पाणीपुरी : भारतातल्या सर्वांत आवडत्या 'स्ट्रीट फूड' बद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

    • Author, चारुकेसी रामादुरई
    • Role, बीबीसी ट्रॅव्हल

पाणीपुरी भारतीयांच्या आवडीचं 'स्ट्रीट फूड' आहे. हिंदीत 'गोल-गप्पे', उत्तर प्रदेशात 'पानी के बताशे', तर कोलकात्यात 'फुचका' अशा वेगवेगळ्या नावानं पाणीपुरी देशभर ओळखली जाते.

'द हिंदू'च्या वृत्तानुसार, लॉकडाऊनदरम्यान भारतात गूगलवर सर्वाधिकवेळा पाणीपुरी बनवण्याची रेसिपी सर्च केली गेली.

पाणीपुरीच्या या सर्चमध्ये अडीच महिन्यात 107 टक्क्यांनी वाढ झाली.

पाणीपुरी तोंडात टाकल्यावर फुटते आणि तिचा जो स्वाद असतो, तो शब्दातही सांगता येणार नाही!

मात्र, ही पाणीपुरी नेमकी आली कुठून? याचेही काही रंजक किस्से आहेत.

खाद्यशास्त्राचे जाणकार आणि इतिहासकार डॉ. कुरुश दलाल यांचं म्हणणं आहे की, उत्तर भारतात सतराव्या शतकात पहिल्यांदा मुघल बादशाह शाहजहाँ यांच्या काळात चाट बनवलं गेलं होतं.

शाहजहाँने तत्कालीन जुन्या दिल्लीत आपली राजधानी वसवली, त्यावेळी यमुनेच्या खाऱ्या पाण्यामळे लोकांना त्रास होऊ लागला.

त्यावेळी हकीमने (डॉक्टर) सल्ला दिला की, क्षारयुक्त पाण्यापासून वाचवण्यासाठी मसालेदार स्नॅक्सचा वापर सुरू करावा.

त्याचसोबत, दह्याचा वापर वाढवावा. असं म्हटलं जातं की, यानंतरच लोकांनी विविध प्रयोग केले आणि त्यातूनच पाणीपुरीचा जन्म झाला.

पाहता पाहता देशभर पाणीपुरीची चव पसरली आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ बनली.

पाणीपुरीची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन अनेक मोठमोठ्या रेस्टॉरंटनेही पाणीपुरीची विक्री सुरू केलीय.

अर्थात, मोठ्या रेस्टॉरंटमध्ये चिंच आणि हिरव्या चटणीच्या पाण्यासोबत आणखी वेगवेगळे स्वाद मिसळतील.

काही नावाजलेल्या रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये तर चटणीसोबत मसालेदार वोडका शॉट्स सुद्धा मिळतील. मात्र, मोठ्या रेस्टॉरंटमधील पाणीपुरीची चव रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पाणीपुरीवाल्यासमोर टिकत नाही.

ठेल्यावर पाणीपुरीवाला आपल्या प्रत्येक ग्राहकाच्या चवीनुसार पाणीपुरी तयार करतो. तुम्ही फक्त त्याला तसं सांगायचं असतं. असं मोठ्या रेस्टॉरंटमध्ये होत नाही.

कुणाला हिरवी चटणी जास्त हवी असते, कुणाला गोड चटणी, कुणाला नसुतंच पाणी हवं असतं, तर कुणाला बटाट्याचं मिश्रण जास्त हवं असतं…

पाणीपुरी खाणं सुद्धा एक कला आहे. पाणीपुरी काही काट्यांच्या चमच्यांनी खाल्ली जात नाही. प्लेटमधून सरळ हाताने उचलून तोंडात ठेवायची. तोंडात ठेवल्यावरच पुरी फुटायला हवी, यासाठी कसोशीने होणारे प्रयत्न सुद्धा लाजवाब असतात.

काही ठिकाणी पुऱ्या पिठाच्या बनतात, काही ठिकाणी मैद्याच्या. काही ठिकाणी दोन्हींचं मिश्रण असतं.

भारतात ज्याप्रकारे लोकांना राजकीय मुद्दे किंवा क्रिकेटवर बोलायला आवडतं, वाद घालायला आवडतं, तसंच पाणीपुरीचं आहे. पाणीपुरीच्या चवीवरही लोक खूप चर्चा करू शकतात.

कुठे सर्वात चविष्ट पाणीपुरी मिळते, यावर लोक पैजाही लावतात.

फूड ब्लॉगर अमृता कौरने लॉकडाऊनच्या दरम्यान कमी साहित्यात पाणीपुरी तयार केलीय.

पाणीपुरीची रेसिपी

झणझणीत पाणी बनवण्यासाठी साहित्य:

  • एक कप कोथिंबीर
  • एक कप हिरवा पुदिना
  • दोन-तीन हिरव्या मिरच्या
  • एक चमचा भाजलेली जिरा पावडर
  • अर्धा चमचा हिंग
  • चिंचेचा तुकडा
  • एका लिंबूचा रस
  • एक मोठा चमचा दळलेली काळी मिरची
  • एक मोठा चमचा चाट मसाला
  • दोन-तीन मोठे चमचे गुळाची पावडर
  • चवीपुरतं मीठ

या सर्वांना दोन लीटर पाण्यात एकत्र करून ठेवावं.

गोड आणि आंबट पाणी बनवण्यासाठी साहित्य :

  • चिंचेची टरफळं काढून पाण्यात भिजवावी
  • तीन मोठे चमच गूळ
  • थोडे मीठ
  • भाजलेली जिरा पावडर
  • काळी मिरची

चिंच आणि गूळाला एकत्र शिजवावं, त्यानंतर मीठ, जिरा पावडर आणि काळी मिरची टाकून जाड चटणी बनवावी.

पुरी बनवण्यासाठी साहित्य :

  • एक कप रवा
  • एक मोठा चमचा मैद्याचा पीठ
  • एक मोठा चमचा तेल
  • अर्धा चमचा बेकिंग सोडा
  • थोडासा मीठ

या सर्वांचं मिश्रण करून पाण्यात 30 मिनिटांपर्यंत ठेवावं. त्यानंतर पिठाच्या कणिकाला गोल पापडासारखे लाटा. त्यानंतर मंद आचेवर डीप फ्राय करा. तेलातून बाहेर काढल्यानंतर जाळीच्या भांड्यात ठेवा, जेणेकरून त्यात राहिलेला तेल निघून जाईल.

अशा पद्धतीनं घरातल्या घरात तुम्ही पाणीपुरी तयार करू शकता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)