कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायाला असा बसतोय फटका

ताज

फोटो स्रोत, ANI

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे देशातील आणि राज्यातील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात येणारे पर्यटक त्यांचं बुकिंग रद्द करत आहेत.

जवळपास 70 टक्के परदेशी पर्यटकांनी विदर्भातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचं त्यांचं बुकिंग रद्द केल्यामुळे मोठा फटका बसला आहे. तर औरंगाबादची अजिंठा लेणी ओस पडलेली दिसून येत आहे.

गेल्या वर्षी 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2019 दरम्यान अजिंठा लेणीला 4 हजार 218 विदेशी पर्यटकांनी भेट दिली होती. यंदा याच कालावधीत ही संख्या फक्त 3 हजार 202 इतकी आहे.

अजिंठा लेणी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अजिंठ्याला होऊ घातलेले अनेक दौरे रद्द झाले

औरंगाबाद पर्यटन विकास संघटनेचे अध्यक्ष जसवंत सिंग यांनी पीटीआयशी संवाद साधताना दिलेल्या माहितीनुसार, "चीन, दक्षिण कोरिया, जपान आणि थायलंडच्या बहुतांश पर्यटकांनी औरंगाबादचे मार्च महिन्यातील नियोजित दौरे रद्द केले आहेत. युरोपियन देशांतून येणाऱ्या पर्यटकांची सुद्धा अशीच गत आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने त्यांनी औरंगाबादला पाठ दाखवली."

Presentational grey line
BBC
Presentational grey line

कोकणातही अशीच परिस्थिती आहे. कोकण पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनीही त्यांचं बुकिंग रद्द केलं आहे.

याशिवाय कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील भाविकांची संख्या कमी झाली आहे. तसंच पन्हाळा गड, ज्योतिबा मंदिर याठिकाणी थोडा फार परिणाम झाला आहे. तर नाशिकमधल्या तीर्थक्षेत्रांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे.

मुंबई चौपाटी

फोटो स्रोत, Getty Images

कोरोनामुळे पर्यटक व्यवसायावर परिणाम होत आहे, पण, सध्या सरकारची प्राथमिकता ही अधिकाधिक लोकांना कोरोनाची लागण होण्यापासून वाचवणं ही आहे, अशी भूमिका पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी बीबीसीशी बोलताना मांडली.

त्या म्हणाल्या, "कोरोनामुळे जगभरातल्या पर्यटन, उद्योग अशा सगळ्याच क्षेत्राचं आर्थिक नुकसान झालं आहे. अचानकच हे संकट आपल्यासमोर उभं राहिलं आहे आणि ते वेगानं पसरत आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्रालाही याचा फटका बसला आहे. या नुकसानीविषयी सरकार योग्य निर्णय घेईल, पण, त्याला अवधी लागेल. सध्या अधिकाधिक नागरिकांना सुरक्षित ठेवणं, ही सरकारची प्राथमिकता आहे."

देशात काय परिणाम?

13 मार्चच्या मध्यरात्रीपासून केंद्र सरकारचा नवीन निर्णय लागू झाला आहे. त्यानुसार 15 एप्रिलच्या रात्रीपासून राजकीय, आंतराष्ट्रीय संघटना, रोजगार आणि प्रोजेक्ट व्हिसाला वगळून इतर सगळ्या व्हिसावर स्थगिती आणण्यात आली. यामुळे देशाच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होईल, अशी चर्चा सुरू आहे.

पर्यटक

फोटो स्रोत, Getty Images

एखादा विदेशी पर्यटक जेव्हा भारतात फिरायला येतो, त्यामुळे देशातल्या 7 जणांना रोजगार मिळतो, यामध्ये हॉटेलपासून ते खाद्यपदार्थांचा स्टॉल्स लावणाऱ्या सगळ्यांचा समावेश होतो, असं पर्यटन व्यवसायाशी निगडित तज्ज्ञ सांगतात.

'अंदाजे 8 हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता'

केंद्र सरकारच्या नवीन निर्णयाविषयी 'इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स'चे सचिव राजेश मुदगिल यांनी बीबीसीला सांगितलं, सरकारनं आपल्या निर्णयावर 10 दिवसांत पुनर्विचार, अशा विनंतीचं पत्र आम्ही लिहिलं आहे.

इंडियन असोसिएशन ऑफ टूअर ऑपरेटर्स (IATO) ही एक राष्ट्रीय पातळीवर संस्था आहे, ज्यामध्ये देशातील 1,600 उद्योजकांचा समावेश होतो.

पर्यटक

फोटो स्रोत, Getty Images

सरकारनं 10 दिवसांत पुनर्विचार केला नाही, तर पर्यटन उद्योगाला जवळपास 8 हजार 500 कोटी रुपयांचं नुकसान होईल, असं IATOचं म्हणणं आहे.

पर्यटन व्यवसायाशी फक्त पर्यटक, हॉटेल, गाडी, गाईड यांनाच रोजगार मिळतो असं नाही, तर इतर अनेक जण पोटापाण्यासाठी या व्यवसायावर अवलंबून असतात. यात केरळमधील बोट चालवणारे, काश्मीरमधील हाऊस बोटीवाले तर डान्स पार्टीत सहभाग नोंदवणारे अनेकांचा सहभाग असतो.

पर्यटन स्थळांवर परिणाम

5 मार्चला ताजमहाल पाहायला आलेल्यांपैकी 5 पर्यटकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर तिथल्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

ताजमहाल सुरक्षा विभागाचे कार्यकारी अधिकारी मोहसीन खान यांच्या मते, हॉटेल आणि इतर जागांवर जागरुकता मोहीम सुरू आहे. विदेशातून आलेल्या पर्यटकांवर ध्यान ठेवलं जात आहे.

पर्यटक

फोटो स्रोत, Getty Images

ताजमहाल पाहायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे. पर्यटकांची संख्या 75 टक्क्यांनी रोडावली आहे. आग्र्याचे महापौर नवीन चंद्र जैन यांनी ताजमहाल बंद करण्याची मागणी केली आहे.

हीच स्थिती तिरुपती बालाजीची आहे. आकडेवारीनुसार, फेब्रुवारी मार्चमध्ये जवळपास 60 ते 70 हजार पर्यटक तिरुपतीच्या दर्शनाला येतात. गेल्या 3 दिवसांत ही संख्या घटली आणि 50 हजारावर पोहोचली आहे.

'80 टक्के हॉटेलचे बुकिंग रद्द'

कोरोना व्हायरसच्या परिणामावर 'कंफेडरेशन ऑफ इंडस्ट्री' (CII) अभ्यास केला आहे. त्यानुसार पुढचे काही महिने पर्यटन व्यवसायासाठी वाईट असणार आहेत.

रिपोर्टनुसार, पर्यटन व्यवसायानं ऑक्टोबर 2019पासून मार्च 2020पर्यंत 28 अब्ज डॉलरचा महसूल उत्पन्न करणं अपेक्षित होतं. पण, आता कोरोनामुळे याला 60 ते 65 टक्क्यांनी फटका बसण्याची शक्यता आहे.

इतकंच नाही, CIIनुसार, यावर्षीच्या मार्चपर्यंतची 80 टक्के हॉटेल बुकिंग रद्द करण्यात आलीय.

ऑक्टोबर 2020पासून मार्च 2021पर्यंतची हॉटेल बुकिंग सुरू व्हायला पाहिजे होती, पण कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे लोकांनी अद्याप बुकिंग सुरू केलेली नाही.

पर्यटक

फोटो स्रोत, Getty Images

दरवर्षी, एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान विदेशातील भारतीय नागरिक देशात कुटुंबीयांना भेटण्यासाठी येतात. यंदा कोरोनाच्या भीतीमुळे त्यांच्यातही भयाचं वातावरण आहे. अनेक भारतीयांनी आपली भेट रद्द केली आहे.

6 मार्चला CIIनं हा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. CIIच्या पर्यटन समितीचे अध्यक्ष दीपक हकसर यांच्यानुसार सरकारचा निर्णय योग्य आहे.

भारतात कोरोनाच्या संबंधित जितकी प्रकरणं समोर आली आहे, ते सगळे कधी ना कधी विदेशातून आले आहेत. त्यामुळे सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो.

"सरकारनं सध्या तरी व्हिसा स्थगित करण्याचा निर्णय दिला आहे, पण देशांतर्गत वाहतूक करणारे प्रवासीही कोरोना व्हायरसमुळे चिंतेत आहेत. अनेकांनी लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत, मीटिंग रद्द केल्या आहेत," दीपक सांगतात.

किती दिवसांनंतर पर्यटन व्यवसाय पूर्वपदावर येईल, याबदद्ल विचारल्यावर ते सांगतात, "याविषयी आताच काही भाष्य करणं उचित ठरणार नाही. पण, भारतातील स्थिती पूर्वपदावर येणं हे विदेशात कशी परिस्थिती आहे, यावर अवलंबून असेल."

पर्यटन विभागाचं म्हणणं काय?

'फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ इंडियन टूरिझम अँड हॉस्पिटॅलिटी' (FAITH)चे सरचिटणीस सुभाष गोयल यांनी पर्यटन मंत्र्यांची भेट घेतली. सरकारच्या निर्णयाचा एका आठवड्यानंतर आढावा घेण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.

हे असोसिएशन हॉटेल, प्रवासी आणि टूर ऑपरेटर कंपन्यांसोबत काम करतं. पर्यटन क्षेत्राला पुढील वर्षासाठी करमुक्त करावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पर्यटक

फोटो स्रोत, Getty Images

तसंच देशातील 4 आंतरराष्ट्रीय विमानतळांवर परदेशी पर्यटकांसाठी येण्याची व्यवस्था करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

असं असलं तरी कोरोनापासून बचावासाठी सरकारनं जे पाऊल उचललं आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. पण सरकारला यामुळे होणाऱ्या नुकसानीविषयी अवगत करणं आमचं कर्तव्य आहे, असंही गोयल सांगतात.

हॉटेल व्यवसायावर परिणाम

हॉटेल व्यवसायावर कोरोनाचा सर्वाधिक परिणाम झाल्याचं 'फेडरेशन ऑफ होटल अँड रेस्टॉरंट इंडस्ट्री'चे निर्देशक राजेंद्र कुमार सांगतात.

हॉटेलमध्ये लोक जेवणासाठी येत नसल्यामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांची एकच शिफ्ट लावली आहे.

ते सांगतात, "सरकारनं शाळा-कॉलेज, चित्रपटगृह, विदेश यात्रा बंद केल्यामुळे लोकांमधील चिंता वाढली आहे. यामुळेच मार्च आणि एप्रिलमधील 80 टक्के बुकिंग रद्द झाली आहे. कदाचित उन्हाळ्यात या परिस्थितीत थोडा फरक पडेल."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)