कोरोना लॉकडाऊन : 'एका मोलकरणीसाठी हे संकट तुरुंगवासापेक्षा कमी नाही'

मोलकरीण

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना विषाणूने सर्वांच्याच आयुष्यावर कमी-अधिक प्रमाणात परिणाम केला. पण गरिबांना याचे जरा जास्तच चटके बसले. घरकाम करणाऱ्या मदतनीसांनाही मोठा फटका बसला आहे. त्यांच्यासाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या कसोटीचा तर होताच. शिवाय, मानसिकदृष्ट्याही कमी थकवणारा नव्हता.

बिहारमधून नवी मुंबईत आलेल्या आणि इथे घरकाम करणाऱ्या सोनी लक्ष्मी प्रसाद यांच्यासाठी लॉकडाऊन कसा होता, हे त्यांच्याच शब्दात ऐकूया.

line

लॉकडाऊनने आयुष्यात जी अनिश्चितता अनुभवली ती यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. गेले तीन महिने सारखी भीती वाटत आहे. पुढे काय होईल, काहीच कळत नाहीयं. एकतर या आजाराची भीती. त्यावर औषध नाही म्हणतात.

त्यात इथे नवी मुंबईत मी आणि माझी तीन मुलं आम्ही एकटेच आहोत. आमचं गाव बिहारमधलं. इथे नातेवाईक नाही.

आजवर कधी वाटलं नव्हतं, पण आता एकटं असल्यासारखं वाटतंय. त्याचीच जास्त भीती वाटते.

दुसरी भीती कामाचीही आहे. आतापर्यंत स्वतः हिमतीने कामं शोधली, कामं केली, पैसे कमावले. पण आता कामावरच जाता येत नाहीय. त्यामुळे पैसे नसतील तर काय करायचं, ही भीतीही आहे.

कुणी म्हणतं लॉकडाऊन पुन्हा होईल. तर कुणी म्हणतं आता सगळं खुलं झालं आहे. पण माझ्यासाठी तर काम सुरू होईल का, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे.

तीन महिने तर उलटले. आणखी किती महिने हे असंच चालणार? सगळी कामं सुरू झाली नाही तर पैसेही कमी मिळणार.

बिहारमधून नवी मुंबईत

बिहारचं पाटणा जिल्ह्यातलं बिहटा गाव तुम्ही ऐकलं असेल. आताच भारत-चीन सीमेवर ज्या 20 भारतीय जवानांचा मृत्यू झाला, त्यातले हवालदार सुनिल कुमार बिहटाचे होते. तेच माझं गाव.

लग्न होऊन या गावात गेले. तिथून नवरा कामधंद्यासाठी नवी मुंबईत आला आणि त्याच्यासोबत मीही आले. जवळपास 20 वर्षं झाली. खूप कमी वयात माझं लग्न झालं. नवरा बांधकामावर जायचा. त्याला दारूचं व्यसन होतं. पाच वर्षांपूर्वी दारूच्या नशेत मॅनहोलमध्ये पडून डोक्याला जबर जखम झाली आणि त्यातच तो गेला. त्यानंतर घराची जबाबदारी माझ्यावर आली.

तीन मुलं आहेत मला. त्यांनी चांगलं शिकून मार्गी लागावं, एवढीच इच्छा होती. त्यामुळे मुलांना इथेच शिकवेन, असं ठरवलं. गावाकडे परत गेले नाही. घरकाम करायला सुरुवात केली.

एकटीने एवढ्या मोठ्या शहरात मुलांना घेऊन राहाणं, सोप नव्हतं. पण हिंमत केली आणि घरकामाला सुरुवात केली. बऱ्याच अडचणी आल्या. खचले नाही. पण कोरोनासारखं संकट कधी बघितलं नव्हतं.

कोरोना
लाईन

कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊन

मार्च महिन्यात मी पहिल्यांदा कोरोना व्हायरसबद्दल ऐकलं. चीनमधून एक व्हायरस आला आहे आणि कोरोना झालेल्या माणसाला हात लावला तर आपल्यालाही तो होतो, असं ऐकत होते. रोज त्याच बातम्या येत होत्या. कामावर जायचे तिथेही सगळे हेच बोलत होते. मग 22 मार्चलाला जनता कर्फ्यू होता आणि दोनच दिवसात लॉकडाऊन सुरू झाला. मी ज्या-ज्या घरात काम करायचे सगळ्यांचे मला फोन आले, की ताई 3 आठवडे लॉकडाऊन आहे. तुम्ही कामावर येऊ नका.

त्या महिन्यात सगळ्यांनीच मला पगार दिला. दोघींनी तर कामापेक्षा दीड हजार रुपये जास्तच दिले. त्यामुळे मी खूश होते. कारण एरवी कोण मला एवढ्या दिवसांच्या सुट्ट्या देणार? काम करायला सुरुवात केल्यापासून मी सलग 10 दिवसांचीही सुट्टी कधी घेतलेली नव्हती. आता तर 3 आठवड्यांची सुट्टी मिळाली होती. त्यामुळे मुलांना घरी चांगलं-चुंगलं खाऊ घालत होते. रोज मुलांच्या आवडीचं काहीतरी बनवत होते.

पण, कोरोना काहीतरी भयंकर आहे, हे जाणवू लागलं होतं. मुंबईत लोकल बंद, बस बंद, दुकानं बंद, ऑटोरिक्षा बंद. असं याआधी कधी बघितलं नव्हतं. मी ज्या घरी भाड्याने राहते त्या सोसायटीतही लोकांच्या बाहेर जाण्या-येण्यावर निर्बंध होते. वारंवार बाहेर जाऊ दिलं जात नव्हतं. आत येताना सॅनिटायझर लाऊनच आत घेतलं जात होतं.

आता 14 एप्रिल जवळ येत होती. 14 एप्रिलला लॉकडाऊन उघडणार होता. पण काही दिवस आधीपासूनच लोकांकडून ऐकत होते की लॉकडाऊन आणखी वाढेल. मग मात्र मला काळजी वाटू लागली. एप्रिलचा निम्मा महिना संपत होता. लॉकडाऊन उघडला नाही आणि कामावर परत जाता आलं नाही तर पैसे कसे मिळणार, याची चिंता वाटत होती.

सुरुवातीला वाटलं होतं की तीनच आठवडे लॉकडाऊन आहे. त्यामुळे घरी चांगलं-चुंगलं करून खाण्यात बरेच पैसे गेले होते. शेवटी लॉकडाऊन वाढलाच. पहिला लॉकडाऊन, दुसरा लॉकडाऊन, तिसरा लॉकडाऊन आणि चौथा लॉकडाऊन.

मुंबई, मोलकरीण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबईत असंख्य हाऊसिंग सोसायट्यांमध्ये अनेक बायका मोलकरणीचं काम करतात.

निम्माच पगार मिळाला

कामं बंद होती. एप्रिल महिना संपला. आता या महिन्याचा पगार मिळणार का? नाहीच मिळणार, असं वाटत होतं. कारण मी कामच केलं नव्हतं. ज्या दोन घरांतल्या ताईंनी मला थोडे ज्यादा पैसे दिले होते, त्यांनी तर एप्रिल महिन्यात काहीच पैसे दिले नाही. मीही त्यांना फोन केला नाही. कसा करणार? मी कामच केलं नाही तर पैसे तरी कसे मागणार?

दुसऱ्या एका ताईंनी निम्मे पैसे दिले. तर एका ताईंची तब्येत बरी नसल्याने मी त्यांना माझ्या घरून डबा करून द्यायचे. त्या डब्याचे पैसे त्यांनी मला दिले. पण इतर कामांचे पैसे मिळाले नाही. उरलेल्या दोन ताईंनी पूर्ण पगार दिला, म्हणजे त्या महिन्यात जवळपास निम्मा पगार हाती पडला.

मे महिनाही तसाच. निम्माच पगार हाती आला. पण घरखर्च काही कमी नव्हता. घरभाडं द्यायचं होतं. घरी खाणारी पाच तोंडं. माझा एक दीरही गेल्या वर्षभरापासून माझ्याकडे असतो. तो छोटमोठं काम करायचा. पण त्याने कधीच मला एक रुपयाही दिलेला नाही. आता तर कामच बंद होतं.

ज्या घरात मी स्वयंपाकाचं काम करायचे, त्यांना मी मे महिन्यात फोन करून घरून डबा देऊ का म्हणून विचारलं. दोघींनी हो म्हटलं त्यांना डबा द्यायला सुरुवात केली. त्याचे पैसे मिळाले. दोन घरी तर काम न करूनही पूर्ण पगार मिळाला. पण दोघींनी एकही रुपया दिला नाही.

आपले पंतप्रधान म्हणाले जनता कर्फ्यू पाळा. तो सगळ्यांनी पाळला. टाळ्या वाजवा म्हणाले सर्वांनी टाळ्या वाजवल्या. दिवे लावा म्हणाले सगळ्यांनी दिवे लावले. पण आपल्या घरी काम करणाऱ्यांची काळजी घ्या म्हणाले. ते मात्र सर्वांनीच ऐकलं असं नाही.

तरीही मला वाटतं मी बरीच नशीबवान आहे. कारण अर्धा का होईना, मला पगार मिळाला. त्यामुळे उपाशी राहण्याची वेळ माझ्यावर आली नाही. माझ्या ओळखीतल्या काही जणींना तर खूप कमी पैसे मिळाले.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोलकरणींच्या रोजगारावर गदा आली आहे.

घरभाडं वाढवलं

म्हणतात ना संकट एकापाठोपाठ एक येतात. तसंच माझ्याबाबतीतही झालं. मार्चमध्येच घरमालकानं 500 रुपयांनी घरभाडं वाढवायला सांगितलं. 14-15 तारखेला त्याने मला चार-पाच दिवसात घर सोडायला सांगितलं. मी म्हटलं सगळीकडे कोरोना आहे. शिवाय चार-पाच दिवसात कसं घर सोडणार? महिनाभर आधी तरी सांगायचं. पण तो ऐकायला तयार नव्हता.

पुढे आठवडाभरात लॉकडाऊनच सुरू झाला. पण घरमालकाने 500 रुपये घरभाडं वाढवून मागितलेच. लॉकडाऊन वाढत गेला. माझ्याकडे पैसेही नव्हते. हाताला काम नाही. घरात मी एकटीच कमावणारी. पण तरीही घरमालक घरभाडं कमी करायला तयार नव्हता. तो म्हणाला 'तुमचे 11 महिने संपले. पैसे द्या नाहीतर घर सोडा.'

आता लॉकडाऊनमध्ये मी कुठे जाणार होते? शेवटी घरभाडं वाढलं.

मे महिन्यात मात्र चांगलीच पंचाईत झाली होती. हातात पैसे कमी होते. ज्या ताई पूर्ण पगार द्यायच्या, त्या माझ्या बँक खात्यात पैसे टाकत होत्या. हातात रोख येणारा पैसा कमी होता. बँक दुसऱ्या भागात होती. तिथे जाऊन पैसे काढायचं म्हटलं तर लोकल नाही, बस नाही, ऑटोरिक्शाही नाही. चांगलीच पंचाईत झाली. 8 जूननंतर जेव्हा बस सुरू झाल्या तेव्हा जाऊन पैसे काढून आणले.

गावाला जाण्याचा विचार

नवरा गेल्यानंतर आधार हरवला. पण तरीही मुलांसाठी मी इथे शहरातच राहण्याचा निर्णय घेतला होता. पण कोरोनाने पुरतं हादरवलं. गावी जायचा विचार मनात घोळू लागला. मी ज्या भागात राहते त्या भागातूनही बरेच मजूर गावी जात होते. अनेकजण पायीच गेले होते.

रोज टीव्हीवर पायी गावी चालत जाणाऱ्या मजुरांच्या बातम्या असायच्या. बघवत नव्हतं. किती हालअपेष्टा. पण जीवावर उदार होऊन ते सगळे गावाला का जात असतील, हे चांगलंच जाणवत होतं, कारण माझ्या मनातही त्याच भावना होत्या.

हाताला काम नाही. त्यामुळे पैसे नाही. आणि यापेक्षाही मोठा मुद्दा म्हणजे गावाला आपली माणसं आहेत. जे काही होईल ते गावात होईल, आपल्या माणसांजवळ. सगळे सांभाळून घेतील. इथे कोण आहे आपल्याकडे बघायला. आपण या शहरात एकटे आहोत, ही भावना या लॉकडाऊनने तीव्रपणे करून दिली.

काही दिवसांनी श्रमिक ट्रेन सुरू झाल्या. मग मुलंही म्हणू लागली गावाला जाऊया. गावाला गेलो तर घरभाड्याचे पैसेही वाचणार होते. शिवाय गावाला खाण्या-पिण्यासाठीही शहराएवढा खर्च नसतो. तिथे भागून जातं. मुलं ट्रेन तिकिटासाठीचा फॉर्म भरायलाही गेली. फॉर्म भरला.

इकडे मी लॉकडाऊनमध्ये ज्या घरी डबे देत होते त्यांना फोन करून मी गावाला जात असल्याचं कळवलं. त्यांनी मला समजावलं. प्रवासात धोका आहे. त्यापेक्षा आहोत त्या ठिकाणी आपण जास्त सुरक्षित आहोत. शिवाय, लॉकडाऊन संपेल तेव्हा परत इकडे यायचंच आहे. तेव्हा सगळं नव्याने सुरू करावं लागेल. त्यांनी धीर दिला. म्हणाल्या जाऊ नको, जमेल तशी आम्ही मदत करू. मग मी निर्णय बदलला. पण ते दिवस खूप काळजीचे होते. खरं सांगायचं तर हादरून गेले होते.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अनेक मोलकरणींचा रोजगार बंद झाला आहे.

अडचणींचा डोंगर

मला तीन मुलं आहेत. 19, 17 आणि 13 वर्षांची. मोठा मुलगा कॉलेजमध्ये आहे. शाळेत असणाऱ्या मुलांच्या शाळेतून काही फोन आला नाही. पण कॉलेजमधून फोन आला. फी भरा म्हणतात, नाहीतर पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार नाही. पण मी फी कुठून भरणार? पुढे काय होतं, बघू.

तीन महिन्यांचं वीज बिल आलेलं नाही. या महिन्यात रीडिंग घेतलं आहे. म्हणजे आता पुढच्या महिन्यात भलं मोठं वीज बिल भरावं लागणार आहे.

कोरोनावर औषध नाही म्हणतात. सगळे सांगतात चांगलं खा, म्हणजे तब्येत चांगली राहील. कोरोनावर मात करायचा तोच एकमेव मार्ग आहे.

शेजारच्या बाईनं सांगितलं हळद टाकून दूध घ्या, म्हणजे कोरोना होत नाही. काढा घ्यायलाही सांगितलं. तेव्हापासून सर्व मुलांना रोज झोपताना हळदीचं दूध देते. दुधासाठीही पैसे लागतातच ना. सॅनिटायझरचाही खर्च आहे. किती महाग आहे ते. दीडशे रुपयाला छोटी बाटली मिळाली. हा वेगळा खर्च होतोय.

काही महिन्यांपूर्वीच एका मुलाला डेंग्यू झाला होता. त्याच्या उपचारात बराच खर्च झाला. आता या कोरोना काळात काही झालं तर हॉस्पिटलचा खर्च कसा करायचा, याचीही धास्ती वाटते. एका ताईनं सांगितलं की सरकारची आयुष्मान योजना आहे. यात गरिबांच्या उपचाराचा खर्च सरकार करतं. पण माझ्याकडे आयुष्मान कार्ड नाही. ते कसं काढतात तेही माहिती नाही.

सरकारी योजनांचा लाभ

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर गरिबांना स्वस्त धान्य मिळत असल्याच्या बातम्या पण मी बघितल्या. पण मला कुठूनच धान्य मिळालं नाही. इथे धान्य कुठे मिळतं, तेही मला माहिती नाही आणि कुणी त्याची काही माहितीही दिली नाही.

गरिबांसाठीच्या उज्ज्वला योजना, गरीब कल्याण योजना अशा कुठल्याच योजनेत माझं नाव नाही. त्याची मला काही माहितीच नाही. जनधन खातं तेवढं आहे. पण माझ्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का आणि असतील तर ते काढण्यासाठी बँकेत जावं लागणार आहे. आतापर्यंत तरी बँकेत जाता आलेलं नाही.

भविष्याची काळजी

8 जूनपासून बऱ्याच गोष्टी सुरू झाल्या आहेत. पण काही सोसायट्यांनी घरकाम मदतनीसांना अजून यायची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे माझं कामही अजून सुरू झालेलं नाही. ते सुरू होत नाही तोवर जीवाला घोर आहेच. एका ताईंचा फोन आला होता त्या म्हणाल्या काही दिवसात काम सुरू करता येईल. हे ऐकूनच किती बरं वाटलं. किती दिवसांनंतर त्या दिवशी आनंद झाला होता मला.

मी त्यांना म्हणालेसुद्धा, ताई लवकर बोलवा. आता मन लागत नाही. घरी एकटीच असते. कुणाला भेटणं नाही, कुणाशी बोलणं नाही. फार कोंडल्यासारखं वाटतं. कामं करायचे तेव्हा वेळ जायचा. चार माणसं दिसायची. गप्पा व्हायच्या. बरं वाटायचं. आता हे सगळं बंद आहे. त्यामुळे तर खूपच एकटेपण आलंय.

लॉकडाऊन म्हणजे तुरुंगवासापेक्षा कमी नाही. मी सांगितलं त्यांना मी सगळी काळजी घेईल. मास्क बांधेन. हात स्वच्छ धुवून कामाला लागेल. दूर उभं राहून बोलेन. जवळ येणार नाही. पण कामावर बोलवा आता. किती दिवस असंच काम न करता पैसे घ्यायचे. हक्काचे पैसे घ्यायला काही वाटत नाही. असं काम न करता पैसे घेणं, माझ्याच मनाला पटत नाही.

कुणी सांगतं आता कोरोना कधीच जाणार नाही. पण, काम सुरू झालं तर ही निराशा आणि अनिश्चितता तरी संपेल. ही सततची काळजी आणि हुरहूर नकोशी झाली आहे.

(मुक्त पत्रकार नूतन कुलकर्णी यांचं शब्दांकन)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)