You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना: तुकाराम मुंढे यांनी महापालिकेतील गोंधळानंतर सभागृह सोडलं
- Author, प्रवीण मुधोळकर
- Role, बीबीसी मराठीसाठी
भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांच्या अरेरावीमुळे व्यथित होऊन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आज सभागृहातून निघून गेले.
"सभेतूनच नाही, तर नागपुरातून चालते व्हा…" या भाजपचे नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या वक्तव्यावरून मुंढे व्यथित झाले. तर काँग्रेसचे नगरसेवक हरिश ग्वालवंशी यांनी संत तुकाराम यांच्या नावाला महापालिका आयुक्त मुंढे यांनी त्यांच्या कृतीमुळे कलंक लावू नये, असे विधान केले.
या वक्तव्यावरुन सर्वसाधारण सभेत वातावरण पेटले. शेवटी व्यथित होऊन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे सभागृहातून निघून गेले.
महापालिका सभागृहात नेमके काय झाले?
कोरानाच्या संकटात नागपूर शहरातील कंटेंनमेंट झोनमधील सवलती आणि क्वारंटाईन केंद्रातील सोयींवरून गेल्या काही महिन्यापासून महापौर विरोधात भाजप आणि काँग्रेस असा वाद सुरु आहे. त्यातच आजच्या तीन महिन्यापासून प्रतिक्षित सर्वसाधारण सभेत मुंढे विरोधी नगरसेवक आपला राग घेऊन आले होते.
सभागृहात पाईंट ऑफ इंफोरमेशनच्या अंतर्गत नगरसेवकांना बोलण्याची संधी देण्यात आली. त्याचवेळी भाजपचे महापालिकेतील सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी हे आवाज चढवून सभेत आयुक्तांसोबत बोलू लागले.
जर अशाच अविर्भावात भाजपचे नगरसेवक बोलणार असतील, तर मी सभेतून निघून जाईन, असे मुंढे यांनी ठणकावले. त्यावर भाजपचे दयाशंकर तिवारी यांनी 'सभागृहातूनच काय नागपुरातूनही चालते व्हा' असे उत्तर त्यांना दिले.
भाजप विरुद्ध महापालिका आयुक्त असा वाद सुरु असतांना काँग्रेसचे नगरसेवक हरिष ग्लालवंशी यांनी मुंढे यांच्यावर आवाज चढवायला सुरुवात केली. संत तुकाराम यांच्या नावाला तुकाराम मुंढे तुम्ही आपल्या कृतीतून कलंक लावू नका अस ग्वालवंशी यांनी सांगताच मुंढे व्यथित होऊन सभागृहातून निघून गेले.
महापालिका आयुक्त विरोधी सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस वाद काय?
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर राज्य सरकारने शहरातील परिस्थिती साठी महापालिका आयुक्तांना सर्वाधिकार दिले आहेत. नागपुरातही महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपले अधिकार वापरत अनेक कठोर उपाययोजना अंमलात आणल्या. यातूनच आयुक्त आणि भाजप तसेच काँग्रेसच्या नगरसेवकांमधील खटके उडायला लागले.
एखाद्या परिसरात जर कोरोनाचा पेशंट आढळला तर त्या भागातील एक ते तीन किलोमीटरपर्यंतचा भाग 28 दिवस कंटेंनमेंट झोन म्हणून ठेवण्याचा निर्णय मुंढे यांनी घेतला होता. पण शहरात 35 च्या वर कंटेंटमेंट झोन झाल्यामुळे त्या परिसरातील नागरिक त्रासले आहेत.
आता अशा कंटेंनमेंट परिसरातील नागरिक हे स्थानिक नगरसेवकांना आणि आमदारांना 28 दिवस कंटेंनमेंट झोन मध्ये राहणार कसे असा प्रश्न विचारत होते. त्यातच हा निर्णय केंद्र सरकार आण राज्य सरकारच्या निर्देशानेच घेत असल्याच मुंढे यांनी वेळोवेळी जाहीर केले होते. पण स्थानिक नागरिकांचे हाल होताहेत 28 दिवस ते जगणार कसे असा प्रश्न उपस्थित करत भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांच्या विरोधात युद्ध पुकारले होते.
हा वाद एकीकडे सुरू असतांना दर महिन्याला होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा ही कोरोनाच्या काळात लॉकडाउन सुरु असल्याने तीन महिने घेण्यात आली नव्हती. सोशल डिस्टंसिंग शक्य होणार नाही त्यामुळे ही सभा घेता येणार नाही. शिवाय महापालिकेचे सभागृह हे कंटेंटमेंट झोनजवळ असल्याने सध्या सभा नको असे महापालिका आयुक्तांनी सत्ताधारी आणि विरोधकांना सांगितले. पण महापालिकेची सर्वसाधारण सभा ही 3000 आसनक्षमता असणा-या सुरेश भट सभागृहात सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत घेतली जाऊ शकते असा दावा महापौर संदीप जोशी यांनी केला होता.
महापौर संदीप जोशी यांनी महापालिकेची सर्वसाधारण सभा 20 जुन रोजी बोलावली. पण आयुक्तांनी त्याला विरोध केला. सर्वसाधारण सभा घेण्यात यावी यासाठी राज्याच्या नगरविकास खात्याकडे महापौरांनी दाद मागितली. त्यावर सभा 20 जून रोजी घेण्याचे निर्देश नगरविकास खात्याने महापालिका आयुक्तांना दिले. त्यानुसार आजची ही सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.
काँग्रेसचा मुंढेंना विरोधही आणि समर्थनही?
आता सभागृहात हा सर्व गोंधळ सुरू असतांना काँग्रेसचे नगरसेवक आयुक्त मुंढे यांचा अपमान करत असताना सभागृहाबाहेर युवक काँग्रेसने मुंढे यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले. युवक काँग्रससोबतच आम आदमी पार्टीचेही कार्यकर्ते मुंढे यांना पाठिंबा देणारे फलक हातात घेऊन घोषणाबाजी करत होते.
महापालिकेची सर्वसाधारण सभा होत असलेल्या सुरेश भट सभागृहाबाहेर युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांनी समर्थकांसह निदर्शने केली. नागपूर शहराला तुकाराम मुंढे यांच्या सारख्या अधिका-याची आवश्यकता आहे. मुंढे साहेबांनी अनेकांची दुकानं बंद केली आहेत त्यामुळे राजकीय नेते त्यांना विरोध करत असल्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके यांनी सांगितले.
तर यावर काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे - पाटील यांनी तुकाराम मुंढे यांना सभागृह सोडून जावे लागले ही दुर्देवी घटना असल्याचे सांगितले आहे. महापालिकेत 150 नगरसेवक आहेत त्यापैकी विविध जण विविध पार्श्वभुमीचे आहेत. एखाद्या नगरसेवकाने आवाज चढवित जर संवाद साधला असेल तर तो विषय तिथेच थांबविता आला असता. पण महापालिका आयुक्त हे व्यक्ती नाहीत तर एक संस्था आहेत. त्यामुळे त्यांनी सभात्याग न करता सभेचे पुर्ण कामकाज उरकणे आवश्यक होते असेही गुडधे - पाटील म्हणाले.
'मुंढेंनी मन मोठं करावं त्यांचं स्वागतच करू'
या सर्व घडामोडीनंतर नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्याशी बीबीसी मराठीने संपर्क साधला.
कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याच्या या काळात आम्हा नागपुरकरांना तुकाराम मुंढे यांची आवश्यकता आहे, असे महापौर संदीप जोशी म्हणाले. तुकाराम मुंढे यांनी आडमुठेपणा सोडावा, मन मोठे करावे आम्ही त्यांचे स्वागतच करू असेही महापौर म्हणाले. महापालिका आयुक्तांच्या सभात्यागामुळे निर्माण झालेला तिढा लवकरात लवकर सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असेही महापौर म्हणाले. मंगळवारी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या सभागृहात आपली वाट पाहू तिथेच भेटू असेही महापौर म्हणाले.
एकीकडे भाजप आणि काँग्रेसचे नगरसेवक तुकाराम मुंढे यांचा जाहिर अपमान करित असतांना त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. शिवाय तुकाराम मुंढे यांनी गेल्या चार महिन्यात केलेली कामे पाहून नागरिकांचा त्यांना मोठा पाठिंबा आहे. ही परिस्थिती पाहता महापौर आणि भाजपचे नेत संदीप जोशी यांनी आता सावध भुमिका घेतल्याच दिसतय. तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव भाजप आणणार नाही अस महापौरांनी जाहिर केले आहे.
आक्रमक नगरसेवकांचे म्हणणे काय?
या प्रकरणानंतर भाजपचे आक्रमक नगरसेवक आणि सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांनी त्यांचा महापालिका आयुक्तांविरोधातील लढा सुरुच ठेवला आहे.तुकाराम मुंढे यांची दादागिरी, स्वत:चे म्हणणे खरे करणे आणि लोकप्रतिनिधींना कमी लेखणे हे आचरण अयोग्य असल्याचं तिवारी यांनी म्हटलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)