उद्धव ठाकरे: लालकृष्ण अडवाणींच्या आधी का घेतली उद्धव यांनी मोदींची भेट?

उद्धव ठाकरे आणि लालकृष्ण अडवाणी

फोटो स्रोत, Twitter

उद्धव ठाकरे यांनी आज दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली, असं ट्वीट उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयीन ट्विटर हॅंडलवरून करण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरे हे लालकृष्ण अडवाणी यांना भेटणार ही चर्चा सुरुवातीपासूनच सुरू होती पण अडवाणींच्या आधी ते मोदींना भेटल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

त्यासोबतच ते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचीही भेट घेणार आहेत.

News image

कौटुंबिक संबंध की राजकीय चाचपणी?

उद्धव ठाकरे यांचं आडवाणींना भेटणं यामागे दोन गोष्टी असू शकतात, असं मत ज्येष्ठ पत्रकार भारत कुमार राऊत व्यक्त करतात.

ते म्हणतात, "भाजपबरोबर संबंध तुटलेले असतानाही उद्धव ठाकरेंचं आडवाणींना जाऊन भेटणं याला राजकीय महत्त्व आहेच, पण त्यापलीकडही महत्त्व आहे. लालकृष्ण आडवाणी अनेकदा बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला मातोश्रीवर येत होते. त्या दोघांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. शिवसेना आणि आडवाणी, शिवसेना आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. त्यामुळे कौटुंबिक संबंध पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टीनं ते भेटत असतील.

"दुसरं म्हणजे राज्यात भाजपबरोबर नातं तोडून शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर घरोबा केला आणि आज जरी आडवाणी सत्तापदावर नसले, तरी ते भाजपचे शीर्ष नेते आहेत, महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे भाजपबरोबरचा जो पूल आता मोडलेला आहे, तो पुन्हा रिपेअर करता येईल का, त्याद्वारे येण्याजाण्याची वाट चालू राहिल का, या दृष्टीनं चाचपणी होण्याची शक्यता आहे."

'आम्ही आडवाणींना मानतो...'

लालकृष्ण आडवाणी यांना भेटून आम्ही आडवाणींना मानतो, असं उद्धव ठाकरे यांना सूचित करायचं असू शकतं, असं मत लोकमतचे समूह समन्वयक संजीव साबडे सांगतात.

ते म्हणतात, "पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणं हा औपचारिकतेचा भाग आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्यामुळे सोनिया गांधींची भेट घेणं महत्त्वाचं आहे. याव्यतिरिक्त उद्धव ठाकरे मुद्दामहून लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेत आहेत. कारण, मोदीयुग सुरू होण्या अगोदरपासून आडवाणी भाजपचं नेतृत्व करत होते. आडवाणींनी काढलेल्या रथयात्रेला शिवसेनेचा पाठिंबा होता. याशिवाय बाळासाहेब ठाकरे आणि लालकृष्ण आडवाणी व अटल बिहारी वाजपेयी जिव्हाळ्याचे संबंध होते."

लालकृष्ण अडवाणी, बाळसाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लालकृष्ण अडवाणी, बाळसाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन

"त्यामुळे लालकृष्ण आडवाणींची भेट घेण्यामागे उद्धव ठाकरेंचे दोन हेतू असू शकतात. एक म्हणजे त्यांना कौटुंबिक संबंध अबाधित ठेवायचे आहेत. आणि दुसरं म्हणजे भाजपमध्ये दोन प्रवाह आहेत, एक आडवाणी यांना माणनारा, तर दुसरा मोदींना मानणारा. त्यामुळे मग आडवाणींना भेटून किंचित राजकारण करण्याचा ठाकरे यांचा उद्देश असू शकतो," साबडे सांगतात.

'भाजपला डिवचण्याचा प्रयत्न'

उद्धव ठाकरेंची आडवाणींशी भेट म्हणजे भाजपला डिवचण्याचा प्रयत्न असल्याचं ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात.

त्यांच्या मते, "लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेणार, असं उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर महिन्यातच सांगितलं होतं. अयोध्या जमीन वादावर सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी ही इच्छा जाहीर केली होती. खरं तर लालकृष्ण आडवाणी यांच्यामुळेच भाजप सत्तेवर आलं आणि नरेंद्र मोदींनी सत्तेची फळ चाखायला मिळाली. पण, आम्ही आडवाणी यांना मानणारे आहोत, कारण आडवाणींच्या काळातच भाजप-शिवसेना युती चांगल्याप्रकारे चालली, असं ठाकरे यांना या भेटीतून सूचित करायचं असू शकतं.

"याशिवाय आडवाणी स्वत: असंतुष्ट आहे. त्यामुळे त्यांना भेटण्यामुळे एक अर्थ प्राप्त होतो. भाजपला डिवचण्यासाठी आणि आम्ही मोदींना नाही तर आडवणींना मानतो, हा एक मेसेज त्यांना द्यायचा आहे," देसाई सांगतात.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, ANI

या भेटीविषयी राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर सांगतात, "आपल्या वडिलांच्या ज्येष्ठ मित्राला भेटणं हे उद्धव ठाकरे यांच्यातील उत्तम संस्काराचं लक्षण आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लालकृष्ण आडवाणींना मार्गदर्शक मंडळात नेमून अडगळीत टाकलं आहे. अशात उद्धव ठाकरे यांनी त्यांना भेटणं याचे राजकीय अर्थ निघू शकतात, पण ते इतक्यात काढणं योग्य नाही."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)