You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची खरी आकडेवारी मिळणं का आहे कठीण?
- Author, फैझल मोहम्मद अली
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारतात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी 1 लाख 73 हजारांच्या घरात आहे. तर जवळपास 4900 लोकांचा कोव्हिड-19 ने मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांच्या आकडेवारीवर शंका उपस्थित होत आहेत आणि यामागे अनेक कारणंही आहेत.
शहरी भागात स्मशानभूमी, दफनभूमी अशा ठिकाणांहून मृतांची आकडेवारी गोळा करता येते. मात्र, गावाखेड्यांमधून आकडेवारी गोळा करणं सोपं नाही. अनेक जण मोकळ्या जागेत आणि अनेक ठिकाणी तर स्वतःच्या मालकीच्या जागेतच अंत्यविधी आटोपले जातात.
सामान्यपणे भारतात केवळ 22 टक्के मृत्यूंची नोंद होऊ शकते. जे मृत्यू गावांमध्ये किंवा घरी होतात त्यापैकी बहुतेकांचे मेडिकल सर्टिफिकेट नसतात. मेडिकल सर्टिफिकेट नसल्याने मृत्यू कशामुळे झाला, हे खात्रीशीरपणे सांगता येत नाही.
ज्यांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये झाला, ज्यांचे कोव्हिड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह होते आणि श्वसन यंत्रणेत बिघाड झाल्याने मृत्यू झाला असेल अशाच मृत्यूची नोंद कोरोना मृत्यू म्हणून होते.
वेगवेगळे निकष
कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या आकडेवारीवरून वाद निर्माण झाल्यावर इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने गाईडलाईन्समध्ये काही बदल केले. यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी या प्रकरणांची नोंद आपापल्या परीने ठेवली जायची.
कोव्हिड-19 वर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सांगण्यात आलं आहे की ज्या केसेसमध्ये न्युमोनिया, श्वसन यंत्रणा बंद पडल्याने किंवा हृदय बंद पडल्याने रुग्णाचा मृत्यू झाला असेल फक्त त्याच केसेसमध्ये 'कोरोनाची मृत्यूचं मूळ कारण' म्हणून नोंद करावी.
या नव्या नियमावलीनुसार डॉक्टरांना तीन कॉलम्स भरावे लागतील. यात मृत्यूचं तत्कालिक कारण, पूर्वीचं कारण आणि इतर कारणं भरावी लागतील.
कोरोना संसर्गामध्ये मृत्यू होणाऱ्या बहुतांश रुग्णांना डायबिटीज, हृदयासंबंधीचे आजार किंवा इतर काही गंभीर आजार असतात. याला को-मॉर्बिडिटी म्हणतात. म्हणजे कोरोनाव्यतिरिक्त इतर काही कारणं ज्यामुळे एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो.
एकूण काय तर मेडिकल सर्टिफिकेटवर मृत्यूचं मूळ कारण कोरोना संसर्ग हे लिहिलेलं नसेल तोवर त्याची नोंद 'कोरोना मृत्यू' म्हणून होत नाही.
ज्या मृत्यूचे मेडिकल सर्टिफिकेट असतात त्यावरूनही बरेचदा मृत्यूचं नेमकं कारण कळत नाही. अशा केसेस केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही आहेत.
डेथ सर्टिफिकेट
इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मेडिकल सर्टिफिकेट ऑफ डेथ आणि एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून मिळणारं मृत्यू प्रमाणपत्र म्हणजेच डेथ सर्टिफिकेट या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
म्युनिसिपल एरिया सर्टिफिकेट केवळ एवढंच सांगतो की अमुक एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मालमत्तेचं वाटप, पेंशन, बँक आणि अशा इतर कामांसाठी हे प्रमाणपत्र गरजेचं असतं. मात्र, मेडिकल सर्टिफिकेट ऑफ डेथमध्ये मृत्यूचं नेमकं कारण काय होतं, हेदेखील नमूद केलेलं असतं. - वैद्यकीय आधारावर.
पब्लिक हेल्थ एक्सपर्ट डॉ. सिल्विया कर्पगम म्हणतात, "बहुतेकवेळा डॉक्टर मृत्यूचं नेमकं कारण लिहिण्यासाठी प्रशिक्षित नसतात. मृत्यू कसा झाला आणि मृत्यूचं कारण काय होतं, यावरूनही मेडिकल सर्टिफिकेटमध्ये बरेचदा संभ्रम असतो."
वयोवृद्ध किंवा ज्यांना आधीच कुठलातरी आजार आहे त्यांच्यासाठी हा विषाणू प्राणघातक असण्याची शक्यता जास्त असल्याचं समोर येतंय. अशा कुठल्यातरी आजारामुळे कुणी हॉस्पिटलमध्ये भर्ती होत असेल तर त्यांच्या मृत्यूचं कारण काय लिहावं? उदारणार्थ कोरोना की मग हृदयासंबंधीचा आजार?
शिवाय त्या मृत्यूंचाही प्रश्न आहेच जे कोरोना पॉझिटिव्ह होते. पण त्यांच्यात कोरोना संसर्गाची कुठलीच लक्षणं दिसली नाही. टेस्ट केल्या नाही आणि मृत्यू झाला.
काहींचं असंही म्हणणं आहे की लोकांचं धैर्य खचू नये आणि परिस्थिती हाताळू न शकल्याचं खापर आपल्या माथी फोडलं जाऊ नये, यासाठी सरकार मृतांची संख्या कमीत कमी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हे केंद्र आणि राज्य सरकार दोघांवरही लागू होतं.
आरोग्य क्षेत्राशी संबंधित लोकांचं म्हणणं आहे की सरकारी नियंत्रणामुळे भारतात कुठल्याही आजाराचा फैलाव किंवा असा काही आजार असण्याची आकडेवारी पुढे येत नाही.
एकीकडे तामिळनाडूमध्ये मलेरियाने होणाऱ्या मृत्यूंना फिव्हर डेथचं नाव देण्यात आलं आणि चेन्नईसारख्या ठिकाणावरून मलेरिया हद्दपार झाल्याचं मानलं गेल्याचंही सांगितलं जातं. तर पश्चिम बंगालमध्ये कॉलराला सुरुवातीला गॅस्ट्रोइंट्राइटिस म्हटलं गेलं होतं.
आकडेवारीच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह
कोरोना काळात पश्चिम बंगालमध्ये अशा मृत्यूंची नोंद करण्यासाठी एक ऑडिट पॅनलची स्थापना करण्यात आली होती. यावरून बराच वाद झाला. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची इतर आजाराने झालेला मृत्यू अशी नोंद झाल्याचं म्हटलं गेलं.
दिल्लीच्या बाबतीतही अनेक महापालिका क्षेत्रांनी हे आरोप केले होते की त्यांच्या भागातल्या स्मशानभूमी आणि दफनभूमींमध्ये जे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांची संख्या आणि अरविंद केजरीवाल सरकारद्वारे देण्यात येणाऱ्या मृत्यूची आकडेवारी यात बरीच तफावत आहे.
हॉस्पिटलमधून जारी होणारी आकडेवारी आणि दिल्ली आरोग्य मंत्रालयाची आकडेवारी यातल्या फरकाचा मुद्दा तर दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतही उपस्थित करण्यात आला होता. हॉस्पिटलमधून आकडेवारी पाठवण्यात उशीर झाल्याने हा फरक दिसत असल्याचं स्पष्टीकरण त्यावेळी देण्यात आलं होतं.
मृतांच्या आकडेवारीतल्या फरकाचा मुद्दा यापूर्वीही समोर येत होता. 2005 साली भारताने एचआयव्हीशी संबंधित मृत्यूची जी आकडेवारी दिली होती ती जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या आकडेवारीपेक्षा खूप कमी होती. तर मलेरियाच्या बाबतीत जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीपेक्षा पाचपट अधिक होती.
डॉ. सिल्विया सांगतात की सरकारदरबारी आकडेवारी जमा करणं खाजगी हॉस्पिटलसाठी अजूनही बंधनकारक नाही आणि बरेचदा बदनामीच्या भीतीने अशी आकडेवारी लपवली जाते.
कोरोना संसर्गाविषयी ज्या पद्धतीची विचारसरणी बनली आहे तीसुद्धा याचं मोठं कारण असू शकते. मात्र, या अनुषंगाने जागरुकता निर्माण करण्याचा बराच प्रयत्न सरकारकडून झाला आहे.
मात्र, जाणकारांच्या मते भारतात इतर देशांच्या तुलनेत अजूनही टेस्टिंगचं प्रमाण खूप कमी आहे आणि जोवर चाचण्यांची संख्या वाढत नाही तोवर या आजाराच्या फैलावाविषयी कुठल्याही प्रकारची योग्य माहिती मिळू शकत नाही.
मात्र, कोच्चीतले जाणकार के. आर. अॅन्थोनी म्हणतात की भारतात कोव्हिड-19 च्या केसेस कमी आहेत, याकडे इतर अंगांनीही बघितलं पाहिजे.
अॅन्थोनी म्हणतात, "इटली, अमेरिकेसारख्या देशांच्या तुलनेत भारत तरुणांचा देश आहे. त्यामुळे मरणाऱ्यांची संख्या इथे कमी आहे. याकडे दुर्लक्ष करता येत नाही. शिवाय, पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात घरातल्या ज्येष्ठांना सोबत ठेवणं आणि त्यांची देखभाल करण्याची संस्कृती आहे, याचाही फायदा आपल्याला मिळतोय."
मात्र, चुकीच्या वेळी केलेला लॉकडाऊन आणि त्यानंतर प्रवासी मजुरांची अवस्था यामुळे बरंच नुकसान झाल्याचंही ते मान्य करतात.
जाणकार हेही सांगतात की हा नवा आजार आहे आणि केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगातच हा आजार समजून घेण्यासाठीची संशोधनं सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वीच चीनने कोरोना संसर्गामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी अपडेट केली आणि त्यात पाच टक्क्यांची वाढ दाखवली.
अशाच प्रकारे न्यूयॉर्क या शहरातल्या मृत्यूंमध्येही 3700 ने वाढ झाली. यात त्या मृत्यूंचाही समावेश करण्यात आला जे संशयित मृत्यू होते आणि काही कारणांमुळे त्यांची चाचणी झालेली नव्हती.
जागतिक आरोग्य संघटनेचे दिशानिर्देश
जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाईन्सनुसार एखाद्याला ताप, घसा दुखणे, कोरडा खोकला आणि सोबतच श्वास घ्यायला त्रास होत असेल तर अशा व्यक्तिला संशयित कोरोनाग्रस्त मानलं जाऊ शकतं. जर त्याने गेल्या काही दिवसात कोरोना संक्रमित भागाचा दौरा केला असेल किंवा अशा व्यक्तीच्या संपर्कात आला असेल जो कोरोनाग्रस्त होता तर त्यालाही संशयित कोरोनाग्रस्त मानलं जाऊ शकतं.
लक्षणांच्या आधारे एखाद्याला संशयित घोषित केल्यानतंर त्याची आरटी-पीसीआर चाचणी करायला हवी.
रिपोर्ट येण्याआधीच व्यक्तीचा मृत्यू झाला तर हा मृत्यू कोव्हिड-19 ने झाला असं मानलं जाईल. मृत्यू प्रमाणपत्रावरही हेच नमूद करण्यात येईल. यासाठी एक आंतरराष्ट्रीय कोडही जारी करण्यात आला आहे.
संबंधित व्यक्तीला आधीच काही आजार असतील तर त्याचाही उल्लेख करणं बंधनकारक आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)