नरेंद्र मोदी गमछा : मास्क ऐवजी गमछा वापरून कोरोना व्हायरसच्या काळात नवं फॅशन स्टेटमेंट

फोटो स्रोत, ANI
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहत आहोत, की पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनासंदर्भातल्या घडामोडींबद्दल देशाला संबोधित करताना, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोना विषयी चर्चा करताना किंवा एखाद्या महत्त्वाच्या बैठकीला हजेरी लावताना मास्कऐवजी वेगवेगळ्या रंगाची उपरणं (गमछा) वापरत आहेत. त्यामुळेच सोशल मीडियावर सध्या 'मोदी गमछा' हा ट्रेंडही पहायला मिळतोय.
मोदी यांच्या ड्रेसिंग सेन्सची चर्चा तशी नेहमीच होते, मग तो मोदी कुर्ता असो वा मोदी जॅकेट. त्यात आता या उपरण्याची भर पडली आहे. विशेष म्हणजे मोदींनी आपल्या भाषणात सुद्धा गमछा अथवा घरी तयार केलेले सुती मास्क वापरण्याचा आग्रह केला होता.सोशल मीडियावर पूर्ण देशभर गमछा हिट झाला आहेच, तसंच 'गमछा चॅलेंज'ही ट्रेंड होत आहे. पण मोदींच्या वेशभूषेचा हा नवीन ट्रेंड फॅशन पुरताच मर्यादित आहे की त्याची अजून ही कारणं आहेत हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
मोदींचा हा व्हीडिओ तर तुम्हाला आठवत असेलच. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.
मोदींनी या व्हीडिओद्वारे देशवासीयांना संबोधित करताना सुरुवातीला तोंडाला गमछा बांधला होता. मात्र थोड्याच वेळात त्यांनी तो बाजूला केला. कोरोनाला रोखण्यासाठी घरातील गमछा, रुमाल यांचा मास्कसारखा वापर करता येऊ शकतो, हे दाखवण्याचा प्रयत्न मोदींनी केला. यासाठी पांढऱ्या रंगाच्या कापडावर लाल रंगातील डिझाइन अशा साध्या पारंपरिक रुपातला गमछा त्यांनी निवडला होता.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?


फोटो स्रोत, ANI
त्याआधी मोदींनी 11 एप्रिलला देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत राज्यांमधल्या परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यावेळीही त्यांनी घरगुती पद्धतीचा मास्क वापरला होता.

फोटो स्रोत, ANI
पंतप्रधानांच्या या लूकचीही सोशल मीडियावरही चर्चा व्हायला लागली. त्याबद्दल बोलताना सेलिब्रिटी फॅशन डिझायनर नीता लुल्ला यांनी 'झी 24 तास'ला प्रतिक्रिया दिली. "असे गमछे वापरुन पंतप्रधानांनी भारतीय संस्कृतीच साऱ्या विश्वासमोर आणली आहे. नैसर्गिक सूतापासून तयार करण्यात आल्यामुळे तो घाम शोषून घेतो. उष्ण दिवसांमध्ये हा अधिक फायद्याचा ठरतो," असं नीता लुल्ला यांनी म्हटलं.
"मोदींनी गमछा घातल्यामुळे ते सर्वसामान्यांशी डायरेक्ट जोडले जातात. गमछा हा भारतीय संस्कृती, वेशभूषेचा एक मोठा भाग आहे. उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत सगळीकडे गमछा वापरला जातो. मोदी बऱ्याचदा आपल्या सभांमध्ये देखील प्रांतीय भाषा आणि पेहराव परिधान करताना दिसतात," असं मत फॅशन डिझायनर आणि भाजपच्या नेत्या शायना एनसी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

फोटो स्रोत, ANI
पण, हे फक्त संस्कृतीपुरतं मर्यादित असू शकतं का, असा प्रश्न आम्ही अॅड गुरू भारत दाभोळकर यांना विचारला. त्यांनी म्हटलं, "आपण बघितलं तर लोकांमध्ये एक भीती निर्माण झाली आहे की, आपण एन- 95 मास्क घातला तरच सुरक्षित राहू. त्यामुळे मास्कचा बाजारात तुटवडा जाणवत होता, अनेक जण दुप्पट किमतीचे मास्क विकत घेऊ लागले होते."
"त्यामुळे खुद्द पंतप्रधानांनी असा गमछा वापरल्याने लोकांना पण आपलसं वाटतं. पण यात त्यांचा काही छुपा अजेंडा असेल तर काही सांगता येत नाही. कारण बिहारच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि गमछा हा बिहारच्या लोकांच्या रोजच्या पेहरावातला एक महत्त्वाचा भाग आहे. लोकांना अपील व्हावं म्हणून फार पूर्वीपासून नेते मंडळी आपल्या ड्रेसिंगमध्ये किंवा भाषणात लोकांना आवडेल असे बदल करायचे."

फोटो स्रोत, ANI
उपरणं किंवा गमछा नेमका कसा असतो?
उपरणं हे धोतरापेक्षा लांबी-रूंदीने कमी असलेले वस्त्रं असतं. काही काही उपरण्यांना नाजूकसा जरीकाठ देखील असतो. ते खांद्यावर पांघरलं जाऊ शकतं किंवा गळ्यात अडकवलं जाऊ शकतं. सध्याच्या काळाचा विचार केला, तर विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नेतेमंडळी गळ्यात आपआपल्या पक्षाचं चिन्ह असलेलं उपरणं अडकवून प्रचार करताना दिसतात.

फोटो स्रोत, ANI
उद्योगाला चालना की बिहारच्या निवडणुकीसाठी युक्ती?
मोदींच्या या उपरण्याचा थेट परिणाम बिहारमधील उद्योगांवर झाला. बिहारचे उद्योग मंत्री शाम रजक यांनी हिंदी चॅनलवरील एका चर्चेत बोलताना बिहारमधील विणकरांना मोठ्या प्रमाणावर उपरणे विणण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं. सध्या 1 लाख गमछे विणून तयार आहेत आणि ते स्वस्त किमतीत ग्राहकांना विकले जातील, असंही त्यांनी सांगितलं.
या माध्यमातून कोरोनापासून बचाव होईलच, पण सध्या लॉकडाऊन असल्यानं विणकरांना रोजगारामध्ये ज्या अडचणी येत आहेत, त्या दूर होणार आहेत. उपरण्यांची मोठी ऑर्डर मिळाल्याने त्यांना आपोआप रोजगार मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, ANI
पण, हे उद्योगाला चालना देण्यासाठी आहे की बिहारच्या निवडणुकीची गणितंही त्यामागे आहेत, असा प्रश्न आम्ही ज्येष्ठ पत्रकार आदिती फडणीस यांनी विचारला, त्यांनी सांगितलं, "पंतप्रधान मोदी त्यांच्या कृतीतून नेहमी असं ठसवून सांगू पाहतात की, ते सर्व सामन्यांपैकी एक आहेत.
आपण बघितलं तर देशातल्या प्रत्येक प्रांतातला कष्टकरी नोकरदार वर्गातला नागरिक गमछा वापरतो. अगदी उत्तरेपासून दक्षिणपर्यंत सगळीकडे वेगवेगळ्या स्वरुपात गमछे उपलब्ध आहेत. त्यामुळे लाकांना ते आपलंस वाटतं. मोदींचं वारंवार हा प्रयत्न असतो की ते सामान्यांचं प्रतिनिधीत्व करतील.
म्हणजे त्यांना असं दाखवायचं असतं की, मी भलेही भारताचा पंतप्रधान आहे, पण तरीही मी तुमच्यातलाच एक आहे."बिहारमध्ये होणाऱ्या निवडणूकांचा याच्याशी काही संबंध असू शकतो का, असं विचारलं असता, आदिती फडणीस सांगतात, "याचा थेट संबंध बिहार निवडणूकांशी लावता येणार नाही, कारण फक्त बिहारमध्येच नाही तर, पुढे तामिळनाडूमध्ये निवडणुका आहेत. पश्चिम बंगालमध्येही निवडणूका होणार आहेत. देशात बघितलं तर गमछा ही एक गोष्टं अतिशय कॉमन आहे आणि मोदींनी हे खूप लवकर ओळखलं आहे."

फोटो स्रोत, ANI
मोदींच्या फॅशन सेन्सची तरुणाईला भुरळ?
मोदींच्या उपरण्याबद्दल बोलत असताना त्यांच्या कुर्ता आणि जॅकेटला कसं विसरून चालेल. 2019च्या निवडणूकांच्या तोंडावर मोदींनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला एक विशेष मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी आपल्या आयुष्यातील कोणालाच माहीत नसलेले अनेक किस्से आणि प्रसंग सांगितलेले. त्यातलाच एक किस्सा होता मोदी कुर्त्याबद्दलचा.
अक्षय कुमारने जेव्हा त्यांना त्यांच्या फॉशन स्टेटमेंटबद्दल आणि त्यांच्या हाफ स्लिव्हज कुर्त्याबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले, "जसं माझ्या कडक आणि शिस्तप्रिय स्वभावाबद्दल एक प्रतिमा बनवली गेलीये, तशीच प्रतिमा माझ्या फॅशनसंदर्भात देखील आहे. गुजरातचा मुख्यमंत्री बनण्याआधी मी स्वत:चे कपडे स्वत: धुवायचो. त्यात माझ्याकडे एक छोटी बॅग होती. त्यामध्ये माझे कपडे मावायचे नाहीत. म्हणून मी स्वतः त्याचे स्लिव्हज कापले.
त्यामुळे माझ्या बॅगेत जागा देखील झाली आणि माझे पूर्ण कपडे धुवायचे कष्ट ही वाचले."मोदींच्या भाषणात नेहमीच तरुणांचा उल्लेख असतो. त्यांच्या फॅशन सेन्समुळे तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असू शकतो. याविषयी भरत दाभोळकर सांगतात, "भुरळ असं नाही म्हणता येणार पण मोदींचं अनेक तरूण अनुकरण करताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या या गमछाचं देखील अनुकरण होऊ शकतं. कारण महाग मास्क घेणं सगळ्यांनाच परवडत नाही."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








