कोरोना व्हायरस : आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा रेल्वे प्रवास

भारतीय रेल्वे, कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोना बाधित रुग्णांनी रेल्वेतून प्रवास केल्याचं स्पष्ट झालं आहे. रेल्वे मंत्रालयाने ट्वीटच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. अन्य प्रवाशांना त्याचा फटका बसू नये म्हणून आवश्यक उपाययोजना तातडीने अंमलात आणल्याचं रेल्वेने स्पष्ट केलं आहे.

16 मार्चला मुंबईहून जबलपूरला जाणाऱ्या गोदान एक्सप्रेसच्या (गाडी नं. 11055) बी 1 कोचमध्ये प्रवास करणाऱ्या 4 प्रवाशांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

ते मागच्या आठवड्यात दुबईहून भारतात आले होते. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कारवाई करण्याची सूचना केली आहे.

कोरोना
लाईन

त्याशिवाय होम क्वारंटाईनची सूचना देण्यात आलेले दोन संशयित रुग्ण बंगळुरू ते दिल्लीदरम्यान धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करताना आढळले होते. त्यांना तातडीने रेल्वेतून उतरवण्यात आलं. संपूर्ण कोचचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे.

तसंच 13 मार्च रोजी दिल्लीहून रामगुंडमला जाणाऱ्या एपी संपर्क क्रांती एक्सप्रेसमधून प्रवास करत असलेले एकूण 8 प्रवासी कोव्हीड-19 पॉझिटिव्ह आढळले आहेत.

यामुळे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असं आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे.

परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या माध्यमातून किंवा त्यांच्याशी संपर्क आल्याने प्रामुख्याने कोरोनाचा संसर्ग होतो आहे. कम्युनिटी ट्रान्समिशन अर्थात परदेश प्रवास न केलेल्या किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तींशी संपर्क न होताही कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आवश्यकता असेल तरच प्रवास करावा असे आवाहन रेल्वेने केलं आहे. मात्र तरीही काहीजण स्वत:चा आणि सहप्रवाशांचा जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

भारतीय रेल्वे, कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर रविवारी म्हणजेच 22 मार्चला देशातील 3700 रेल्वे रद्द करण्याचं रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

शनिवारी रात्री 12 वाजेपासून रविवारी रात्री 10 वाजेपर्यंत देशातल्या कोणत्याही रेल्वे स्थानकावरून कोणतीही रेल्वे सुटणार नाही, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.

तर आधीच प्रवासात असलेल्या रेल्वेगाड्यांना थांबवण्यात येईल आणि प्रवाशांना प्रवासी कक्षात ठेवण्यात येईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

भारतीय रेल्वे, कोरोना
फोटो कॅप्शन, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाला भेट दिली.

दरम्यान मुंबईत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला भेट दिली. आवश्यकता नसेल तर प्रवास टाळा असं आवाहन त्यांनी प्रवाशांना केलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)