'कोरोना व्हायरस थैमान घालत असताना मी स्पेनमध्ये उतरले तेव्हा...'

कोरोना, स्पेन
फोटो कॅप्शन, स्पेनमध्ये बीबीसीच्या पत्रकार प्रतीक्षा घिल्डियाल
    • Author, प्रतीक्षा घिल्डियाल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

कोरोनाने थैमान घातलेल्या स्पेनमध्ये बीबीसीच्या पत्रकार प्रतीक्षा घिल्डियाल यांना कामानिमित्ताने जावं लागलं. स्पेनमधला त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात.

मार्चचा महिना होता. दिल्लीत हलकं ऊन पडलं होतं. मी घरीच बातमी बघत बसले होते. भारतात कोरोना विषाणूचं नुकतंच आगमन झालं होतं. लोक याबद्दल बोलत होते. पण राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रात हा विषय अजून तरी आलेला नव्हता.

कोरोनाने भारतात हैदोस घातला तर त्याचं वार्तांकन आपण कसं करणार आहोत, हा विचार माझ्या डोक्यात घोळत होता. भारताची आरोग्य यंत्रणा तोकडी आहे. त्यामुळे हजारो लोकांचे जीव जाऊ शकतात, ही भीती होतीच.

तेवढ्यात माझा फोन वाजला. माझ्या वरिष्ठांचा फोन होता. त्यांनी मला विचारलं, "तू फ्लाईटने स्पेनला जाऊ शकतेस का?"

स्पेनमध्ये कोरोना विषाणूचा वेगाने फैलाव होत होता. ही साथ नियंत्रणात आणण्यासाठी तिथे नुकतीच लॉकडाऊनची सुरुवात झाली होती. तोवर स्पेनमध्ये सहा हजारांहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली होती. तर जवळपास 200 जणांचा मृत्यू झाला होता.

भारताचा कोरोनाच्या खऱ्या रूपाशी अजून सामना झालेला नव्हता. मात्र, स्पेनला त्याने विळखा घातला होता. स्पेन आज जगातल्या सर्वाधिक कोरोनाग्रस्त देशांपैकी एक आहे आणि तिथे मृतांची संख्या 25 हजारांहूनही अधिक झालेली आहे.

चेहऱ्यावर मास्क बांधून आणि हँड सॅनेटायझरच्या बाटल्या सोबत घेऊन मी दिल्ली विमानतळावर पोहोचले. मार्चचा निम्मा महिना उलटून गेला होता आणि भारतात लोक अगदी सामान्यपणे वावरत होते. विमानतळावर जेमतेम निम्म्या लोकांनी चेहऱ्यावर मास्क घातले होते. सोशल डिस्टन्सिंगही फारसं पाळलं जात नव्हतं.

फ्लाईट प्रवाशांनी भरलेली होती. विमानात आम्हाला फूड पॅकेट्स देण्यात आले. माझ्या डोक्यात विचार आला कितीतरी लोकांनी मिळून हे जेवण बनवलं असणार आणि कितीतरी लोकांच्या हातातून ते इथपर्यंत आलं असणार. या प्लॅस्टिकच्या पिशवीतलं जेवण सुरक्षित असेल का?

माझ्या शेजारी बसलेल्या महिलेने घरूनच डबा आणला होता. तिने काही ते विमानातलं जेवण घेतलं नाही. मीही असंच केलं असतं तर... माझ्या मनात विचार तरळून गेला. मात्र माझ्या काळजीवर भुकेने मात केली आणि मी ते जेवणं खाल्लं.

कोरोना
लाईन

माद्रीदमधल्या गर्दीच्या वेळेच्या थोडं आधी मी तिथे पोहोचले. कारने हॉटेलला जायला निघाले. मात्र रस्ता सामसूम होता. रस्त्यावर खूप कमी लोक दिसले. बसमध्येही दोन-तीनच प्रवासी होते.

यावेळी भारतात सगळं सामान्यपणे सुरू होतं. त्यामुळे माद्रीदला पोहोचल्यावर हे सगळं बघून मला जरा विचित्र वाटलं. मी हॉटेलवर माझ्या सहकाऱ्यांना भेटले आणि तिथून आम्ही भयाण शांतता पसरलेल्या या शहराच्या चित्रीकरणासाठी निघालो.

दुकानं आणि रेस्टॉरंट्स बंद होती. नेहमी वर्दळ असलेली पर्यटनाची ठिकाणंही ओस पडली होती. माझा स्पेनचा पहिला प्रवास असा असेल, याची मी कल्पनाही केली नव्हती.

मी माद्रीदमधले कॅफे आणि बार्सबद्दल बरंच ऐकलं होतं. मात्र, एका नव्याच जगात मी प्रवेश केला होता. चित्रिकरणादरम्यान माझ्या लक्षात आलं की अख्ख्या माद्रीदमध्ये एक कॉफीही मिळू शकत नव्हती.

कोरोना, स्पेन
फोटो कॅप्शन, स्पेनमधली परिस्थिती

पुढच्या काही दिवसात मी या 'न्यू नॉर्मल' परिस्थितीशी जुळवून घेतलं. हॉटेलमध्ये आम्हाला ऑर्डर केल्यावरच जेवण मिळायचं. जवळपास रोजच आम्हाला हॉटेल बदलावं लागायचं, कारण एकतर हॉटेल बंद व्हायचं किंवा बातमीसाठी आम्हाला दुसरीकडे जावं लागायचं. रोज सामान पॅक करणं आणि रोज हॉटेलमधून चेक आऊट करणं, या सगळ्या गडबडीत मी जवळपास प्रत्येक हॉटेलमध्ये कपडे किंवा सामानातलं इतर काहीतरी विसरत होते.

स्पेनमध्ये संक्रमणाचं प्रमाण वेगाने वाढत होतं. त्यामुळे सुरक्षित राहण्याचा आम्ही सगळे पुरेपूर प्रयत्न करत होतो. अनेकजण घरातच होते. मात्र, आमच्या व्यवसायामुळे आम्हाला रोजच विषाणूचा सामना करावा लागत होता.

आमच्या टीममध्ये आम्ही चौघे होतो. सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं म्हणून दोन कार भाडेतत्त्वावर घेतल्या होत्या. आम्ही स्वतःच ड्राईव्ह करायचो आणि कार आपल्याशिवाय इतर कुणीही वापरू नये, यावर कटाक्षाने लक्ष ठेवायचो.

सुरक्षित राहण्याचा आणखी एक मार्ग होता 'बूम माईक' वापरणं. या माईकला एक दांडा होता, त्यामुळे इतरांपासून सुरक्षित अंतरावर उभं राहून प्रतिक्रिया, मुलाखत घेता यायची.

कोरोना, स्पेन
फोटो कॅप्शन, स्पेनमधल्या चौकातलं दृश्य

स्पेनमध्ये हॉस्पिटल आणि वृद्धाश्रम कोरोना उद्रेकाचं केंद्रबिंदू बनले होते. या ठिकाणी रिपोर्टिंग करताना आम्ही कटाक्षाने मास्क वापरायचो आणि वारंवार साबणाने किंवा हँड सॅनेटायझरने हात स्वच्छ धुवायचो.

हॉटेल रूमच्या दारांचे हँडल आणि बाथरूममधल्या नळांना स्पर्श करतानाही मला खूप भीती वाटायची, म्हणून मी ते सर्वही वारंवार धुवायचे. खोलीत कुणालाही येऊ द्यायचं नाही आणि खोली स्वतःच स्वच्छ करायची, हे आम्ही ठरवलं होतं.

खोली स्वच्छ करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला याचं फार आश्चर्य वाटलं आणि जरा संशयही आला. पण आम्ही तिला सांगितलं की हे आमच्या आणि तिच्या, दोघांच्या सुरक्षेसाठी आहे.

मी स्पेनमध्ये 18 दिवस होते. या 18 दिवसात मी या देशाला हतबल होताना बघितलं. रुग्णांची संख्या वाढल्याने अतिदक्षता विभागांवरचा भार वाढत होता. अनेकांना एकाकी मरण येत होतं. शेवटच्या क्षणी जवळची माणसंही जवळ नसायची. या कहाण्या ऐकणं सर्वांत जास्त त्रासदायक होतं.

कोरोना विषाणूचा सामना करणाऱ्या इतर अनेक देशांप्रमाणेच स्पेनमध्येही गर्दी करण्यावर बंदी होती. त्यामुळे मृत्यू झालेल्यांना सन्मानाने शेवटचा निरोपही देता येत नव्हता.

कोरोना, स्पेन
फोटो कॅप्शन, स्पेनमध्ये कोरोनाने थैमान घातलं होतं.

स्पेनमधल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना विषाणूची लागण होण्याचा दरही काळजीचं कारण होतं. तोवर जवळपास 12 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. अॅम्ब्युलन्सचे ड्रायव्हर असलेले हिगिनिओ डेलगॅडो अल्वारेझ यांनाही सारखी धास्ती लागून होती.

आपला प्रोटेक्टिव्ह सूट फाटला किंवा एखाद्या रुग्णाने चुकून आपल्यावर थुंकलं तर आपल्याला संसर्ग होईल, याची भीती त्यांना होती. ते म्हणाले, "क्लोज कॉन्टॅक्टची सर्वांत जास्त भीती वाटते."

मजबूत आरोग्ययंत्रणा असलेल्या देशाची अशी परिस्थिती कुणाच्याही आकलानापलीकडची होती. या परिस्थितीतही कोरोनाच्या लढाईत खारीचा वाटा उचलून देशाला मदत करण्याचा प्रयत्न करणारे अनेक हिरो आम्हाला रोज भेटायचे.

काही जण आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी फेस मास्क आणि चेहरा झाकण्यासाठीचे सूट बनवत होते. एका हॉटेल व्यावसायिकेने सांगितलं की गरज पडली तर हॉस्पिटलसाठी हॉटेलचे बेड्स द्यायलाही तयार आहे. इतकंच नाही तर स्पेनचे लोक रोज रात्री आठ वाजता आपापल्या बाल्कनीत येऊन आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी टाळ्या वाजवत होते.

कोरोना, स्पेन
फोटो कॅप्शन, बीबीसीच्या पत्रकार प्रतीक्षा घिल्डियाल

दिवसामागून दिवस गेले आणि हळुहळू स्पेनमधली परिस्थिती सुधारू लागली तशी माझी जाण्याची वेळ झाली. मात्र, आता मी दिल्लीला परत जाऊ शकत नव्हते. कारण तोपर्यंत भारतानेही कोरोना विषाणूच्या फैलावाला आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली होती. याचाच एक भाग म्हणून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद करण्यात आली होती. भारताची लोकसंख्या आणि दुबळी आरोग्य यंत्रणा बघता सरकारला दुसरा पर्याय दिसला नसावा.

त्यामुळे मी युकेला जाण्याचा निर्णय घेतला. युकेला बीबीसीचं मुख्यालय आहे. जोवर घरी जाता येत नाही तोवर तिथे थांबावं, असं मी ठरवलं. स्पेनहून निघताना मात्र मला विमान प्रवासाची चांगलीच भीती वाटत होती. माद्रीद विमानतळावर सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन करण्यात येत होतं. एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवा, अशी उद्घोषणा वारंवार होत होती.

फ्लाईटही जवळपास रिकामी होती. मी लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टवर पोहोचले. एरवी प्रवाशांनी ओसंडून वाहत असलेल्या या विमानतळाच्या इमिग्रेशनच्या रांगेत यावेळी पहिल्यांदाच मी एकटी होते.

मी स्पेनवरून आल्यामुळे लंडनमध्ये आल्यावर मला लगेच आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आलं. हळूहळू मी जे स्पेनमध्ये बघितलं त्याचाच अनुभव मला लंडनमध्ये येऊ लागला. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी उपकरणांची कमतरता, उशिराने लागू केलेला लॉकडाऊन, टेस्ट किट्सची कमतरता आणि उशिराने पावलं उचलली, अशी राजकारण्यांवर उठलेली टीकेची झोड... युरोपातल्या अनेक देशांमध्ये हाच पॅटर्न बघायला मिळत होता.

कोरोना, स्पेन
फोटो कॅप्शन, स्पेनमध्ये चिंताजनक परिस्थिती होती.

दरम्यानच्या काळात भारतात लॉकडाऊन वाढवण्यात आला. आपल्या घरी लवकरात लवकर परतण्याची कुठलीच चिन्हं मला दिसत नाहीत. जवळपास महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे आणि मला माझ्या नवऱ्याची आठवण येऊ लागली आहे. तोही लॉकडाऊनमुळे दिल्लीत घरातच अडकला आहे.

कोरोना काळात साता समुद्रापारच्या प्रवासाने आपल्याला एक गोष्ट मात्र शिकवली आहे - एकमेकांसोबत राहण्याला गृहीत धरलं जाऊ शकत नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)