YES बँकेवर RBI चे निर्बंध, खात्यातून 50 हजारच काढता येणार #5मोठ्याबातम्या

आजच्या वर्तमानपत्रातील राज्यासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाच मोठ्या घडामोडींवर धावती नजर....

1) YES Bank वर RBI चे निर्बंध, खात्यातून 50 हजारच काढता येणार

कर्जाचा बोजा वाढल्यानं YES बँकेवर निर्बंध लादण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नं घेतलाय. इकोनॉमिक टाइम्सनं ही बातमी दिलीय.

RBI च्या निर्बंधांमुळं YES बँकेच्या ग्राहकांना आता बँकेतून केवळ 50 हजार रुपयेच काढता येणार आहेत. 50 हजारांपेक्षा अधिकची रक्कम काढायची असल्यास ग्राहकांना RBI ची परवानगी घ्यावी लागेल.

वैद्यकीय उपचार, लग्न, परदेशातील शिक्षण या तीन गोष्टींसाठी मात्र 50 हजारांपेक्षा अधिकची रक्कम खात्यातून काढता येईल. मात्र, त्यासाठीही RBI ची परवानगी बंधनकारक असेल.

YES बँक ही खासगी क्षेत्रातली बँक असून, या बँकेवर निर्बंध 3 एप्रिलपर्यंत सुरू राहतील. तोपर्यंत म्हणजे, 30 दिवसांसाठी YES बँकेचं संचालक मंडळही निलंबित करण्यात आलंय. SBI चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार यांची YES बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

2) CAA च्या अभ्यासासाठी महाराष्ट्रात सहा मंत्र्यांची समिती

CAA, NPR आणि NRC या संदर्भात अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं सहा मंत्र्यांची समिती स्थापन केलीय. संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली ही समिती सरकारला अहवाल सादर करेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली. 'लोकसत्ता'नं ही बातमी दिलीय.

CAA वरून देशभरात वाद-विवाद सुरू असल्यानं राज्य सरकारनं या विषयाबाबत काय केलं पाहिजे, याचा अभ्यास ही सहा मंत्र्यांची समिती करेल आणि तसा अहवाल राज्य सरकारपुढे सादर करेल.

संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, नवाब मलिक आणि उदय सामंत यांचा समावेश आहे.

3) विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. 'अॅग्रो वन'नं ही बातमी दिलीय.

विदर्भापासून केरळपर्यंत हवेचा उत्तर दक्षिण कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यातच पूर्व आणि पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याचा संगम असल्यानं पूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामान तयार झालंय.

विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. तर विदर्भाच्या उर्वरित भागातही जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय.

4) मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदाराचा राजीनामा

मध्ये प्रदेशातील चार आमदार बेपत्ता झाल्यानंतर त्यातील एका आमदारानं विधानसभा अध्यक्ष एनपी प्रजापती यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलाय. हरदीप डांग असं या काँग्रेस आमदाराचं नाव आहे. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.

दुसऱ्यांदा चांगल्या बहुमतानं जिंकल्यानंतरही मला पक्षाकडून टाळलं जात आहे, असं हरदीप डांग यांनी म्हटलंय. तसंच, भ्रष्ट सरकारच्या नेतृत्त्वात कुठल्याही मंत्र्याला काम करायचं नसल्याचंही त्यांनी म्हटलं.

भाजप आमदारांच्या संपर्कात असण्याचा ज्या 10 आमदारांवर आरोप होता, त्यातले एक हरदीप डांग आहेत. मात्र, यापैकी सहा आमदारांना परत बोलावण्यात यश आल्याचा दावा काँग्रेसनं केलाय. मात्र, चार आमदार काँग्रेसच्या संपर्कात नव्हते. त्यापैकीच एक हरदीप डांग होते.

रघुराज कांसना, बसाहुलाल सिंह,आणि अपक्ष आमदार शेरा भैया अजूनही काँग्रेसच्या संपर्कात नाहीत. त्यामुळं मध्य प्रदेशमधील राजकीय स्थिती काँग्रेससाठी चिंताजनक झालीय.

5) बनावट जात प्रमाणपत्र - सोलापूरच्या खासदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बनवाटप्रकरणी सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याविरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. 'द हिंदू'नं ही बातमी दिलीय.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्रासोबत खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी बनावट जात प्रमाणपत्र जोडल्याचं आढळलं आहे.

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचं बेडा जंगम नावाचं अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र खोटं असल्याचा आदेश सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं दिलं होतं. त्यानंतर अक्कलकोटच्या तहसीलदारांनी सोलापूरच्या न्यायालयात तक्रार नोंदवली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानं गुन्हा दाखल करण्यात आला.

हा गुन्हा दाखल झाल्यानंतरही अद्याप कुणालाच अटक झालेली नाही.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)