You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: टाटांकडून 1500 कोटी रुपयांची मदत जाहीर #5मोठ्याबातम्या
वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या आहेत -
1. कोरोना व्हायरस: टाटांकडून 1500 कोटी रुपयांची मदत जाहीर
कोरोनावर मात करण्यासाठी टाटा ट्रस्टने केंद्र सरकारला विविध उपाययोजनांसाठी 500 कोटी रुपयांच्या मदतीची शनिवारी घोषणा केली होती.त्यानंतर काही वेळातच टाटा सन्सने अतिरिक्त 1000 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे टाटा ग्रुपने एकून 1500 कोटी रुपये करोनाशी लढण्यासाठी दिले आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
या संदर्भात टाटा सन्सने एका प्रसिद्धिपत्रकात म्हटलंय की, "कोविड-19 आजारामुळं सध्याची भारतातील आणि जगाची परिस्थिती ही खूपच वाईट झाली आहे. त्यासाठी आपल्याकडून सर्वात चांगली कृती करण्याची हीच वेळ आहे.
नुकतेच, टाटा ट्रस्टचे चेअरमन रतन टाटा यांनी या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यानंतर आता कोविड-19 या आजाराशी लढण्यासाठी आणि त्यासंबंधी कार्यासाठी टाटा सन्स अतिरिक्त 1000 कोटी रुपयांची मदत जाहीर करीत आहे.
"यासाठी टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट आमचे अध्यक्ष रतन टाटा यांच्यासमवेत एकत्र काम करू आणि त्यांच्या पुढाकारांना पूर्ण पाठिंबा देऊ तसेच संपूर्ण हकार्याने कार्य करू."
- वाचा- कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
दरम्यान, अभिनेता अक्षय कुमार यानेही कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी 25 कोटी रुपये दिले आहेत. याशिवाय BCCIने आता मदतीची रक्कम वाढवून 51 कोटी केली आहे.
2. मोदींचं PM CARES तर उद्धव ठाकरेंचं मदतनिधी खातं
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि बाधित रुग्णांच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान सहाय्यता आणि आपत्कालिन स्थिती मदत निधी’ची (पीएम-केअर्स) स्थापना केली आहे. सर्व क्षेत्रातील लोकांना या निधीमध्ये आपली मदत पाठवता येणार आहे.
बिझनेस स्टँडर्डने ही बातमी दिली आहे.
पंतप्रधान या निधीबाबत माहिती देताना म्हणाले, “हा निधी सुदृढ भारत घडवण्यासाठी मोठा मार्ग तयार करेल, तसेच सर्व क्षेत्रातील लोक या निधीमध्ये दान करू शकतात. माझं सर्व भारतीयांना आवाहन आहे की, त्यांनी पीएम-केअर्स निधीत योगदान द्यावे. या निधीद्वारे यापुढे येणाऱ्या अशा प्रकारच्या संकटांचा सामना करण्यासाठी मदत होईल.”
दरम्यान, महाराष्ट्र सरकारनेही कोरोना बाबत मदतनिधी गोळा करण्यासाठी एका बँक खात्याची निर्मिती केली आहे.यया खात्याचा नंबर 39239591720 असून बँक कोड 00300 आहे IFSC कोड SBIN0000300 हा आहे.
3. स्थलांतर करू नका, जेवणाची सोय सरकार करेल - उद्धव ठाकरे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजूर, कामगार यांनी कामाचे ठिकाण सोडून जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या मजुरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यासाठी शासन सक्षम आहे, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.
ते पुढे म्हणाले, "मजूर, कामगारांचे आरोग्य, जेवण यांसह आहे त्याच ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश महसूल यंत्रणेला आणि स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे कोणीही कामाचे ठिकाण सोडून जाऊ नये, मदतीची आवश्यकता असल्यास तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा महानगरांच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग कार्यालयाशी संपर्क साधावा."
दरम्यान, स्थलांतर करणाऱ्या कामगारांच्या जेवणाची सोय टोल नाक्यावर करण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.
4. केंद्राकडून स्थलांतरितांसाठी 29 हजार कोटी रुपये
केंद्र सरकारनं राज्य आपत्ती निवारण निधीअंतर्गत राज्यांना दिलेले 29 हजार कोटी रुपये स्थलांतरित कामगारांच्या जेवण आणि राहण्याच्या सुविधेसाठी वापरण्याची परवानगी केंद्र सरकारनं राज्य सरकारांना केली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
मजूर मोठ्या प्रमाणावर शहरातून गावाकडे स्थलांतर करत आहेत, यामुळे कोरोना व्हायरस पसरू शकतो, ही शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान, देशातील मास्कचा तुटवडा लक्षात घेता केंद्र सरकार 10 लाख मास्क विदेशातून आयात करणार आहे.
5. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. या पार्श्वभूमीवर दूरदर्शनवर 'रामायण' मालिका पुनर्प्रक्षेपीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता झी मराठी वाहिनीवरील मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
न्यूज 18 लोकमत ही बातमी दिलीआहे.
या मालिकेत संभाजी राजेंची भूमिका साकारणारे अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका झी मराठी वाहिनीवर 30 मार्चपासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दुपारी 4 वाजता ही मालिका प्रसारित होईल.
विशेष म्हणजे पहिल्या दिवसाचा दोन तासांचा भाग प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यानंतर दररोज दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल, असं अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेवाचलंतका?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, , ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)