कोरोना व्हायरस : सिगरेट ओढल्यामुळे धोका आणखी वाढतो का?

स्मोकिंग

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

कोरोना व्हायरसपासून जीव वाचावा म्हणून तुम्ही सतत हात धुत असाल. पण स्वच्छ धुतलेल्या हातात जर तुम्ही सिगारेट धरणार असाल, तर काय उपयोग?

कारण कोरोना विषाणूची साथ पसरत असताना स्मोकिंग म्हणजे धूम्रपान करणं तुमच्यासाठी आणि तुमच्या आसपासच्या प्रत्येकासाठी आणखी घातक ठरू शकतं.

'हर फिक्र को धुए मे उडाता चला गया..' हे गाणं सिनेमापुरतं ठीक आहे. पण, असंच सगळ्या चिंता सिगरेटच्या धुरात फुंकून टाकायाच्या विचारात असाल; मजा म्हणून किंवा सवय म्हणून सिगरेट आणि तंबाकूचं सेवन करत असाल, तर ते लगेच थांबवा.

कारण कोरोना विषाणूची साथ पसरत असताना स्मोकिंग म्हणजे धूम्रपान करणं तुमच्यासाठी आणि तुमच्या आसपासच्या प्रत्येकासाठी आणखी घातक ठरू शकतं.

पण स्मोकिंग केल्यानं नेमकं काय होतं? आणि त्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झाला, तर ते अधिक धोकादायक का आहे, याविषयी बीबीसी मराठीने तज्ज्ञांशी बातचीत केली.

स्मोकिंगमुळे कोरोना विषाणूचा धोका कसा वाढतो?

"धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना श्वसनाचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. तसंच धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना न्यूमोनिया होण्याची शक्यता दुप्पट असते." असं डेबोरा अरनॉट सांगतात. त्या युकेमधल्या 'अॅश' (Ash) या सार्वजनिक आरोग्यविषयी काम करणाऱ्या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी आहेत.

कोरोना
लाईन

कोरोनाव्हायरस प्रकारचे विषाणू प्रामुख्यानं माणसाच्या श्वसनसंस्थेवर हल्ला करतात, असं आजवरच्या संशोधनात दिसून आलं आहे. सध्या पसरत असलेल्या कोरोना विषाणूमुळे होणारा कोव्हिड-१९ हा आजारही श्वसनाचा आजार आहे.

या आजारात विषाणूच्या संसर्गामुळे रुग्णांच्या श्वसनमार्गाला सूज येते. गंभीर स्वरुपाचा संसर्ग असेल न्यूमोनिया होतो, म्हणजे फुफ्फुसांतल्या हवेसाठीच्या पोकळ्यांमध्ये द्रवपदार्थ साठू लागतात. त्यामुळं श्वास घेण्यात अडथळा येतो आणि शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी कमी होत जातो.

धूम्रपानाची सवय असेल, तर ही प्रक्रिया तीव्रतेनं किंवा वेगानं होण्याची भीती वाढते. त्यामुळं "कोरोनाविषाणूचा धोका टाळण्यासाठी सिगरेट ओढण्याचं प्रमाण आता अगदी कमी करा किंवा तर ती ओढणं साफ थांबवा", असा सल्ला डेबोरा देतात.

'धूम्रपान म्हणजे रोगांना आमंत्रण'

"धूम्रपान करणं किंवा तंबाखू खाणं, म्हणजे सर्व प्रकारच्या संसर्गजन्य रोगांसाठी दार उघडण्यासारखं आहे." असं मुंबईतले पल्मनोलॉजिस्ट (फुफ्फुसांच्या रोगांचे तज्ज्ञ) डॉ. विकास ओसवाल सांगतात. विकास यांनी क्षयरोगावरही काम केलं आहे.

सध्या कोरोना विषाणूवर कुठलंच औषध किंवा लस नसल्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता हीच आपली आजाराविरूद्धची ढाल आहे. पण सिगरेट आणि तंबाखूमुळं रोगांचा प्रतिकार करण्याची शरीराची क्षमता कमी होते. तसंच खोकला वाढल्यानं त्यातून विषाणूचा प्रसार होण्याची शक्यताही वाढते.

स्मोकिंग

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. विकास ओसवाल सांगतात. "धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना अनेकदा सकाळी खोकला येतो. त्याला 'स्मोकर्स कफ' असं म्हणतात. धूम्रपान हे दुहेरी शस्त्रासारखं आहे. धूम्रपानामुळे तुम्हाला संसर्ग होण्याचा धोका वाढतो आणि मग ते रोगजंतू तुमच्या अधिकच्या खोकल्यातून पुढे मोठ्या प्रमाणात पसरवण्याची शक्यताही जास्त वाढते."

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, तंबाखू किंवा सिगरेटसारखे तंबाखूजन्य पदार्थ हे फुफ्फुसांचा कर्करोग, हृदयरोग अशा आजारांना कारणीभूत ठरतात. तसंच क्षयरोगासारख्या आजारांना आणखी धोकादायक बनवतात. तंबाखू खाऊन थुंकणंही रोगांच्या प्रसाराला हातभार लावणारं आहे. भारतात सिगरेट-तंबाखूमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंची संख्या दहा लाखांवर आहे. ही आकडेवारी चिंताजनक आहे.

'पॅसिव्ह स्मोकिंग'ही घातक

एखादा धूम्रपान करत असेल तर त्याच्या आसपासच्या व्यक्तींच्या शरीरातही तो धूर जात असतो. याला पॅसिव्ह स्मोकिंग (Passive Smoking) म्हटलं जातं. डॉ. ओसवाल त्याकडेच लक्ष वेधून घेतात, "धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती, त्यांच्या सहवासातील लोकांचं आरोग्यही धोक्यात टाकत असतात. पॅसिव्ह स्मोकर्सनाही संसर्ग होण्याचा धोका तेवढाच मोठा असतो."

फुफ्फुस

फोटो स्रोत, Getty Images

जगभरात दरवर्षी ऐंशी लाख लोकांचा तंबाखू आणि सिगरेटच्या सेवनामुळं मृत्यू होतो. त्यात सुमारे 12 लाक मृत्यू हे पॅसिव्ह स्मोकिंगमुळे होतात.

त्यामुळं स्वतःच्या आणि निकटवर्तीयांच्या धूम्रपान करणं सोडलेलंच बरं. कारण त्यामुळं कोरोना विषाणूचा सामना करण्याची ताकद वाढेलच, शिवाय बाकीच्या आजारांचा धोकाही कमी होऊ शकतो.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)