You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल्ली दंगल: दोन मल्याळम वृत्तवाहिन्यांवर 48 तासांची बंदी मागे #5मोठ्याबातम्या
आजच्या वर्तमानपत्रातील राज्यासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाच मोठ्या घडामोडींवर धावती नजर....
1. दिल्ली दंगल: दोन मल्याळम वृत्तवाहिन्यांवर 48 तासांची बंदी मागे
दक्षिण दिल्लीतल्या दंगलीचं वृत्तांकन केल्याप्रकरणी केरळस्थित दोन मल्याळम वृत्तवाहिन्यांवर माहिती व प्रसारण मंत्रालयानं 48 तासांची बंदी आणली होती. केंद्र सरकारकडून ही बंदी उठवण्यात आलीय. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.
एशियन न्यूज आणि मीडियावन टीव्ही या दोन वृत्तवाहिन्यांवर केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स नियम, 1994 या कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
25 फेब्रुवारी रोजी दक्षिण दिल्लीतल्या दंगलीच वृत्तांकन करताना धार्मिक स्थळांवरील हल्ला आणि विशिष्ट समाजाची बाजू घेणं, असे आरोप या वृत्तवाहिन्यांवर ठेवण्यात आले होते.
आज (7 मार्च) संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून पुढील 48 तास या दोन्ही वृत्तवाहिन्या बंद ठेवाव्या लागणार होत्या.
ही बंदी उठवण्यात आली आहे.
2)YES बँक: पिंपरी चिंचवड महापालिकेचे 900 कोटी रुपये अडकले
YES बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध आणल्यानंतर सर्वसामान्य ग्राहकांसह मोठमोठाल्या संस्थाही हतबल झाल्यात. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेचे तब्बल 900 कोटी रुपये बँकेत अडकले आहेत. इंडिया टुडेनं ही बातमी दिलीय.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त यांनी मात्र नागरिकांना आणि महापालिका प्रशासनाला दिलासा दिलाय. मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, "काळजी करण्याचं कारण नाही. महापालिकेचे 4000 कोटींहून अधिक रक्कम इतर बँकांमध्ये आहे."
राष्ट्रीयकृत बँकेऐवजी YES बँकेची करवसुलीसाठी निवड का केली, असा सवाल स्थानिक शिवसैनिकांनी केलाय. पिंपरी चिंचवड महापालिकेवर भाजपची सत्ता आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नं 5 मार्च 2020 रोजी YES बँकेवर निर्बंध आणले. त्यामुळं ग्राहकांना येत्या महिन्याभरात आपापल्या खात्यातून केवळ 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे.
दुसरीकडे, काल रात्री (6 मार्च 2020) YES बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या वरळीतील (मुंबई) घरावर छापा टाकला. मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत ईडीनं कपूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. वारेमाप कर्जवाटप करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. इकोनॉमिक टाइम्सनं ही बातमी दिलीय.
3) नोटाबंदीमुळं YES बँक बुडाली - पी. चिदंबरम
मोदी सरकारनं केलेल्या नोटाबंदीमुळं YES बँक बुडाली, असा आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केला. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.
वित्तीय संस्थांवर मोदी सरकारनं नियंत्रण मिळवण्याचा हा परिणाम असल्याचंही पी. चिदंबरम म्हणाले.
"आधी PMC बँक आणि आता YES बँक बुडाली. याबाबत सरकारला कुठलीही चिंता नाही. सरकार जबाबदारी का झटकतेय? आता कुठल्या बँकेचा नंबर आहे?" असे प्रश्न चिदंबरम यांनी विचारले.
चिदंबरम यांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिलं की "संकटात आढळलेल्या बँकांना 2014 च्या आधी कर्ज दिलं गेलंय."
4) N95 मास्कच्या विक्रीवर महाराष्ट्रात निर्बंध
कोरोना व्हायरसपासून संरक्षणासाठी N95 मास्क वापरण्यास सुरुवात झाल्यानंतर मास्कची साठेबाजी वाढल्याचं लक्षात आलं. त्यानंतर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनानं N95 मास्कच्या विक्रीवर निर्बंध आणले गेले. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मास्क न देण्याचे आदेश औषध विक्रेत्यांना देण्यात आलेत. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
मास्क आणि सॅनिटायझरची मागणी अचानक वाढल्यानं तुटवडा निर्माण झाला. एका वापरुन फेकण्याचे मास्कही दुप्पट किंमतीनं विकले जाऊ लागलेत.
N95 मास्क हे विशेषत: वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी आहेत. मात्र, सगळ्यांनीच ते खरेदी केल्यानं आणि साठेबाजी केल्यानं तुटवड्याची शक्यता निर्माण झालीय. त्यामुळं सतर्कता म्हणून अन्न व औषध प्रशासनानं हे पाऊल उचललं.
5) निलंबित आप नेते ताहीर हुसैन यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी
दिल्ली दंगलीदरम्यान गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या झाली. या हत्येप्रकरणी आम आदमी पक्षाचे निलंबित नगरसेवक ताहीर हुसैन यांना अटक करण्यात आली. हुसैन यांची आता सात दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलीय. द हिंदूनं ही बातमी दिली.
दिल्लीतल्या कडकडडूमा कोर्टानं हा निर्णय दिला.
CAA चे समर्थक आणि विरोधक यांच्यातील वादाचं रुपांतर दंगलीत झाल्यानंतर दक्षिण दिल्लीतला मोठा भाग या दंगलीचा बळी ठरला.
या दंगलीतल्या मृतांच्या संख्येनं 50 चा आकडा गाठलाय. आतापर्यंत 654 गुन्हे दाखल झाले असून, 1820 जणांना ताब्यात घेण्यात आलंय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)