कोरोना व्हायरस : जेव्हा एका डॉक्टरवर आपल्या मृत सहकाऱ्याची कबर खोदण्याची वेळ येते

चेन्नई के सिमोन हरक्यूलस एक न्यूरोलॉजिस्ट थे
    • Author, मुरलीधरन काशी विश्वनाथ
    • Role, बीबीसी तामिळ प्रतिनिधी

चेन्नईमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या डॉक्टराचा मृतदेह पुरण्यास स्थानिकांनी विरोध केला.

यावेळी दफनभूमीबाहेर मोठ्या संख्येने लोक जमले होते. असा विरोध होणारी ही तामिळनाडूतली दुसरी घटना आहे.

चेन्नईतील न्यूरॉलॉजीस्ट डॉ. सिमॉन हरक्यूलस यांचा रविवारी कोरोनावर उपचार घेत असताना मृत्यू झाला.

त्यांना संसर्ग कसा झाला? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. कोरोनाच्या रुग्णांवर ते उपचार करत नव्हते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ते कोलकाताला जाऊन आले होते. पण नजीकच्या काळात परदेशावारी केली नव्हती.

डॉ. सिमॉन यांना चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला दाखल करण्यात आलं होतं. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची लक्षणं दिसत होती. पण त्यांचं शरीर उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने त्यांचा रविवारी मृत्यू झाला. त्याच रात्री 9 वाजता त्यांचा मृतदेह पुरण्यासाठी सोपवण्यात आला.

कोरोना
लाईन

चेन्नईच्या किलपॉक इथल्या दफनभूमीत मृतदेह नेण्यात आला. पण अचानक तिथली परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.

"आम्ही मृतदेह पुरण्याबाबत चर्चा करत होतो तेवढ्यात लोकांची गर्दी जमली. हे लोक अचानक एवढ्या संख्येने कुठून आले? का आले? याबाबत आम्हाला काहीच कल्पना नाही. त्यांना ही माहिती कुठून मिळली आणि नेमकी काय माहिती मिळाली आहे हे आमच्यापैकी कुणालाच माहिती नाही," डॉ.सिमॉन यांचे सहकारी डॉ. प्रदीप यांनी हे प्रश्न उपस्थित केले.

डॉ. प्रदीप यांनी सांगितलं, "100 हून अधिक लोकांची गर्दी असावी. दफनभूमीत त्यावेळी त्यांची पत्नी, मुलगा, काही डॉक्टर सहकारी, महानगरपालिकेचे अधिकारी आणि रुग्णवाहिकेचा चालक उपस्थित होते."

"मृतदेह पुरण्यासाठी आम्हाला 12 फूटांचा खड्डा खोदायचा होता. त्यासाठी आम्ही जेसीबी मशीनच्या सहाय्याने काम सुरू केलं. साधारण 15 मिनिटं खोदकाम सुरू होतं. तेवढ्यात 50 ते 60 जण तिकडे जमले आणि त्यांनी आमच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. आम्हाला जखमा होत होत्या," डॉ. प्रदीप यांनी सांगितलं.

"रुग्णवाहिकेचा चालक यात गंभीर जखमी झाला. त्याला रक्तस्त्राव होऊ लागला. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यानाही सुरक्षेसाठी इकडे तिकडे पळावं लागलं. आम्हाला त्यांचा मृतदेह तिथं पुरता आला नाही."

स्वास्थ्य मंत्री सी विजयभास्कर

मृतदेह पुरण्यासाठी वाहन चालकासोबत डॉ. प्रदीप दुसऱ्या ठइकाणी गेले. पण त्याआधी ते किलपॉकच्या सरकारी रुग्णालयात पोहोचले. तिथं जखमी ड्रायव्हरवर उपचार करण्यात आले.

त्यानंतर आरोग्य विभागाचे अधिकारीही त्यांच्या संपर्कात आले. तोपर्यंत पोलीसही पोहोचले.

दुसऱ्या एका ठिकाणी नेऊन मग तो मृतदेह दफन करण्यात आला.

"दफनभूमीत तुम्ही कधी तुमच्या हाताने खड्डा खणलाय? मी खणलाय. डॉ. सिमॉन यांच्यासाठी आणि अखेर त्यांचा मृतदेह आम्ही पुरला. अशी वेळ कुणावरही येऊ नये," डॉ. प्रदीप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

एखाद्या डॉक्टरबाबत अशी घटना घडल्याचही ही पहिलीच वेळ नाही. नेल्लोरमधल्या एका डॉक्टरांवरही अपोलो रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू होते. त्यांच्या मृत्यूनंतरही असंच घडलं होतं.

उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांच्या नातेवाईकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं. त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

पण जेव्हा मृतदेह अम्बत्तूर स्मशानभूमीत आणला गेला तेव्हा स्थानिकांनी गोंधळ घालत अधिकाऱ्यांना पळवून लावलं.

या घटनेनंतर मृतदेहावर दुसऱ्या शहरात जाऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

राज्य आरोग्य विभागाचे सचिव बिला राजेश यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं, "या घटनेत समन्वयाचा अभाव होता. अशी घटना पुन्हा घडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ."

पण डॉ. सिमॉन यांच्या मृत्यूनंतर घडलेल्या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रातून तिव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. तामिळनाडूत सोमवारपर्यंत 17 जणांचा कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊन मृत्यू झालाय. पण केवळ डॉक्टरांचे अत्यंसंस्कार/दफनवीधीच वादग्रस्त ठरत आहेत.

"जेव्हा डॉक्टरचा मृत्यू होतो तेव्हा त्याची बातमी होते आणि त्यामुळे स्थानिकांना त्याची माहिती प्राप्त होते. या प्रकरणात केवळ स्थानिक नागरिकांना दोष देऊन नाही चालणार. पण सरकारने याप्रकरणी जनजागृती करणं अपेक्षित आहे," डॉ. प्रदीप सांगतात.

"डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आम्ही शक्य तितकी काळजी घेत आहोत. नागरिकांनी जर अशा परिस्थितीत गोंधळ घातला किंवा गुन्हा केला तर त्यांना तातडीने अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवलं जाईल,"असं आरोग्य मंत्री सी. विजयभास्कर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

"केवळ जनतेला दोषी मानून चालणार नाही. जेव्हा एखाद्या डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू होतो तेव्हा जिल्हा पातळीवरील सरकारी अधिकाऱ्यांनी अंत्यविधीसाठी उपस्थित राहून आपला आदर व्यक्त केला पाहीजे. यामुळे स्थानिकांमध्ये विश्वास निर्माण होईल. शिवाय, मृतदेहावर अंत्यसंस्कार/दफनविधी हा रात्री न करता दिवसा केला पाहीजे. जेणेकरून स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही." असं मत सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या संघटनेचे सदस्य डॉ. सुदर्शन यांनी व्यक्त केले.

"हे जागतिक आरोग्य संकट जोपर्यंत आटोक्यात येत नाही तोपर्यंत आपण तातडीने आवश्यक नसणाऱ्या इतर शस्त्रक्रीया थांबवायला हव्यात. डॉक्टरांना पीपीई किट्स द्यायला हवेत," असंही मत डॉ. सुदर्शन यांनी नोंदवलं.

"नेल्लोरेचे डॉक्टर आणि डॉ. सिमॉन हे दोघंही कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करत नव्हते. पण इतर रुग्णांवर उपचार करताना त्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्व डॉक्टरांना पीपीई किट्स आणि इतर सुरक्षा पुरवायला हवी," अशी मागणी चेन्नई मानसोपचार सोसायटीचे डॉ. सीवाबालन यांनी केलीय.

तामिळनाडू ट्रांसप्लांट सर्जरी विभागाचे माजी प्रमुख डॉ. अमलोरपवनथन जोसेफ यांनी समाज माध्यमांवर जनजागृती मोहिम सुरू केलीय. मृतदेहापासून कोरोना व्हायरस पसरत नसल्याबाबत ते जनतेला माहिती देत आहेत.

पण तरीही काही प्रश्न उपस्थित होतात. स्थानिक जनतेत याबाबत इतका रोष का आहे? त्यांना मृतदेह कुणाचा आहे? कुठून आलाय याची माहिती कशी मिळते? राज्य सरकार या प्रकरणी काहीही करण्यास असमर्थ का ठरत आहे?

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)