You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अरविंद केजरीवाल: ‘ज्यांनी मत दिलं नाही, त्यांच्याशी भेदभाव करणार नाही’
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी सलग तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली.
दिल्लीतल्या रामलीला मैदानात आयोजित भव्य कार्यक्रमात उपराज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवालांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या कार्यक्रमाला इतर कुठल्याही राज्यातील मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं.
अरविंद केजरीवालांसोबतच मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इम्रान हुसैन आणि राजेंद्र गौतम यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
आधीचंच मंत्रिमंडळ केजरीवालांनी यावेळीही कायम ठेवलंय. मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्यानं अनेकांनी प्रश्नही उपस्थित केले.
केजरीवालांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथविधीसाठी आमंत्रित केलं होतं. मात्र, पंतप्रधान मोदी वाराणसी दौऱ्यावर होते.
शपथविधीनंतर केजरीवालांचा उपस्थितांशी संवाद
शपथग्रहण केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी उपस्थितांशी संवाद साधला. 'भारत माता की जय', 'इन्कलाब जिंदाबाद' आणि 'वंदे मातरम्' या घोषणांनी त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
दिल्लीतल आम आदमी पक्षाचा विजय हा प्रत्येक दिल्लीकराचा विजय असून, प्रत्येक कुटुंबाचा विजय असल्याचं केजरीवाल म्हणाले.
गेल्या पाच वर्षांप्रमाणेच दिल्लीचा विकास आणखी वेगवान करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
केजरीवाल म्हणाले, "निवडणुकीत कुणी आम आदमी पक्षाला मत दिलं असेल वा नसेल, पण मी त्यांचाही मुख्यमंत्री आहे. कुठल्याच पक्ष कार्यकर्त्यासोबत भेदभाव करणार नाही."
तसंच, "निवडणुकीवेळी जे झालं, ते झालं. आमच्या विरोधकांनी आमच्याविरोधात जे म्हटलं, त्यांना आम्ही माफ केलंय. आता सर्व पक्षांना सोबत घेऊन, केंद्र सरकारसोबत मिळून दिल्लीला पुढे नेण्यासाठी काम करायचं आहे," असं केजरीवाल यावेळी म्हणाले.
यावेळी केजरीवालांनी त्यांच्यावर होणाऱ्या टीकेलाही उत्तर दिलं. ते म्हणाले, "जे लोक म्हणतायत की, केजरीवाल सर्वकाही मोफत वाटतायत. अशा लोकांची किव करावीशी वाटते. शिक्षण आणि आरोग्यासाठी मी माझ्या दिल्लीकरांकडून पैसे घेऊ शकत नाही."
अरविंद केजरीवालांनी आपल्या भाषणाच्या शेवटी 'हम होंगे कामयाब...' हे गीतही गायलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)