कोरोना व्हायरस: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचे मृत्यू का होत आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठीसाठी
महाराष्ट्रात, खासकरून मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरात कोरोनाचं संकट अधिक गडद झालंय. मुंबईसह राज्यात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढते आहे. राज्यात मृत्यूची टक्केवारी कमी झाली असली तरी, कोरोनाग्रस्तांचे मृत्यू राज्य सरकारसाठी मोठा चिंतेचा विषय आहे.
कोरोनामुळे राज्यात आणि मुंबई महानगर क्षेत्रात होणाऱ्या मृत्यूंचं डेथ ऑडिट करण्यासाठी सरकारने समिती स्थापन केली होती. या समितीने आपला प्राथमिक अहवाल राज्य सरकारला दिलाय. कोरोनाची लक्षणं दिसून आल्यानंतर उशिरा रुग्णालयात दाखल झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे.
राज्य सरकारच्या समितीच्या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे :
- मृत्यू पावलेल्या 181 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला
- लक्षणं दिसल्यानंतर उशीरा रुग्णालयात आल्यामुळे अधिक रुग्णांचा मृत्यू
- जवळपास 130 रुग्णांचं वय 50 वर्षांपेक्षा जास्त
- तब्बल 76 टक्के रुग्णांना मधुमेह, उच्चरक्तदाब यांसारखे आजार
- लक्षणं दिसून आल्यानंतर सरासरी 6 ते 7 दिवसात बहुतांश रुग्णांचा मृत्यू
केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता आणि मुंबईतील मोठ्या पालिका रुग्णालयाचे माजी संचालक डॉ. अविनाश सुपे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मुंबई महानगर क्षेत्रात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची कारणमीमांसा करण्यासाठी अभ्यास केला.

फोटो स्रोत, EPA
डॉ. अविनाश सुपे म्हणतात, "लक्षणं दिसून आल्यानंतर उशिरा रुग्णालयात पोहोचल्याने बहुतांश रुग्णांचा मृत्यू झाल्याचं या प्राथमिक अभ्यासात समोर आलंय. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शून्य ते दोन दिवसात (0-2) मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. याचं कारण म्हणजे हे रुग्ण शेवटच्या टप्प्यात, अतिगंभीर परिस्थितीत रुग्णालयात दाखल झाले. लक्षणं दिसून आल्यानंतर सरासरी रुग्णांचा मृत्यूपर्यंतचा कालावधी 6 ते 7 दिवसांचा असल्याची माहिती मिळालीय."
डॉ. सुपे म्हणतात, लोकांनी आणि खासकरून वयस्कर व्यक्तींनी, मधुमेह-उच्चरक्तदाब असलेल्या रुग्णांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी धोक्याचे संकेत वेळीच ओळखले पाहिजेत.
धोक्याचे कोणते संकेत ओळखावे?
- शांत बसले असताना श्वास घेण्यास खूप त्रास होणं
- हृदयाचे ठोके एका मिनिटात 90 पेक्षा जास्त होणं (वैद्यकीय भाषेत याला Tachycardia असं म्हणतात)
- शरीरातील ऑक्सिजनची मात्रा 90 टक्क्यांपेक्षा कमी होणं (Oxymeter ने शरीरातील ऑक्सिजनची मात्रा ओळखता येवू शकते)
- ओठ निळे पडण्यास सुरूवात होणं.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

"लोकांनी वेळीत धोक्याचे संकेत ओळखले आणि कोव्हिड-19 च्या रुग्णांवर उपचारासाठी असलेल्या रुग्णालयात दाखल झाले तर, जास्तीत-जास्त रुग्णांचा जीव वाचवता येणं शक्य होईल. मात्र, यासाठी लोकांनी वेळीच धोका ओळखून रुग्णालयात पोहोचलं पाहिजे," असं डॉ. सुपे पुढे म्हणाले.
कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचं कारण
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार,
- रुग्णालयात दाखल होवून शून्य (0) ते 2 दिवसात मृत्यू होणाऱ्यांची संख्या 80
- लक्षणं दिसू लागल्यानंतर 3 ते 5 दिवसात मृत्यू- जवळपास 84
- रुग्ण उशिरा रुग्णालयात आल्यामुळे वैद्यकीय उपचार वेळीच करता आले नाहीत (Early Intervention was not posible)
- लक्षणं दिसून आल्यानंतर तीन दिवसात रुग्णालयात दाखल झालेल्यांचे मृत्यू कमी

फोटो स्रोत, Getty Images
राज्याच्या आरोग्य संचलनालयाचे आयुक्त डॉ. अनुप कुमार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोरोनाग्रस्त रुग्णांची लवकरात लवकर ओळख पटवणं. रुग्णांना तात्काळ कोव्हिड-१९ रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करणं. कोव्हिड-१९ रूग्णालयात सुसज्ज उपचारपद्धती आणि मनुष्यबळ याबाबत समितीने शिफारस केली आहे. या रिपोर्टवर सरकार पुढील कारवाई करेल."
समितीने केलेल्या शिफारसी
- रुग्णांची कॅटेगरी ठरवण्यात यावी
- रिस्क प्रोफोईल समजून घेवून रुग्णांना कोव्हिड-१९ किंवा कोव्हिड-१९ हेल्थ सेंटरमध्ये दाखल करण्यात यावं याबाबत निर्णय घ्यावा.
- हाय रिस्क रुग्णांनी कोणत्या रुग्णालयात जावं, त्यांच्यासाठी बेड कोणता याबाबत सेंट्रल हॉटलाईनच्या मदतीने व्यवस्था करावी. जेणेकरून रुग्ण एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात फिरणार नाहीत.
(स्रोत- आरोग्य विभाग)
"लोकांनी लक्षण दिसल्यास वेळ न घालवता, कोव्हिड-१९ रुग्णालयात जावं. जेणेकरून त्यांच्यावर उपचार वेळेत करता येतील, असंही डॉ. अनुप कुमार यादव म्हणाले.
तब्येत चांगली होत असताना अचानक मृत्यू पावलेले रुग्ण
डॉ. सुपे म्हणतात, "अशा रुग्णांची संख्या फार कमी आहे. मात्र, काही रुग्ण उपचारांना साथ देत असतानाच अचानक या रुग्णांची तब्येत खालावून त्यांचा मृत्यू झालाय. याबाबतही आम्ही तपास करतोय."
मुंबईच्या लीलावती रुग्णालयातील छातीविकार तज्ज्ञ डॉ. जलिल परकार यांना देखील असा अनुभव आलाय. रुग्ण उपचारांना चांगला प्रतिसाद देत असताना अचानक गेल्याची माहिती डॉ. परकार यांनी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. जलिल परकार म्हणाले, " माझ्याकडे उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांचा असा अचानक मृत्यू झालाय. हे रुग्ण उपचारांना साथ देत होते. व्हॅन्टिलेटरची गरज कमी झाली होती. तब्येत सुधारत होती. आम्ही ही लढाई जिंकणार असं वाटत असताना मात्र, 8-9 दिवसांनी अचानक या रुग्णांचा मृत्यू झाला. याला "कोव्हिड स्टॉर्म" असं म्हणतात. परदेशातही अशा प्रकारे रुग्णांचे मृत्यू झाले आहेत."
मार्च महिन्यात महाराष्ट्रात पहिल्या कोरोनाग्रस्त रुग्णाची नोंद झाली. गेल्या महिनाभरात हा आकडा 6200 वर जावून पोहोचलाय. राज्यात एप्रिलच्या सुरूवातीला मृत्यूदर ७ टक्के होता. मात्र, आता राज्यातील मृत्यूदर 4.4 टक्क्यांवर आला आहे.
आरोग्यमंत्र्यांचं मत
याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "सद्य स्थितीला राज्यातील मृत्यूदर 4.4 टक्के आहे. एप्रिलच्या सुरूवातीच्या तूलनेत मृत्यूदर कमी झालाय. 269 कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचं विश्लेषण केल्यानंतर 50 वर्षाखालील व्यक्तींचा मृत्यूदर कमी झाल्याचं आढळून आलं आहे. तर, 21 ते 30 वर्ष वयोगटातील व्यक्तींचा मृत्यूदर 0.64 टक्के आहे. मात्र, 61 ते 70 वयोगटातील व्यक्तींचा मृत्यूदर 17.78 टक्के आहे."

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. सपे म्हणतात, "राज्यातील मृत्यूदर कमी होणं ही चांगली गोष्ट आहे. एप्रिलच्या सुरूवातीच्या तुलनेत राज्याची आरोग्यव्यवस्था अधिक बळकट झाली आहे. कोव्हिड-19 रुग्णालयं, कोव्हिड-19 हेल्थ सेंटर सुरू झाली आहेत. रुग्णांची तपासणीदेखील वाढली आहे. त्यामुळे 8 टक्क्यांपर्यंत पोहोचलेला कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदर आता 4.4 टक्क्यांपर्यंत आली आला आहे."
मृत्यूच्या कोणत्या कारणांचा अभ्यास करण्यात आला?
- कोव्हिड-19 ची लक्षणं कधी दिसून आली?
- त्यानंतर रुग्णालयात दाखल होण्यासाठी लागलेला कालावधी?
- रुग्णालयात आल्यानंतर किती दिवसात मृत्यू?
- परदेशी प्रवासाची इतिहास होता का. कोरोनाग्रस्तांच्या थेट संपर्कात आले का?
- जुने आजार किती रुग्णांना?
आजाराची इनिशिअल स्टेज होती का?
डॉ. सुपे पुढे म्हणतात, "मृत्यूच्या कारणांचा अभ्यास करून राज्यातील मृत्यूदर आणखी कसा कमी करता येईल याबाबत उपाययोजना करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मृत्यूच्या कारणांमुळे डॉक्टरांना रुग्णांवर योग्य पद्धतीने लक्ष ठेवता येईल. यासाठी येणाऱ्या दिवसात मृत्यूच्या कारणांचा सखोल अभ्यास केला जाईल."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








