कोरोना व्हायरस: कोव्हड-19 मुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतोय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजार कोसळल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला खीळ, कोरोनामुळे शेअर बाजारात घसरण, गुंतवणूकदारांमध्ये अविश्वासाचे वातावरण अशा हेडलाइन्स तुमच्या वाचण्यात किंवा ऐकण्यात आल्या असतील.
पण अर्थव्यवस्था ही फक्त शेअर बाजार, गुंतवणूकदार या पुरतीच मर्यादित आहे का? अर्थव्यवस्था ही फक्त याच गोष्टींबद्दल नसते, तर आपल्याकडे जो किराणा येतो, भाज्या येतात, दूध येणं, वाहतूक हे सर्व घटक अर्थव्यवस्थेत येतात. त्यामुळे कोरोनाचा एकूण अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला आणि भविष्यात होऊ शकतो, हे आपण समजून घेऊया.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सोमवारी त्यांच्या एका फेसबुक लाईव्हमध्ये म्हणाले की "कोरोना व्हायरस हे मोठं संकट आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे आणि पुढील 2-3 महिने आपली अर्थव्यवस्था नाजूक राहील. आपण काटकसर करावी."
शरद पवार यांनी अर्थव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली आहे. पण याच बरोबर तुम्ही दोनच दिवसांपूर्वी दिल्लीतील आनंद विहार बस टर्मिनसवर जमलेल्या प्रवाशांची गर्दी तुम्ही पाहिली असेल. शुक्रवारी संध्याकाळी आनंद विहार टर्मिनलवर 30,000 लोक होते, असा अंदाज आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
हे सर्व जण आपापल्या गावी परत जात होते. पण हे लोक कोण आहेत?
यातले बरेच जण हे मजूर, कारखान्यांमधले कामगार आहेत. लॉकडाऊननंतर बांधकाम बंद झालं, उद्योगधंदे, दुकानं बंद झाली. त्याचा परिणाम या लोकांच्या रोजगारावर झाला. रोजगार नसल्यामुळे राहण्याच्या जागेचं भाडं, किराणा, भाज्या अशा गोष्टी विकत घेण्याची त्यांची क्षमता नष्ट झाली आणि हे पुन्हा कधी सुरू होईल याची त्यांना शाश्वती नसल्यामुळे अनेकांनी आपल्या घराची वाट धरली.

- वाचा - कोरोनाचा माझ्या जीवाला किती धोका आहे?
- वाचा -आधी कोव्हिड-19ची किट बनवली, मग बाळाला जन्म दिला
- वाचा-कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा- कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोरोना व्हायरसच्या साथीवर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणतात, "भारतात बहुसंख्य लोक रोजंदारीवर काम करतात. या लॉकडाऊनचा गंभीर परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होईल - आपण सरसकट लॉकडाऊन केल्यामुळे मृतांचा आकडा वाढेल, बेरोजगारी निर्माण होईल.
"आपल्या देशाची परिस्थिती वेगळी आहे. इतर देशांप्रमाणे आपल्याला लॉकडाउन करून भागणार नाही, तर ज्या ज्येष्ठांना धोका आहे त्यांना वेगळं करावं लागेल. या लॉकडाउनमुळे हजारो स्थलांतरितांना आपलं घरदार सोडून रस्त्यावर निघावं लागलं," असंही ते म्हणाले.
जागतिक कामगार संघटनेचं भाकित आहे की केवळ भारतातच नाही तर जगभरात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत आणि भविष्यातही अनेकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार असणार आहे. त्यांचा अंदाज आहे कोरोनामुळे जगभरातल्या अंदाजे अडीच कोटी जणांच्या नोकऱ्या जाणार आहेत.
कोरोनाचं संकट भारतावर आणि जगावरही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 मार्चला केलेल्या 'मन की बात' या कार्यक्रमात सर्व गरीबांची माफी मागितली. "या लॉकडाऊनमध्ये सर्वांत जास्त हाल याच वर्गाचे झाले. हा लढा जीवन आणि मृत्यूचा आहे," असंही ते म्हणाले.

केवळ भारतच नाही तर जगभरातले 190 हून अधिक देश कोरोनामुळे प्रभावित झाले आहेत. भारतात हजारो मजूर स्थलांतर करत आहेत, पण संपूर्ण जगात काय स्थिती आहे.
संयुक्त राष्ट्रांशी संलग्न इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायजेशनने (ILO) म्हटलं आहे की कोरोना व्हायरसच्या साथीमुळे अंदाजे अडीच कोटी रोजगार जातील.
अर्थात, ज्याप्रमाणे 2008-09 मध्ये मंदी आल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करण्यात आले तसे झाले तर आपण या संकटातून बाहेर निघू, असं देखील ILOने म्हटलं आहे.
कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन, कामाचे तास कमी होणं तसेच पगारकपात या गोष्टींमुळे बेरोजगारी वाढू शकते. याचा सर्वांत जास्त फटका विकसनशील देशांना बसेल, असं ILO सांगतं.
2020 मध्ये अडीच कोटी कामगारांचा अंदाजे 860 अब्ज डॉलर ते 3,400 अब्ज डॉलर इतका पगार निघाला असता. पण हे पैसे त्यांच्या खिशात जाणार नाहीत. त्यांच्यावर अवलंबून असलेला दुकानदार वर्गालाही याचं नुकसान सोसावं लागणार आहे.
बरं ज्या कामगार वर्गातील ज्या लोकांजवळ काम किंवा रोजगार असेल त्यांची स्थिती खूप चांगली असणार आहे का? तर त्याचं उत्तर ILO ने दिलं आहे की 90 लाख ते साडे तीन कोटी इतके लोक हे वर्किंग पॉवर्टीमध्ये असतील. म्हणजेच या लोकांकडे काम असेल पण आपल्या गरजा भागवण्याइतकाही पगार त्यांना मिळणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images
कोरोनाचं संकट येण्यापूर्वी जगभरात अशा गरिबांची संख्या 1 कोटी 40 लाख इतकी असावी, असं ILOनेच सांगितलं होतं. पण या कोरोनानंतर हीच संख्या दुप्पट होण्याची शक्यता त्यांनी सांगितली आहे.
या संकटाचा सर्वाधिक फटका मजूर, कामगार वर्ग, महिला आणि स्थलांतरितांना होणार आहे, असं ILO सांगतं.
'विकासदरात घसरण'
भारताच्या समग्र अर्थव्यवस्थेवरही कोरोनाचे गंभीर परिणाम होतील. भारताचा 2020 मध्ये विकासदर 5.3 टक्के राहील, असं भाकीत 'मूडीज' या संस्थेनी केलं होतं. पण आता त्यांनी सांगितलं आहे, भारताचा विकासदर 2.5 टक्के इतका राहील.
'मूडीज' ही क्रेडिट रेटिंग संस्था आहे. एखाद्या देशाची आर्थिक प्रगती कशी राहील आणि त्या आधारावर त्या देशाचं किंवा एखाद्या संस्थेची बाजारात पत किती राहील, याचं नामांकन मूडीज करते. भारताचा विकासदर कमी राहील, असं फक्त 'मूडीज'च नव्हे तर भारताचे माजी प्रमुख सांख्यिकी तज्ज्ञ प्रणव सेन यांनी ही भाकीत केलं आहे की भारताचा विकासदर 3 टक्क्यांहून कमीच राहील.
याचा अर्थ असा आहे की, या 2020-21 या वर्षात भारताला अंदाजे 5 लाख कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. सेन सांगतात की तीन आठवड्यांचं लॉकडाउन आणखी वाढलं तर चित्र बदलू शकतं म्हणजेच आणखी नुकसान होऊ शकतं, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना व्हायरसमुळे मंदी येईल का?
काही महिन्यांसाठी अर्थव्यवस्था खिळखिळी राहिली किंवा सातत्याने विकासदरात घसरण होत असेल तर त्याला रिसेशन किंवा मंदी म्हणतात. हीच स्थिती जर बराच काळ टिकली आणि विकासदर नकारात्मकच झाला तर त्याला डिप्रेशन किंवा महामंदी म्हणतात.
बऱ्याच जणांना आठवत असेल 2008 साली मंदी आली होती. सध्याची जागतिक अर्थव्यवस्था खालावली आहे. या कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी अमेरिका, युनायटेड किंगडम सारख्या देशांनी पॅकेज जाहीर केले आहेत.
युनायटेड किंगडममध्ये जे स्वयंरोजगारावर अवलंबून आहेत त्यांना 2,500 पाउंड प्रति महिना अनुदान मिळणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बीबीसीचे आर्थिक संपादक फैजल इस्लाम यांच्यानुसार, एक गोष्ट नक्की आहे की आपण मंदीमध्ये आहोत. भविष्यात आपल्याला डिप्रेशनची झळ बसू नये, हेच या योजनांचं उद्दिष्ट असतं.
पहिल्या महायुद्धानंतर अमेरिकेत 1929 मध्ये वॉल स्ट्रीट मार्केट पूर्णपणे कोसळलं होतं. त्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी अमेरिकेची आर्थिक स्थिती खालावतच गेली. अंदाजे एक कोटी तीस लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या.
1929 ते 1932 या काळात औद्योगिक उत्पादनात 45 टक्क्यांची घसरण झाली. घराचं बांधकाम 80 टक्क्यांनी कमी झालं. या काळात झालेल्या उपासमारीने 110 लोकांचा मृत्यू झाला होता. यावरुन तुम्हाला ग्रेट डिप्रेशन काय होतं, याचा अंदाज आला असेल.
'जगाचा प्रस्तावित विकासदर 1.5 टक्के राहील'
कोरोना व्हायरसच्या साथीमुळे जगाचा आर्थिक विकासदर मंदावणार असल्याचं ऑर्गनायजेशन फॉर इकोनॉमिक डेव्हलपमेंटचे सेक्रेटरी जनरल एंजल गुर्रिया यांनी म्हटलं आहे. या उद्रेकामुळे जगाचा विकासदर 1.5 टक्के इतका राहणार आहे.
किती नोकऱ्या जातील आणि ही अर्थव्यवस्था पुन्हा केव्हा रुळावर येईल, याचा अंदाज आत्ताच लावणं शक्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
सर्व जग आर्थिक मुद्द्यांवर पुन्हा उसळी मारेल असा विचार करणं, ही सर्वांचीच इच्छा आहे असंही ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
भारताने काय पावलं उचलली आहेत?
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपात करून उद्योग क्षेत्र आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना विषाणूमुळे आर्थिक क्षेत्रावर मोठा परिणाम होणार असून GDPचे अपेक्षित उद्दिष्ट गाठणं कठीण असल्यामुळे व्याजदरात कपात केल्याचं त्यांनी सांगितलं.
रेपो रेट 75 बेसिस पॉइंटने कमी करून 4.4 वर आणला गेला आहे तर रिव्हर्स रेपो रेट 90 बेसिस पॉइंटने कमी करून 4 टक्क्यांवर आणला आहे. कर्ज स्वस्त झाल्यावर उद्योजक आणि गुंतवणूकदार जास्त प्रमाणात कर्ज उचलतात आणि त्यामुळे खर्चाला प्रोत्साहन मिळतं हा त्यामागचा उद्देश असतो. यामुळे 3.7 लाख कोटी रुपये बाजारात उपलब्ध होतील, असं शक्तिकांत दास यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं कारण एकट्या या शहरातूनच देशाचा 5 टक्के GDP निघतो. यातला बराचसं उत्पन्न हे सेवा क्षेत्रातलं आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार मुंबईचं सेवा क्षेत्रातला वर्षाचा टर्नओव्हर 4 लाख कोटी आहे.
लॉकडाउननंतर छोटे मोठे कारखाने बंद झाले आहेत, सप्लाय चेन तुटली आहे, थिएटर बंद झालीत, दुकानं, मॉल बंद झाली, IPL सारख्या स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे गेल्या, इतकंच काय तर मंदिरं बंद झालीत. यामुळे मुंबईचं महिन्याभराचं नुकसान 16,000 कोटी इतकं होईल. म्हणजेच एक दिवस मुंबई बंद असेल तर 500 कोटी रुपयाचं नुकसान होतं.
यावर उपाय काय?
संपूर्ण जगाला तीन स्तरावर काम करावं लागणार, असे उपाय ILOच्याच अहवालामध्ये सांगण्यात आले आहेत. सर्वांनी संगनमताने काम करणं आवश्यक आहे.
1. कामाच्या ठिकाणी असलेल्या मजुरांना संपूर्ण संरक्षण देणं
2. अर्थव्यवस्थेला चालना देऊन नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करणं
3. असलेल्या नोकऱ्यांना टिकवणं
याचबरोबर सर्वांना सामाजिक सुरक्षा देणं, नोकरदारांना पगारी सुट्ट्या देणं, अनुदान देणं, टॅक्समध्ये सूट देणं, या गोष्टी देखील कराव्यात असं ILO ने सांगितलं आहे. राहुल गांधी यांनी देखील पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात सामाजिक सुरक्षेवर भर दिला आहे.
या सर्व गोष्टी सर्वांनी मिळून केल्या तर आपण या संकटातून बाहेर निघूत असा विश्वास ILO ने व्यक्त केला आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









