कोरोना औषध : ग्लेनमार्क कंपनीचं 'फॅव्हिपिराविर' खरंच कोरोना बरा करेल का ?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
भारतात कोरोनाची रुग्णसंख्या दररोज हजारोंच्या संख्येने वाढत आहे. जगभरात कोरोनावरील औषधासाठी संशोधन सुरू आहे. तोपर्यंत सर्व रुग्णांवर अँटीव्हायरल औधषांनी उपचार केले जात आहेत. नुकतंच केंद्र सरकारने ग्लेनमार्क या संस्थेला कोरोनावरील उपचारासाठी गोळ्यांच्या उत्पादनाला परवानगी दिलीय.
ग्लेनमार्क फार्मासिटिकल कंपनी कोरोनाच्या सौम्य ते मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी औषधाचे उत्पादन करणार आहे. या अँटीव्हायरल गोळ्या असून याच्या उत्पादनासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (DCGI) परवानगी मिळाली आहे.
कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी अनेक अँटीव्हायरल गोळ्या रुग्णांना दिल्या जात आहेत. ग्लेनमार्क उत्पादन करणारी ही गोळीही अँटीव्हायरल म्हणूनच काम करेल.
या संदर्भात ग्लेनमार्क संस्थेकडून एक पत्रक काढण्यात आले आहे. यात काय म्हटलंय ते पाहूया, 'ही एक अँटीव्हायरल गोळी असणार आहे. जी फॅव्हिपिराविर (टॅबीफ्लू ) नावाने बाजारात येईल.
ही गोळी मेडिकल्समध्ये सहज उपलब्ध होऊ शकणार आहे. पण 'डॉक्टरांनी प्रिस्क्रीप्शनवर लिहून दिल्याशिवाय, गोळी देता येणार नाही.' असं संस्थेनं स्पष्ट केलंय. गोळीची किंमत 103 रूपये असणार आहे. कोरोनाची लक्षणं आढळणाऱ्या रुग्णांसाठी या गोळीचे उत्पादन करण्यात येणार आहे.'

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून अशा पद्धतीनं कोरोनाच्या उपचारासाठी औषधांच्या उत्पादनाची परवानगी मिळालेली ग्लेनमार्क ही पहिलीच संस्था आहे. कोरोनाची सौम्य ते मध्यम लक्षणं आढळणाऱ्या रुग्णांसाठी हे औषध देण्यात येईल.
कोरोनाच्या उपचाराबद्दल गेल्या काही महिन्यांत अनेक औषधांची नावं समोर आली. या औषधांनीच आतापर्यंत शेकडो कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. ही सर्व औषधं शरीरात अँटीव्हायरल म्हणूनच काम करत आहेत.
रेमडेसिव्हिर हे त्यातलंच एक नाव. आता महाराष्ट्र शासनानेही रेमडेसिव्हिरचे 10 हजार डोस मागवले आहेत. तसंच जर घसा दुखत असेल तर अॅझिथ्रोमायसिन, ताप असेल तर पॅरासिटमॉल, रुग्णांच्या वजनाप्रमाणे हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचे डोस दिले जातायत. शिवाय, गंभीर रुग्णांना टोसूलोझूमॅपचे इंजेक्शनही दिले जात आहे.

फोटो स्रोत, Reuters
पण फॅविपिराविर हे तुलनेने स्वस्त औषध असणार आहे. रेमडेसिव्हिरच्या एका इंजेक्शनची किंमत 10-11 हजार रूपये इतकी आहे. तेव्हा त्या तुलनेत फॅविपिराविरची एक गोळी 103 रुपये इतकी असणार आहे. बाजारात आल्यावर काही अंशी याचीही किंमत वाढेल पण ही गोळी सर्वसामान्यांना परवडणारी असू शकेल.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे प्रमुख डॉ. अविनाश भोंडवे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "ही गोळीसुद्धा इतर अँटीव्हायरस औषधांप्रमाणे काम करेल. पण कोणतही औषध वापरण्यासाठी औषध व अन्न प्रशासन (FDA-food and drug administration) ची परवानगी आवश्यक असते. हे औषध वापरण्यासाठी अद्याप अशी कोणतीही परवानगी केंद्र किंवा राज्य सरकारकडून आलेली नाही."
कोणतंही अँटीव्हायरस औषध दोन प्रकारे काम करते. एक म्हणजे शरीरातला व्हायरस नष्ट करणे आणि दुसरे म्हणजे शरीरातला व्हायरस कमी करणे. फॅव्हिपिराविर हे यापैकी कशासाठी काम करेल याबाबतही अद्याप स्पष्टता नसल्याचे डॉ. भोंडवे यांनी सांगितले.
अँटीव्हायरल गोळ्या तुमच्या शरीरात झपाट्याने वाढणारा व्हायरस कमी करतात. ज्यामुळे रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. ज्या गोळ्या कोरोनाचा व्हायरस कमी करण्यात प्रभावी ठरत आहेत त्या गोळ्यांची मागणी अधिक आहे.
एका बाजूने या औषधामुळे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे तर त्याच वेळी याबाबत तज्ज्ञांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. टाटा मेमोरिअलचे संचालक प्रमेथ सीएस म्हणाले आहेत की फॅव्हिपिराविर औषध प्रमाणित करण्यासाठी नेमका कोणता डेटा वापरला गेला याबाबत खुलासा करावा. पुढे ते म्हणतात की सध्याच्या काळात हे औषध घेण्यासाठी झुंबड उडू शकते तेव्हा या औषधाचा नेमका काय परिणाम झाला हे सुद्धा सांगण्यात यावं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कोव्हिडची नेमकी ट्रीटमेंट काय?
पहिल्या दिवशी दोन वेळा हायड्रॉक्सिक्लोरोक्विन- 400 Mg च्या गोळ्या दिल्या जातात. त्यानंतर 200 Mg दोन वेळा अशा 4 ते 9 दिवसांपर्यंत या गोळ्या दिल्या जातात.
त्याचबरोबर ऑसेल्टामिव्हिर हे औषध दिवसाला दोन वेळा दिलं जातं. असे पाच दिवस हे औषध घ्यावं लागतं. आयव्हरमॅक्टिन 12 Mg हे औषध दिवसातून दोन वेळा असे 2 दिवस दिलं जातं आणि डॉक्सिसायक्लिन 100 Mg दिवसातून दोन वेळा असे 5 दिवस दिलं जातं.
लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केले असले तरी जनजीवन पूर्वपदावर आलेलं नाही. त्यामुळे कोरोना व्हायरसवर औषध कधी येणार याची प्रतिक्षा प्रत्येकाला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









