लालबागचा राजा मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा न करण्याचा मंडळाचा निर्णय

फोटो स्रोत, BBC/Prashant Nanaware
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मुंबईच्या लालबागचा राजा गणेश मंडळाने गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांच्या आरोग्याचा विचार करून मूर्तीची प्रतिष्ठापना देखील न करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने करण्याचं आवाहन केलं होतं. सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपतीची मूर्ती जास्तीत जास्त 4 फुटांची ठेवावी असेही निर्देश देण्यात आले होते. मात्र लाल बागच्या मंडळाने यावेळी गणेशोत्सवच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा- कोरोना झाल्यानंतर बरं व्हायला रुग्णाला किती वेळ लागतो?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?

गणेशोत्सवाऐवजी या वर्षी रक्तदान आणि प्लाझ्मा डोनेशन कॅंप घेण्यात असल्याची माहिती लाल बाग गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
"आरोग्य उत्सव" साजरा करण्याचा निर्णय
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदाचा 87 वा गणेशोत्सव मूर्ती स्थापना व विसर्जन असा कोणताही सोहळा साजरा न करता "आरोग्य उत्सव" म्हणून श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत साजरा करण्यात येणार आहे.

फोटो स्रोत, BBC/Prashant Nanaware
आरोग्य उत्सव साजरा करीत असताना प्लाझ्मा थेरपी ला प्राधान्य देवून अधिका अधिक रुग्णांना जीवनदान देण्याचा संकल्प, गलवान खोर्यात शहीद झालेल्या जवानां च्या कुटुंबाप्रति योग्य मान सन्मान, तसेच कोरोना रोगाच्या लढ्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस बांधव यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हातभार लावण्याचा संकल्प मंडळाने घेतला आहे.
लालबागचा राजा हे आमचे श्रद्धा स्थान दैवत आहे यात कोणतीही शंका असण्याचे कारण नाही पण त्याच्या स्थापना व विसर्जन या बाबीकडे जनता जनार्दनाच्या आरोग्य सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्याचा मंडळाचा निर्णय आहे असं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री सहायता निधीला 25 लाख रुपये देण्याचा मंडळाने निर्णय घेतला आहे.
'उत्सवाची उंची वाढवा'
उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की यावेळी गणपतीची नाही तर गणेशोत्सवाची उंची वाढवा.
"लोकमान्यांची परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे पण ती सुरक्षित व्हायला पाहिजे. मी मुख्यमंत्री झाल्यावर एका पाठोपाठ वादळ संकटं येत आहेत... मी कुठल्याही वादळाला आणि संकटाला घाबरत नाही. आता आपली परीक्षा आहे. विघ्नहर्ताही आपल्याकडे पहात असतील की आपण काय शिकलो आणि कसं वागतोय.""गणेश मूर्तींची उंची हा प्रश्न आहेच. जर आपण उत्सव साधेपणाने करतोय तर मग गणेश मूर्ती संदर्भात आपण निर्णय घेतला पाहिजे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"वारी आपण सुरक्षित पार पाडतोय तसंच आपण गणेशोत्सवही सुरक्षित पार पडला पाहिजे. गणेशमूर्ती दोन जणांना उचलता येईल अशीच बनवावी. जेणे करून सुरक्षेचे इतर प्रश्नंही सुटतील. उद्या तुम्ही उत्सव केला आणि तो विभागच कंटेनमेंट झोन झाला तर मग अनेक अडचणी उभ्या रहातील. त्यामुळे सुरक्षित उत्सव केला पाहिजे. गणेशमूर्ती एव्हढ्या उंचीची असावी जेणे करून ती कृत्रिम तलावात सुरक्षितपणे विसर्जित करता येईल," असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
'लोकप्रिय पण वादग्रस्त मंडळ'
लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ एक लोकप्रिय मंडळ म्हणून ओळखलं जातं. पण तितकंच ते वादग्रस्तही आहे. अनेक माध्यम समूहांनी या मंडळावर बहिष्कार टाकला होता. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून इथं दर्शनाला येणाऱ्या पत्रकार, पोलीस आणि महिलांबाबत आदर राखला जात नसल्याचं अनेकवेळा दिसून आलं आहे.
परळ स्टेशनजवळ लालबाग परिसरात राहणाऱ्या कोळी बांधवांकडून या गणेशाची स्थापना होते. लालबागचा राजा गणपतीला मागितलेला नवस पूर्ण होत असल्याची श्रद्धा लोकांमध्ये वाढत जाऊन हे मंडळ अतिशय लोकप्रिय बनलं. नवस मागितलेल्या लोकांकरिता इथं वेगळी रागं असते. या रांगेतून दर्शन घेण्यासाठी 24 ते 30 तास लागू शकतात.

फोटो स्रोत, Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal
बॉलीवूडचे सेलिब्रिटी, उद्योजक, विविध पक्षांतील राजकीय नेते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी येतात. दक्षिण-मध्य मुंबईतील अतिशय चिंचोळ्या गल्लीत हे मंडळ स्थापन करण्यात येतं.
गणेशोत्सव काळात इथं एकाच वेळी हजारोंच्या संख्येने गर्दी जमा होते. अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग राखणं अशक्य काम आहे.
मंडळाला कोट्यवधी रुपये दान स्वरूपात मिळतात. शिवाय सोनं-चांदीही मोठ्या प्रमाणात मंडळाला प्राप्त होतं. दान स्वरूपात मिळणाऱ्या पैशाचा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप होऊ लागल्यांतर याची मोजणी करताना धर्मादाय आयुक्तांतर्फे निरीक्षक पाठवण्यात येत आहेत.
मंडळाची गणेशमूर्ती दरवर्षी त्याच स्वरूपात बनवली जाते. विसर्जन मिरवणूक तब्बल 21 तास चालते. दुसऱ्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास लालबागच्या राजा गणपतीचं विसर्जन पार पडतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








