कोरोना व्हायरस गरिबांनी नव्हे, श्रीमंतांनी पसरवलाय- दृष्टिकोन

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, स्थलांतरितांचा लोंढा गावाकडे परतू लागला आहे.
    • Author, प्राध्यापक बद्री नारायण
    • Role, समाजशास्त्रज्ञ, बीबीसी हिंदीकरता

कुठल्याही साथीचा सर्वात मोठा फटका तिथल्या गरीब वर्गालाच बसतो. मात्र, अनेकदा या वर्गालाच साथी पसरण्याचं कारण समजलं जातं.

श्रीमंत आणि मध्यमवर्गीयांचं साधरणत: असंच म्हणणं असतं, की कुठलीही साथ गरिबांच्या खांद्यावर बसून पाय पसरते. मात्र, इतिहास काही वेगळंच सांगतो. कोणतीही साथ ही अभिजन आणि उच्च वर्गाच्या माध्यमातून मध्यमवर्गीय आणि नंतर गरिबांपर्यंत साथ पोहचते.

अलाहबादमधील खेडेगावात राहणाऱ्या एका वयस्कर व्यक्तीशी मी फोनवर बोलत होतो. आमची चर्चा कोरोना आणि त्यासंबंधीच सुरू होती.

बोलता बोलता त्यांनी विचारलं, “कुठलीही महामारी गरिबांच्या खांद्यावर बसून येते की श्रीमंतांच्या?”

खरंतर त्यांचा हा प्रश्न माझ्यासाठी एखाद्या यक्षप्रश्नासारखा होता.

शहरातल्या कुठल्याही मध्यमवर्गीय माणसाला तुम्ही हा प्रश्न विचारलात, तर तो पटदिशी उत्तर देईल, “हे झोपड्यांमध्ये राहणारे लोक अस्वच्छ राहतात आणि दुसरीकडेही अस्वच्छता पसरवतात. यामुळंच वेगवेगळ्या साथी पसरतात.”

इतिहास काय सांगतो?

जगात आतापर्यंत आलेल्या मोठमोठ्या साथींचा इतिहास पाहिल्यास काहीसं धक्कादायक उत्तर सापडतं.

कोरोना
लाईन

1650 ते 1800 या सालांदरम्यान पसरलेली प्लेगची साथ असो वा 1520 च्या दरम्यान कांजिण्या किंवा पिवळा ताप, रशियन फ्लू, एशियन फ्लू, कॉलरा, 1817 दरम्यानचा इंडियन प्लेग असो...या सर्व साथी पसरण्याचं मॅपिंग केल्यास लक्षात येईल, की या साथींचा पहिला कॅरिअर (विषाणू वाहक) श्रीमंत वर्गच होता किंवा श्रीमंतीकडे वळणारा एखादा मध्यमवर्गीय त्याचा कॅरिअर राहिलाय.

मग नेमका कुठला वर्ग जबाबदार?

या सर्व साथी साधरणत: जगाचा शोध घेऊ पाहणारे नाविक, काही व्यापारी, जहाज चालक किंवा जहाजावरील कर्मचारी, युद्धासाठी जाणारे किंवा युद्धाहून परतणारे सैनिक, पर्यटक, वसाहतवादाच्या प्रसादारम्यानच्या वसाहतवादी देशांच्या व्यापारी कंपन्या, त्यातील अधिकारी, कर्मचारी इत्यादींच्या माध्यमातून पसरत आल्या आहेत.

त्यानंतर संबंधित देशातील मध्यम वर्गाकडून खालच्या वर्गात किंवा इतर सामाजिक वर्गांमध्ये साथ पसरत जाते.

कोरोनाचा प्रसार कोणामुळे?

आता ज्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जगातील प्रत्येक देश संघर्ष करतोय, तो विषाणूसुद्धा परेदशी प्रवासाशी संबंधितांनीच पसरवलाय. त्यामध्ये काही पर्यटक, जगभरात हवाई प्रवास करण्याची क्षमता असणारा वर्ग, परदेशात काम करत असलेला वर्ग, जगभरात गायन करत फिरणारे गायक, काही आंतरराष्ट्रीय खेळाडू, काही मोठे नोकरदार, पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टी आयोजित करू शकणारा वर्ग, ग्रीस, स्वित्झर्लंड आणि फ्रांसमध्ये हनिमून साजरा करणारा वर्ग यांचा समावेश आहे.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, स्थलांतरितांनी गावची वाट धरली आहे.

चर्चेदरम्यान माझ्या एका मित्रानं म्हटलं, “हा कोरोना व्हायरस सुद्धा अजबच आहे. विमान प्रवास करतो, मोठ्या हॉटेल्समध्ये थांबतो. जागतिकीकरण आणि नवउदारमतवादी अर्थव्यवस्थेचे सर्वाधिक फायदे उठवणाऱ्या काही लोकांच्या माध्यमातूनच आपल्या देशात पसरलाय.”

“याच लोकांमुळं टॅक्सी ड्रायव्हर, हॉटेलमधील वेटर, दुकानदार, सलूनवाले किंवा नोकरीसाठी घरापासून दूर शहरात आलेल्यांना लागण झाली. जर बारकाईनं पाहिलं तर लक्षात येईल, की वेगवेगळ्या समाजातील प्रभावशाली वर्गाकडून गरीब वर्गापर्यंत ही साथ पसरत गेलीये.”

बिहार, उत्तर प्रदेशहून कामासाठी मुंबई, पुणे किंवा दिल्लीत जाऊन झोपडपट्टीत राहणारा गरीब वर्ग कोरोना व्हायरसचा प्रथम वाहक नाहीये.

विषाणूचे प्रथम वाहक गरीब नाहीत

ज्यांच्या आयुष्यात आपल्याला अस्वच्छता दिसते, ज्यांना आपण आजारांचं कारण मानतो, ते कुठल्याच साथीचे प्रथम वाहक नसतात.

जगभरातील साथींचा प्रसार पाहता आपल्या कॉमन सेन्समध्ये एक आवश्यक बदल करण्यास प्रवृत्त करतात. गरिबांमुळं आजारांचा प्रसार होतो, ही समजूत आपल्या डोक्यातून काढून टाकली पाहिजे. अन्यथा, शहरांमधील अभिजन वर्ग या मजूर, कामगार, झोपड्यांमध्ये राहणारा वर्ग यांच्याकडे यापुढेही तुच्छतेच्या नजरेनं पाहत राहील.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गावी चाललेली माणसं

लॉकडाऊनमुळं सर्वाधिक फटका रोजंदारी करणारा मजूर, असंघटित क्षेत्रातील कामगार, गावखेड्यातील शेतकरी यांना बसलाय. मात्र, ज्या आजारामुळं, साथीमुळं हे लॉकडाऊन करण्यात आलं, त्याला हा वर्ग अजिबात जबाबदार नाहीये.

मात्र, आपल्याकडील सत्ताधारी या वर्गाकडं सहानुभूतीनं पाहत वेगवेगळ्या योजना लागू करत आहे, ही नक्कीच आनंदाची बाब आहे. याच संवेदनशीलतेनं आणि तटस्थ नजरेनं या साथींच्या प्रसाराच्या मूळ वाहकांना लक्षात घेतलं पाहिजे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)