केलेली लस राहील असं ते म्हणाले होते. कोव्हिड-19 व्हायरसचा स्टेन वेगळा करून याच्या मदतीने ही लस विकसित करण्यात आली आहे.
क्लिनिकल ट्रायल झाल्यानंतर लोकांसाठी उपलब्ध करून देण्याचा आयसीएमआरचा मानस होता. भारत बायोटेक यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करतेय.
भारत बायोटेकचं काय आहे म्हणणं?
या घोषणेच्या काही तासांपूर्वीच भारत बायोटेकच्या व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इला यांची मुलाखत बीबीसी तेलुगू प्रतिनिधी दीप्ती बथ्थिनी यांनी घेतली होती. त्यांनी या लसीसंदर्भात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्या म्हणाल्या, "पहिल्या टप्प्यात 1000 नमुन्यांची तपासणी केली जाईल. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केलं जाईल. चाचणीसाठी आलेल्या व्यक्तींवर अतिशय काटेकोरपणे लक्ष ठेवलं जाईल. ज्यांना कोव्हिड झालेला नाही त्यांना या चाचण्यांसाठी पाचारण करण्यात येईल.चाचणी झाल्यावर कसा प्रतिसाद मिळतो त्यासाठी 30 दिवसांचा कालावधी गरजेचा असेल."

फोटो स्रोत, Getty Images
"या प्रतिसादात भूभागाचा किती वाटा आहे याचीही चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशात चाचण्या केल्या जातील. त्याला चांगला प्रतिसाद मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात 45-60 दिवसात माहिती गोळा केली जाईल. एकदा रक्ताचा नमुना घेतल्यावर चाचणीचा कालावधी कमी करता येणार नाही. चाचणीचे निकाल येण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी गरजेचा आहे. पहिला टप्पा पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्यात येतील.पहिल्या टप्प्यातील माहिती चांगली असेल तर आपण दुसऱ्या टप्प्यात जाऊ शकतो. दुसऱ्या टप्प्यासाठी सज्ज होण्यासाठी आम्ही आतापासूनच काम करत आहोत."
प्राण्यांवर ज्या चाचण्या केल्या त्यांचे निकाल चांगले आले आहेत. माणसांवर केलेल्या चाचण्यांची माहिती चांगली असेल अशी अपेक्षा करतो. पुढच्या तीन ते सहा महिन्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी मोठी माहिती उपलब्ध असेल अशी अपेक्षा आहे असंही त्या पुढे म्हणाल्या.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

देशातील पहिल्या कोव्हिड-१९ विरोधातील लसीच्या ट्रायलसाठी निवडण्यात आलेल्या संस्था
- किंग जॉर्ज हॉस्पिटल, विशाखापट्टणम
- बी.डी.शर्मा पीजीआयएमएस, युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायंन्सेस, रोहतक
- ऑल इंडिया इंन्स्टिट्युट ऑफ मडिकल सायंन्सेस, दिल्ली
- ऑल इंडिया इंन्स्टिट्युट ऑफ मडिकल सायंन्सेस, पटणा
- जीवन रेखा हॉस्पिटल, बेळगाव, कर्नाटका
- गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर, महाराष्ट्र
- राणा हॉस्पिटल, गोरखपूर
- एसआरए मेडिकल कॉलेज-हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, चेंगालपट्टू, तामिळनाडू
- निझाम्स इंस्टिट्युट ऑफ मेडिकल सायंन्सेस, हैद्राबाद, तेलंगाणा
- डॉ. गंगाधर साहू, भुवनेश्वर, ओडिशा
- प्रखर हॉस्पिटल, कानपूर, उत्तरप्रदेश
- डॉ. सागर रेडकर, ओशालबाग, गोवा
भारत बायोटेकच्या लसीचं नाव काय?
हैदराबादची कंपनी भारत बायोटेकने बनवलेल्या पहिल्या भारतीय बनावटीच्या कोव्हिड-19 विरोधातील लसीचं नाव 'कोव्हॅक्सीन' असं आहे. 29 जूनला ट्विटरवर भारत बायोटेकने भारतातील पहिली लसीचं यशस्वीरित्या मानवी चाचणी सुरू करण्यात आल्याची माहिती दिली होती.
कोव्हॅक्सिन असं या लसीचं नाव आहे. भारत बायोटेक कंपनीने ही लस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी तसंच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषेदच्या यांच्या संयुक्त प्रयत्नांतून तयार केली आहे, असं भारत बायोटेक कंपनीचे चेअरमन डॉ. कृष्णा इला यांनी सांगितलं.
लस कधी हातात येणार?
एखादी लस तयार व्हायला काही वर्षं लागतात. पण आता शास्त्रज्ञ हे काम काही महिन्यांमध्ये करण्याचा प्रयत्न करतायत. बहुतांश तज्ज्ञांचं म्हणणं आहे की 2021 सालच्या मध्यापर्यंत कोरोना व्हायरसवर लस उपलब्ध होऊ शकेल. म्हणजे कोरोना व्हायरस जेव्हा पहिल्यांदा जगासमोर आला तेव्हापासून 12 ते 18 महिन्यांचा काळ लोटल्यानंतर यावर लस येऊ शकेल.
पण लशीवर संशोधन होण्यापासून ती लस बाजारात येईपर्यंत यात अनेक टप्पे आहेत.
1) चाचणीतून हे सिद्ध व्हावं लागेल की तयार झालेली लस सुरक्षित आहे.

फोटो स्रोत, Getty Images
2) लशीमुळे लोकांच्या प्रतिकारशक्तीला कोरोनाच्या विषाणूला प्रतिसाद देता आला पाहिजे. लोकांची प्रकृती यामुळे आणखी खालावणार नाही याचीही खातरजमा करावी लागेल.
3) औषधं प्रमाणित करणाऱ्या संस्थांनी या लशीला हिरवा कंदील दाखवावा लागेल.
4) लशीचे अब्जावधी डोस कसे बनवता येतील याचीही तजवीज करावी लागेल.
5) आणि जगभरातल्या कोरोना बाधित लोकांपर्यंत ही लस पोहोचेल यासाठी पुरवठा यंत्रणा सक्षम करावी लागेल.
काही लोक असंही म्हणतायत की हे सगळं केल्यानंतरही लस येईलच याची खात्री नाहीय. इंपिरिअल कॉलेज ऑफ लंडन इथे जागतिक आरोग्याचे प्राध्यापक असलेले डेव्हिड नबारो म्हणतात की, "कोरोनावर इतक्यात लस तयार होणं कठीण आहे. आणि जगाला नजीकच्या भविष्यात तरी कोरोना व्हायरसचा सामना करावा लागेल."
डॉक्टर काय म्हणतात?
बीबीसीने गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांच्याशी बातचीत केली.
"भारतीय बनावटीच्या कोव्हिड-19 विरोधातील लसीची मानवी चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी देशातील 12 संस्थांची निवड झाली. या चाचणीसाठी स्वेच्छेने पुढे येणाऱ्या व्हॉलेन्टीअरची निवड करण्यात येईल. त्यांना या चाचणीबाबत माहिती देवून त्यांची परवानगी असल्यास त्यांना चाचणीत समाविष्ठ केलं जाईल. यासाठी ओळखीचे व्यक्ती आणि इतरांशी संपर्क केला जाईल, " असं त्यांनी सांगितलं.
"मानवी चाचणीसाठी स्वेच्छेने तयार होणारे व्हॉलेन्टीअर हेल्दी असल्याची काळजी घेतली जाईल. 18 ते 55 या वयोगटातील लोकांवर ही चाचणी केली जाईल. कोव्हिडची लक्षणं नसलेल्यांचा आणि ज्यांच्या शरीरात कोव्हिड एंटीबॉडीज नाहीत अशांचा या चाचणीत समावेश केला जाईल. व्हॉलेन्टीअरला हृदयरोग, किडनी विकार, यकृताचा त्रास किंवा इतर आजार नाही याची खात्री केल्यानंतरच त्यांच्यावर या लसीची चाचणी होईल"
"फेज-1 आणि फेज-2 साठी 100 लोकांची निवड केली जाईल. पहिल्या फेजमध्ये स्वेच्छेनं या चाचणीसाठी पुढे येणाऱ्यांना या लसीमुळे काही रिअॅक्शन होतात का? कोणता त्रास होतोय का? याची तपासणी केली जाईल. दुसऱ्या फेजमध्ये 14व्या दिवशी त्यांना लस दिली जाईल. लस दिल्यानंतर त्यांच्या शरीरात कोव्हिड विरोधात एंटीबॉडीज तयार होतात का? याच्या इम्युनोजेनेसिटीची तपासणी केली जाईल. त्यानंतर 28 आणि 50व्या दिवशी त्यांची पुन्हा तपासणी केली जाईल."
"साधारण: 100 लोकांना पहिल्या आणि दुसऱ्या फेजमध्ये चाचणीत समाविष्ठ केलं जाईल. ही ट्रायल रॅन्डमाईज असेल. लस देण्याच्या आधी आणि नंतर लोकांवर विविध प्रकारच्या तपासण्या-चाचण्या करण्यात येतील. शरीरावर याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास केला जाईल."

फोटो स्रोत, Getty Images
याबाबत बोलताना हेल्थ रिसर्चर डॉ. अनंत भान म्हणतात, "ज्या लशीची प्री-क्लिनिकल डिव्हेलपमेंट अजूनही सुरू आहे. त्याची क्लिनिकल ट्रायलसाठी 7 जुलैपर्यंत नोंदणी कशी होवू शकते? त्यापुढे जावून ही लस 15 ऑगस्टपर्यंत बाजारात उपलब्ध होणार? लसीची चाचणी एका महिन्याहून थोड्या जास्त वेळेत पूर्ण होणार? या लसीची कार्यक्षमता आधीच निश्चित करण्यात आली आहे? ज्या रुग्णालयात कोव्हिड-19 विरोधातील लसीची चाचणी करण्यात येणार आहे. त्यांची निवड कोणत्या निकषांवर करण्यात आली? ही रुग्णालयं यासाठी पात्र आहेत का? कोणत्या लिस्टमधून यांची निवड झाली? या रुग्णालयांची निवड आयसीएमआरने केली का भारत बायोटेकने? कोरोना एक महामारी आहे. अशा परिस्थितीत या रुग्णालयांची निवड चाचणीसाठी योग्य आहे का?"
"2 जुलैला पत्र पाठवण्यात आलं. 7 जुलैपर्यंत म्हणजे पुढील पाच दिवसात या रुग्णालयांना सर्व प्रक्रिया करण्यास सांगण्यात आलंय. 5 दिवसात चाचणीसाठी लोकं तयार होतील? एथिक्स कमिटीची परवानगी मिळेल?, " असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.
'इतक्या लवकर लस तयार होणं निव्वळ अशक्य'
15 ऑगस्टपर्यंत सामान्यांसाठी कोव्हिड-19 ची लस बाजारात आणण्याच्या इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मानसाबाबत बोलताना महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या कोव्हिड-19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणतात, "इतक्या लवकर लस तयार होणं नव्वळ अशक्य आहे. सामान्यत: लस तयार करण्यासाठी 12 वर्ष लागतात. कितीही फास्टट्रॅक करण्याचा प्रयत्न केला तरीही 12 ते 18 महिन्यांचा कालावधी लागतोच. यापेक्षा लवकर लस निर्माण होणं अशक्य आहे."
"लस तयार करताना काही स्टेप पाळाव्याच लागतात. मानवी चाचणी करताना अतिआवश्यक गोष्टींवर दुर्लक्ष करून चालत नाही. या महत्त्वाच्या टप्प्यांना बायपास करून लस निर्मिती करण्यात येवू नये. ICMR ने याचं एस्टर्नल ऑडिट करून घ्यावं"
"आयसीएमआरचा 15 ऑगस्टपर्यंत लस निर्माण करून लोकांसाठी वापर करण्याचा निर्णय खूप आश्चर्यजनक आहे. हे करताना सुरक्षा आणि याची कार्यक्षमता याचा योग्य अभ्यास करायला हवा. मला आशा आहे की हा निर्णय घेताना ICMR ने सुरक्षेबाबत योग्य उपाययोजना केल्या असतील. जर, हे सर्व पाळून जर लस निर्मिती होत असेल तर याचं स्वागत करायला हवं."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)









