नरेंद्र मोदी यांच्यावर संजय राऊत यांचे 'सामना'तून टीकास्त्र #5मोठ्याबातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी, कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी

वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.

1. 'हिटलरने 'ज्यूं'चा छळ केला,मग हा छळ काय कमी आहे ?'

शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'चे संपादक संजय राऊत यांच्या 'रोखठोक' स्तंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना अप्रत्यक्षपणे हुकूमशहा हिटलरशी करण्यात आली आहे. देशभरात पाच ते सहा कोटी मजूर स्थलांतर करत असताना त्यांच्या वाटेला काश्मिरी पंडितांप्रमाणे निर्वासित जगणे आल्याची टीका 'सामना'तून करण्यात आली आहे.

"कोरोनाच्या आरोग्य संकटामुळे मजुरांच्या हाताला काम मिळालं नाही, म्हणून त्यांना आपल्या घरी चालत जावं लागलं. वाटेत अनेकांना दुर्देवी मरण आलं. ज्यांना हिटलरच्या क्रूरतेविषयी राग आहे, हिटलरने 'ज्यूं'चा छळ केला, त्यांना मारले म्हणून संताप आहे त्यांनी स्थलांतरित मजुरांच्या बाबतीत काय वर्तन केले?" असा प्रश्न उपस्थित करत सामनातून केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

"वाराणशीला सफाई कामगारांचे पाय आपल्या हाताने धुणाऱ्या मोदींची माणुसकी गेल्या तीन महिन्यांपासून अदृश्य झाली काय?" असा प्रश्नही सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.

कोरोना
लाईन

शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले आहे. यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस भडकले. त्यांनी पवारांना मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहावे, असा त्रागा केला.

फडणवीसांना पंतप्रधानांना पत्र लिहिण्यापासून कुणी रोखलंय? असा प्रश्न सामनातून विचारण्यात आलाय. फडणवीस आणि त्यांचे सहकारी पंतप्रधान आणि राज्यपालांशी फक्त राज्य सरकारच्या अपयशाबाबत बोलतात. त्यामुळे फडणवीसांचा राज्य सरकार बरखास्त करणे, हा एकमेव कार्यक्रम असल्याचा आरोपही करण्यात आलाय.

2. लॉकडाऊनमध्ये शेती व्यवसाय आशेचा किरण- आरबीआय

लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच क्षेत्रात अर्थव्यवस्था कोलमडली असताना कृषी क्षेत्र मात्र याला अपवाद असल्याचं मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलं आहे. शेतीमुळे अर्थव्यवस्थेला झळाळी मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केलीय. 'सकाळ'ने बातमी दिली आहे.

उन्हाळी हंगामात वाढलेली पेरणी आणि चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे खरीप लागवडीत वाढ झाली आहे. त्यामुळे शेती व्यवसायात दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शक्तिकांता दास

तसंच आरबीआयकडून काही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचंही त्यांनी जाहीर केले. सर्वसामान्यांना तीन महिन्यांसाठी कर्जाचे हफ्ते न भरण्याची मुभा देण्यात आली होती. त्या मुदतीमध्ये आता वाढ करण्यात आली आहे.

तसंच रेपो दरात 0.40 टक्क्याची कपात केलीय. बँकेचा रेपो दर आता 4 टक्के झाला आहे. यामुळे गृह,वाहन, आणि औद्योगिक कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.

3. राज्यपालांना हवीय स्वतंत्र आस्थापना?

राज्य सरकार विरुद्ध विरोधक आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष होत असल्याचे पहायला मिळत असताना राजभवनालाच मुख्यमंत्र्यांच्या प्रशासकीय नियंत्रणातून मुक्त करण्याची हालचाली सुरू झाल्या आहेत. अशी बातमी 'लोकसत्ता' वृत्तपत्रात आज प्रसिद्ध करण्यात आलीय.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भगतसिंह कोश्यारी

विरोधकांसहीत विविध राजकीय नेते राज्यपालांची वारंवार भेट घेत आहेत. यामुळे राज्यपाल हे समांतर सत्ताकेंद्र चालवू पाहत असल्याची टीकाही केली जातेय. अशा वातावरणात आता राज्यपालांकडूनच राज्य सरकारला एक प्रस्ताव देण्यात आला आहे, असं या बातमीत म्हटलंय.

उच्च न्यायालय, विधिमंडळाच्याधर्तीवर राजभवनासाठी स्वतंत्र आस्थापना असावी असा प्रस्ताव राज्यपालांकडून देण्यात आला आहे. पण हे कोणत्याही नियमात बसत नसल्याने प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आला आहे.

4. बारामती लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार ?

पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्या चेकमेट या पुस्तकात 2019 विधानसभा निवडणूकीनंतर घडलेल्या राजकीय घडामोडींबाबत अनेक गौप्यस्फोट करण्यात आलेत. राष्ट्रवादी काँग्रसेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याचे ठरल्याचंही या पुस्तकात म्हटलंय. याची चर्चा भाजपाच्या मोबाईल कॉल ग्रुपवर पुण्यात झालेल्या बैठकीतही झाली.

'सरकारनामा'ने ही बातमी दिली आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत दौंडचे आमदार राहूल कुल यांना 'तुम्ही बारामती पोटनिवडणूकीसाठी तयार आहात ना?' असा प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारताच कुल यांनाही धक्का बसला.

"तुम्ही बारामती लोकसभा पोटनिवडणूकीसाठी तयार रहा," अशा सूचना पाटील यांनी दिली आहे. यामुळे सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार का, अशा राजकीय चर्चांना उधाण आलंय.

5. योगी आदित्यनाथ यांना धमकावणाऱ्या तरुणाला मुंबईत अटक

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवणार असल्याची धमकी उत्तर प्रदेश पोलीस मुख्यालयाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर देण्यात आली होती. योगी आदित्यनाथ समाजाचे शत्रू असल्याचं मेसेजमध्ये लिहिलं होतं. या प्रकरणात मुंबईहून एकाला अटक करण्यात आली आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

कमरान अमीन खान (वय 25) असे त्याचे नाव असूनमुंबई एटीएसने अटक केलीय. सायबर सेलच्या मदतीने आरोपीला दोन दिवसात शोधण्यात आले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)