You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आमदारांना वाहन खरेदीसाठी 30 लाखांचं बिनव्याजी कर्ज मिळणार #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1) महाराष्ट्र: आमदारांना वाहन खरेदीसाठी 30 लाखांचं बिनव्याजी कर्ज मिळणार
महाराष्ट्रातील आमदारांसाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. आमदारांना गाडी खरेदीसाठी 30 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिलं जाणार आहे. लोकमतनं ही बातमी दिलीय.
गाडी खरेदीसाठी सरकारनं दिलेली मूळ रक्कम आमदाराला फेडावी लागेल. त्यावरील व्याज सरकारी तिजोरीतून भरलं जाईल. अर्थमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत ही घोषणा केल्यानंतर सर्व आमदारांनी मोठमोठ्यानं बाक वाजवून आनंद व्यक्त केला.
सध्याही आमदारांना गाडी खरेदीसाठी 10 लाखांचं कर्ज दिलं जातं. मात्र, ती रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
नुकत्याच मांडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात आमदारांच्या निधीत वाढ करण्याचाही निर्णय घेतला गेला आहे. आमदार निधीत एक कोटींची वाढ करून तीन कोटी रुपये करण्यात आली आहे.
2) अरविंद केजरीवाल: 'माझ्याकडे जन्मदाखला नाहीय, मग डिटेन्शन सेंटरमध्ये टाकाल का?'
"माझ्याकडे जन्मदाखला नाहीय. मग मला सुद्धा डिटेन्शन सेटंदरमध्ये टाकणार का?" असा प्रश्न दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला विचारलाय. लाईव्ह मिंटनं ही बातमी दिलीय.
बिहार, तामिळनाडूनंतर आता दिल्ली सरकारनंही विधानसभेत NPR आणि NRC विरोधात प्रस्ताव मंजूर केला. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी प्रस्ताव मांडला आणि एकमतानं मंजूर करण्यात आला.
"कोरोना व्हायरसमुळं देशात चिंता आहे. दुसरीकडे आर्थिक विकास दर घसरत चाललाय. अशा स्थितीत CAA, NPR आणि NRC वर केंद्र सरकार जोर का देतंय?" असा सवाल केजरीवालांनी विचारला.
3) परदेशातून आलेले ब्राह्मण आम्हाला प्रणापत्राबाबत अक्कल शिकवतात - नितीन राऊत
महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी CAA, NRC आणि NPR संदर्भात बोलताना ब्राह्मण समाजाला लक्ष्य केलंय. "ब्राह्मण परदेशातून भारतात आले आणि ते आम्हाला प्रमाणपत्र आणा म्हणून अक्कल शिकवतायत," असं वक्तव्य नितीन राऊत यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात केलं. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
CAA, NRC आणि NPR साठी आवश्यक कागदपत्रांच्या मुद्द्यावरून नितीन राऊत यांनी ही टीका केली.
उत्तर नागपूरच्या इंदोरा मैदानात डॉ. राऊत यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. फुले, शाहू, आंबेडकर विचारसंवर्धन समितीने हा सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी नितीन राऊतांनी उपस्थितांना संबोधित करताना हे विधान केलं.
"2010 मध्ये काँग्रेस सरकारने जो NPR आणला, त्यावेळी ज्या अटी-शर्ती होत्या. त्याच राहतील तर आम्ही NPR लागू करू. अन्यथा ते लागू होऊ देणार नाही," असं नितीन राऊत म्हणाले.
4) राजर्षी शाहू महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी झी वाहिनीनं माफी मागावी'
'चला हवा येऊ द्या' हा विनोदी कार्यक्रम सध्या वादात अडकला आहे. राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमांचा चुकीच्या पद्धतीनं वापर केल्याचा आरोप या मालिकेवर करण्यात आलाय. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी झी वाहिनी आणि मालिकेच्या दिग्दर्शकांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिलाय. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.
11 मार्च 2020 रोजी झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेल्या 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमा राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमांचा चुकीचा वापर करण्यात आला. अभिनेता भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचे फोटो राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाडांच्या प्रतिमेला चिकटवण्यात आले होते. त्यामुळं सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला.
खासदार संभाजीराजे यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून, झी मराठी वाहिनी आणि दिग्दर्शकावर कायदेशीर कारवाईचा इशारा दिलाय.
"लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली, की माणूस विक्षिप्त वागायला सुरू करतो. 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीनं वापर केला गेला आहे. हे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु निषेधार्ह सुद्धा आहे," असं संभाजीराजे म्हणाले.
तसंच, "निलेश साबळे आणि झी वाहिनीनं या गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा वाहिनी आणि दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल," असंही संभाजीराजे म्हणाले.
5) अभिनेत्री तनुश्री दत्ताविरोधात 'नाम'चा 25 कोटींचा मानहानीचा दावा
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या 'नाम' फाऊंडेशननं अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्याविरोधात 25 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केलाय. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.
नाम फाऊंडेशनवर तनुश्रीनं भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपांची नाम फाऊंडेशननं दखल घेत, मुंबई हायकोर्टाचे दार ठोठावले. त्यानंतर मुंबई हायकोर्टानं तनुश्री दत्ताला 'नाम'विरोधात आरोप लावण्यास मज्जाव केला.
नाना पाटेकर यांनी नाम फाऊंडेशननं शेतकऱ्यांच्या नावावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप तनुश्री दत्तानं केला होता. तसंच, परदेशातून कोट्यवधींच्या देणग्या घेतल्याचा आरोपही तनुश्रीनं केला होता.
हेही नक्की वाचा -
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)