You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यांमागचं नेमकं राजकारण काय?
- Author, नीलेश धोत्रे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी, अयोध्येहून
शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री थोड्याच वेळात अयोध्येसाठी रवाना होणार आहेत.
साधारण दीड वर्षांच्या कालखंडात तीनदा अयोध्येला रामाच्या दर्शनाला जाणारे उद्धव ठाकरे या मुद्द्याचा राजकारणासाठी वापर करत असल्याचं स्पष्ट आहे. तसा वापर बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा केला होता. पण त्यात फरक हा आहे की बाळासाहेब ठाकरे यांनी कधी अयोध्येचे दौरे केले नव्हते.
आधी आपला मित्र पक्ष असलेल्या भाजपवर दबाव टाकण्यासाठी आणि आता पक्षाची हिंदुत्ववादी ओळख टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना हे दौरे करावे लागत आहेत.
पहिला दौरा - 24 आणि 25 नोव्हेंबर 2018
उद्धव ठाकरे यांचा हा पहिला अयोध्या दौरा होता. 2 दिवसांच्या या दौऱ्यात त्यांनी रामाचं दर्शन, छोटी सभा, शरयूची आरती असा भरगच्च कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळी त्यांच्या बरोबर रश्मी ठाकरे सुद्धा आल्या होत्या.
पहिल्या दौऱ्याची राजकीय पार्श्वभूमी
तेव्हा राज्याच्या सत्तेत असून शिवसेनेला त्यांचा सत्तेचा पुरेसा वाटा मिळत नसल्याची भावना होती. त्यातच भाजपच्या नेत्यांकडून पुढच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी सुरू होती.
फडणवीस सरकारमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर खटके उडत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजपला त्यांच्याच मुद्द्याच्या खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला होता.
लोकसभा निवडणुकांच्या आधी उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याला जाण्याची घोषणा तर केलीच, पण दौऱ्याला एका आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना 'हर हिंदू की यही पुकार, पहिले मंदिर फिर सरकार' अशी घोषणा दिली. एक प्रकारे ही घोषणा देऊन त्यांनी नरेंद्र मोदींना जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला.
नोटबंदी जर एका दिवसात जाहीर केली जाते तर राममंदिरासाठी एका दिवसात अध्यादेश का आणत नाहीत असा सवाल त्यांनी त्यावेळी नरेंद्र मोदी सरकारला विचारला होता.
उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 नोव्हेंबरलाच अयोध्येत विश्व हिंदू परिषदेने धर्मसभा आयोजित केली होती. उद्धव ठाकरेंकडून राममंदिराचा मुद्दा हायजॅक होत असल्याचं चित्र उभं राहत असताना विहिंपनं हे आयोजन केल्याची चर्चा तेव्हा अयोध्येमध्ये रंगली होती. पण हा कार्यक्रम आधीच ठरलेला होता, असा दावा परिषदेने तेव्हा केला होता.
यावेळी लखनऊपासून अयोध्येला जाणाऱ्या महामार्गावर दुतर्फा विहिंपची धर्मसभा आणि उद्धव ठाकरेंचा दौरा यामधलं 'पोस्टर वॉर' रंगलं होतं, त्यावरून हिंदुत्वाच्या राजकारणातलं द्वंद्व दिसत होतं.
दुसरा दौरा - 16 जून 2019
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचा दुसरा अयोध्या दौरा केला. फक्त 4 तास चाललेल्या या दौऱ्यात त्यांनी त्यांच्या 18 खासदारांसह रामाचं दर्शन घेतलं होतं आणि एक पत्रकार परिषद घेतली होती.
दुसऱ्या दौऱ्याची राजकीय पार्श्वभूमी
पहिल्या अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं भाजपवर दबाव निर्माण करण्यात शिवसेनेला काही अंशी यश आलं होतं. लोकसभा निवडणुकांच्या आधी अमित शाह मातोश्रीवर गेले. त्यानंतर दोन्ही पक्षांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी आम्ही युती करत असल्याचं जाहीर केलं.
लोकसभा निवडणुका पार पडल्या शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. भाजपचे तब्बल 303 खासदार निवडून आले. स्पष्ट बहुमतापेक्षाही जास्त खासदार निवडून आल्यामुळे भाजपला आता त्यांच्या मित्र पक्षांची म्हणावी तशी गरज उरली नव्हती. अशातच केंद्रातल्या मंत्रिमंडळाच्या वाटपात शिवसेनेच्या वाट्याला एकच कॅबिनेट मंत्रिपद आलं आणि नेहमी प्रमाणे अवजड उद्योग खातं त्यांना मिळालं.
शिवसेनेला यंदा आपल्या पदरात आणखी काहीतरी पडेल अशी आशा होती. लोकसभेचं उपसभापती पद मिळावं असं त्यांना वाटत होतं. हा अमचा नैसर्गिक हक्क आहे असं त्यावेळी याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले होते.
बहुमतापेक्षाही जास्त आकडे असलेल्या भाजपसमोर आपलं आव्हान टिकवून ठेवण्याचं आव्हान त्यावेळी शिवसेनेसमोर होतं आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाली.
त्यातच हिंदुत्व, राम मंदिर तसंच इतर विषयांवरून भाजपवर टीका केल्यानंतर शिवसेनेनं भाजपसोबतच युती केली होती. या भूमिकेवरून शिवसेनेला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. राम मंदिराच्या प्रश्नाचं केवळ राजकारणच केलं का, असा प्रश्न उपस्थित केला गेला. त्यातच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर होत्या. त्यात राम मंदिराचं काय? हे विचारलं जाऊ शकतं याची शिवसेनेला कल्पना होती. त्यामुळे राम मंदिराचा मुद्दा आपण सोडलेला नाही, हे दाखवून देणं ही शिवसेनेची गरज होतं.
पण या दौऱ्याच्या दबावाचा उलट परिणाम होणार नाही याची काळजी सुद्धा उद्धव ठाकरे यांना घ्यायची होती. केंद्रातल्या सत्तेतल्या वाट्यासाठी दबाव निर्माण करताना राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी आधीच जाहीर केलेल्या युतीवर त्याचा परिणाम होऊ नये याची काळजी त्यांना घ्यायची होती. परिणामी फक्त 18 खासदारांसह रामाचं दर्शन घेण्यापुरताच हा दौरा सिमीत ठेवण्यात आला होता.
तिसरा दौरा - 7 मार्च 2020
या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी रामाचं दर्शन घेतलं आणि एक पत्रकार परिषद घेतली. यावेळीच्या दौऱ्यात त्यांना शरयूची आरती करायची होती. पण देशातली कोरोना व्हायरसची भीती लक्षात घेता योगी आदित्यनाथ सरकारनं त्यांना आरती न करण्याची विनंती केली. जी शिवसेनंने मान्य केल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
तिसऱ्या दौऱ्याची पार्श्वभूमी
आधीच्या दोन्ही दौऱ्यांच्या काळात शिवसेना भाजपबरोबर होती. केंद्रात आणि राज्यातल्या भाजपबरोबरच्या सत्तेत त्यांचा सहभाग होता. आता मात्र परिस्थिती तशी नाही.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, पण ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर.
सत्ता स्थापन करताना जाहीर केलेल्या किमान समान कार्यक्रमाचा मुद्दा उचलत शिवसेना आता हिंदुत्वाच्या राजकारणापासून दूर जात आहे अशी टीका भाजपनं त्यांच्यावर केली.
शिवाय मुस्लीम आरक्षण आणि CAA, NRC आणि NPA च्या मुद्द्यांवर त्यांची नेमकी भूमिका काय असे प्रश्न सतत शिवसेनेला विचारले जात आहेत. परिणामी त्यांचा अभ्यास करण्यासाठी अनील परब यांच्या अध्यक्षतेखाली सहा मंत्र्यांची एक समिती उद्धव ठाकरे सरकारनं स्थापन केली आहे.
त्यातच सुप्रीम कोर्टानं अयोध्येचा निकाल दिल्यानं मंदिर बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी या मुद्द्यावरून भाजपला खिंडीत गाठता येणं किंवा त्यांचं तोंड बंद करता येणं शक्य नाही.
मग काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन केल्यानंतरही आपण हिंदुत्वाला विसरलेलो नाही हे दाखवण्याची संधी या दौऱ्यातूनच मिळू शकते.
अर्थात अयोध्येचा निकाल (9 नोव्हेंबर 2019) लागल्यानंतरच उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा रामाच्या दर्शनाला जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण त्याच दरम्यानच्या काळात त्यांची काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राज्यात सत्ता स्थापनेसाठी पडद्यामागून चर्चा सुरू होती. ( राज्यात 24 ऑक्टोबररोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले होते.)
श्रेयासाठी तीन दौरे?
"राम मंदिराचं आंदोलन फक्त आरएसएस, विहिंप आणि भाजपचं नव्हतं तर शिवसेनेनंही या आंदोलनात सहभाग घेतला होता. बाळसाहेब ठाकरेंची तीच भूमिका होती. त्याची लोकांना आठवण करून देण्यासाठीच उद्धव ठाकरे सतत अयोध्येला येत आहेत," असं ज्येष्ठ पत्रकार रामदत्त त्रिपाठी यांना वाटतं.
रामदत्त त्रिपाठी गेल्या अनेक वर्षांपासून अयोध्या मुद्द्याचं वार्तांकन करत आहेत.
बाळासाहेब ठाकरे कधी अयोध्येला आले नव्हते. पण त्यावेळी भाजप त्यांचा सहकारी पक्ष होता. आता मात्र भाजप शिवसेनेचा प्रतिस्पर्धी पक्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला त्यांचा हिंदुत्ववादी समर्थक पूर्णपणे भाजपमध्ये जाऊ नये याची सध्या उद्धव ठाकरे यांना चिंता आहे. तसंच उद्या जेव्हा राम मंदिर बनेल तेव्हा त्याचं श्रेय शिवसेनेला सुद्धा मिळालं म्हणून ते सतत अयोध्येला येत आहेत, असं कारण त्रिपाठी उद्धव ठाकरे यांच्या तिन्ही दौऱ्यांच्या मागे सांगतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)