रेडिओसारखा दिसणारा कारवान, नोकिया फोन पुन्हा बाजारात का आलेत?

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

'बुलंद भारत की बुलंद तस्वीर' म्हणणारी 'हमारा बजाज' ची जिंगल,

'कुछ खास है जिंदगी मैं...'च्या धुनवर क्रिकेटच्या मैदानात दिलखुलास नाचणारी तरुणी,

किंवा मग डोळे विस्फारत 'जलेबी...' म्हणणारा, स्टेशनवर बसलेला छोटासा मुलगा,

आजही हे व्हीडिओ कधी कुठे पाहण्यात आले की त्या काळच्या आठवणीत आपण रमतो, हो ना?

आठवणींमध्ये रमण्याचा हाच नॉस्टॅल्जिया फॅक्टर लक्षात घेऊनच अनेक कंपन्या आजकाल आपले जुने प्रॉडक्ट्स नव्याने बाजारात आणत आहेत. सारेगम कारवा, नोकिया 3310 सारख्या वस्तू किंवा एखादा जुना सिनेमा किंवा गाणं रिमेक होऊन याच भावनेच्या जोरावर बाजारात नव्या रूपात परत आले. त्याच मांदियाळीत गेल्या काही दिवसांत आणखी बरीच नावं सामील झालीयेत.

1. सॅमसंग गॅलेक्सी Z फ्लिप

सॅमसंगने नुकताच बाजारात आणलेला गॅलेक्सी Z फ्लिप फोन हे या नॉस्टाल्जिया मार्केटिंगचं सर्वांत ताजं उदाहरण. काही महिन्यांपूर्वी मोटरोलानेही त्यांचा यशस्वी फ्लिप फोन मोटो रेझर बाजारात पुन्हा एकदा आणला होता.

दिसायला स्लिक, स्टाईलमध्ये उघडणारे आणि खिशात आरामात मावणारे, असे हे फ्लिप फोन्स 2000च्या दशकात चांगलेच मिरवले जायचे. त्यानंतर स्मार्टफोन क्रांती सुरू झाली आणि टचस्क्रीन फोन्सचा काळ उजाडला.

म्हणूनच आता पुन्हा एकदा या फ्लिप डिझाईनचा फोन आणताना मोटरोलाने त्याचं नावही कायम ठेवलं - MotoRazr.

2. नोकिया 3310

असाच आणखी एक अजरामर फोन म्हणजे नोकिया 3310. निळ्या रंगाचा दणकट असा फोन, ज्यावर स्नेक गेम खेळता येई आणि स्वतः रिंगटोन्स कंपोज करणं शक्य होतं, अशा या नोकिया फोनच्या आठवणी सगळ्यांच्या लक्षात आहेत.

त्यामुळेच नोकियाच्या नवीन मालकांनी म्हणजे HMD Globalने जेव्हा असाच एक फोन बाजारात आणला, त्याचं डिझाईन जरा वेगळं होतं, तंत्रज्ञान अद्ययावत होतं, मात्र नाव तेच लोकांच्या आठवणींमधून निघून येणारं - 3310. आणि गंमत म्हणजे मोठ्या टचस्क्रीन मोबाइल्सच्या काळातही लोकांनी कुतूहल किंवा आठवण म्हणूनही हा फोन विकत घेतला.

पण मोबाईल इंडस्ट्रीमध्ये फक्त नॉस्टाल्जियाच्या जोरावर फारसं टिकता आणि कमवता येत नाही, हा धडाही नोकियाला मिळाला.

3. इन्स्टाग्राम कॅमेरा

इन्स्टाग्रामचा लोगो तुम्ही कधी निरखून पाहिलाय? त्यात तुम्हाला जुन्या पोलरॉईड कॅमेऱ्याची झलक दिसेल. हो, तेच कॅमेरा, ज्यातून क्लिक केल्यानंतर एका झटक्यात फोटो बाहेर पडतो. तोच चौकोनी फोटो आता तुम्ही इन्स्टाग्रामवरही टाकता.

एवढंच नव्हे तर त्या रेट्रो काळाची आठवण करून देणारे, तसेच रेट्रो लुक देणारे फिल्टर्ससुद्धा इन्स्टाग्रामवर आहेत. हे सेपिया किंवा ब्लॅक अँड व्हाईट फिल्टर्स म्हणजे तुमच्या मनातल्या नॉस्टाल्जियाचं प्रतिबिंबच.

त्यामुळेच की काय, आता त्या जुन्या पोलरॉईड फोटोच्या धर्तीवर फोटो काढणारे 'इन्स्टा' कॅमेरेही नव्याने बाजारात आलेत आणि तरुणांमध्ये लोकप्रिय झालेत.

4. सारेगामा कारवाचं यश

ब्लूटूथ, वायरलेस स्पीकर्स आणि मोबाईलवर म्युझिक अॅप्सवर गाणी ऐकण्याच्या आजच्या जमान्यात एक मोठा वर्ग यासगळ्यापासून दूर होता. या वर्गाला म्युझिक सिस्टीम किंवा रेडिओवर गाणी ऐकायची सवय होती आणि मनात अजूनही लता-आशा-रफी आणि अमीन सयानींच्या आठवणी होत्या.

साधारण 50च्या पुढे असलेल्या या वयोगटातील लोकांना डाऊनलोड्स, ब्लूटूथ वा वाय-फाय कनेक्शनच्या भानगडीत पडायचं नव्हतं. हीच गोष्ट 'सारेगामा कारवान' बनवणाऱ्यांनी हेरली आणि त्यांनी सामान्य माणसाची गरज पूर्ण करणं तसंच आठवणींना हात घालणं, या दोन्ही गोष्टींची गाठ बांधली.

आता सदाबहार हिंदी तसंच इतर प्रादेशिक भाषांमधली गाणी प्री-लोडेड असलेला, हा जुन्या रेडिओसारखा 'रेट्रो ट्विस्ट' असलेला म्युझिक प्लेयर अनेक घरांमध्ये दिसतो.

त्याची जाहिरातही 'गिफ्टिंग'साठीचा उत्तम पर्याय, अशीच करण्यात येतेय. या जाहिरातीच्या फोटोत आजीआजोबा, आईवडील आणि त्यांना हे गिफ्ट देणारी तरुण पिढी दिसते. या मार्केटिंगमुळेच या प्लेयरने विकत घेणारी तरुण पिढी आणि हा प्लेयर वापरणारी आधीची पिढी या दोहोंचा नॉस्टाल्जिया साधण्याचं काम अचूकपणे केल्याचं दिसतं.

5. चेतकचं पुनरागमन

आठवणी जागं करणारं आणि मोठा बाजारभाव असणारं नाव म्हणजे - बजाज चेतक. 80च्या दशकात आलेल्या या बजाज चेतकसाठी त्या काळी अनेक महिन्यांचं - वर्षाचं वेटिंग असायचं.

मग अॅक्टिव्हाचा काळ आला आणि ऑटोमॅटिक स्कूटर्सच्या शर्यतीत चेतकची मागणी कमी झाली. अखेर 2005 साली बजाज कंपनीने तिचं उत्पादन थांबवलं, मात्र या स्कूटरची लोकप्रियता कायम राहिली.

त्यामुळेच बजाज समूहाने काही आठवड्यांपूर्वीच जेव्हा त्यांची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली तेव्हा तिला हेच नाव दिलं - चेतक इलेक्ट्रिक.

तसंच काही वर्षांपूर्वी व्हेस्पानेसुद्धा भारतीय बाजारात असाच कमबॅक केला. तर तीन वर्षांपूर्वी जावा बाईक्सनेही भारतात पुनरागमन केलं. हे म्हणजे 70-80च्या दशकातील एखाद्या लोकप्रिय हिरोने कमबॅक केल्यासारखंच आहे.

पण एका पिढीसाठी हळवा कोपरा असलेल्या वाहनाचं नाव नवीन पिढीच्या वाहनांसाठी वापरणं कितपत फायद्याचं ठरू शकतं? याविषयी प्रसिद्ध अॅडफिल्ममेकर आणि दिग्दर्शक भरत दाभोळकर सांगतात, "हे म्हणजे वयस्कर व्यक्तीने तरुणासारखं विचार करण्यासारखं झालं. मला चेतक आठवते, त्याला फार रिस्पॉन्स होता म्हणून नवीन इलेक्ट्रिक स्कूटरला चेतक नाव ठेवलं. पण आजच्या पिढीला या चेतकची किती माहिती आहे? हमारा बजाज या कॅम्पेनची आजच्या पिढीला माहिती नाही. जुनी नावं पुन्हा वापरणं हे पॉझिटिव्ह जरी असलं तरी तुम्ही जर तुमचा टार्गेट ग्रुप आणि वय लक्षात घेतलं नाही तर त्याचा फारसा फायदा होणार नाही."

मात्र फक्त टू-व्हीलर्सच नव्हे तर आघाडीच्या कार कंपन्याही हा फॉर्म्युला वापरण्यास उत्सुक आहेत. साधारण पाच वर्षांपूर्वी मारुती सुझुकीने त्यांची जुनी लांबलचक कार बलेनो हिचं बॅज पुन्हा एकदा एका प्रीमियम हॅचबॅकच्या रूपात आणलं.

तर काही दिवसांपूर्वी टाटा मोटर्सनेही आपली जुनी दणकट SUV सिएरा नवीन इलेक्ट्रिक रूपात दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये जगापुढे सादर केली आणि दणकाच उडवला.

या गाडीला टाटा मोटर्सचं अद्ययावत डिझाईन तंत्रज्ञान तर आहेच, पण त्या जुन्या सिएराची काचेची पेटीही त्यांनी या कॉन्सेप्ट स्वरूपात कायम ठेवली आहे.

याविषयी बोलताना टाटा मोटर्सचे डिझाईन हेड प्रताप बोस म्हणाले, "टाटांच्या 'स'वरून सुरू होणाऱ्या तीन दिग्गज गाड्या होत्या - सफारी, सुमो आणि सिएरा. यंदा टाटा मोटर्सचं 75वं वर्ष आहे, त्यामुळे आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यामुळे ज्यांनी 'सिएरा'सारखी गाडी आणली होती, त्यांचे आम्हाला या गाडीच्या रूपाने आभार मानायचे आहेत."

6. सिनेसृष्टी आणि रिमेक्स

नॉस्टाल्जिया ही भावना शब्दाने प्रचलित नसली तरी ती प्रत्येकाला ती जाणवतेच. म्हणूनच गेल्या आठवड्यात सचिन तेंडुलकरला तब्बल साडेपाच वर्षांनी बॅटिंग करताना पाहून अनेकांचे डोळे पाणावले.

आता या नॉस्टाल्जिया फॅक्टरपासून सिनेक्षेत्र अलिप्त राहिलं असतं तर नवलच.

त्यामुळेच बॉलिवुडमध्ये 'हिम्मतवाला', 'जुडवा' आणि नुकताच 'लव्ह आज कल' सारख्या सिनेमांचे रिमेक येतायत. किंवा 'याद पिया की आने लगी…', 'आँख मारे…', 'तम्मा तम्मा' अशी गाणी नवी टेक्नो ठेक्यांसह पुन्हा हिट होतायत.

आणि फक्त भारतातच नव्हे तर हॉलिवुडमध्येही डिस्नेने 'लायन किंग', 'ब्युटी अँड द बीस्ट', 'डम्बो', 'जंगल बुक' अशा त्यांच्या यशस्वी चित्रपटांचे रिमेक काढलेत.

नॉस्टाल्जियाचं मार्केटिंग

अनेकदा जुने, पूर्वी पाहिलेले चित्रपट टीव्हीवर लागले की आपण त्यात रमतो. कारण त्या सिनेमाची गोष्ट माहिती असली तरी त्याच्याशी निगडित आपल्या आठवणी असतात. याच तुमच्याआमच्या मनातल्या आठवणींचा, त्या नॉस्टाल्जियाचा आधार या सर्व वस्तूंच्या जाहिरातीत घेतला जातो.

यापैकी बहुतांश गोष्टी 80 वा 90च्या दशकात घडून गेलेल्या आहेत. आणि याच कालावधीत मोठी झालेली पिढी सध्याची कमावती पिढी आहे. त्यामुळे त्यांना टार्गेट करून गोष्टींचं मार्केटिंग केलं जातंय. आणि या नॉस्टाल्जियाचा जाहिरातींसाठी वापर केल्यास लोक जास्त खर्च करतात, असं 'जर्नल ऑफ कन्झ्युमर रिसर्च'ने केलेल्या संशोधनात आढळून आलंय.

म्हणूनच खाद्यपदार्थांपासून ते खेळण्यांपर्यंतच्या सगल्या गोष्टी विकण्यासाठी याचा वापर केला जातो.

या जर्नलने केलेल्या पाहणीनुसार अनेक ब्रँड्स आपल्या आताच्या उत्पादनांचं मार्केटिंग करण्यासाठी स्वतःचीच जुनी उत्पादनं वा या उत्पादनांच्या जुन्या आवृत्त्या, फोटो वापरतात. जुन्या गोष्टींची वा काळाची आठवण करून दिल्याने ग्राहकांमध्ये या गोष्टींची आपलं नातं असल्याची भावना निर्माण होते. आणि अशावेळी पैशांना प्राधान्य वा महत्त्वं दिलं जात नाही. म्हणूनच एखादी व्यक्ती नॉस्टॅल्जिक असताना जास्त खरेदी करण्याची शक्यता असते.

अॅडफिल्ममेकर आणि दिग्दर्शक भरत दाभोळकर याविषयी सांगतात, "कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करताना ते कोणत्या वयोगटासाठी आहे हे लक्षात घ्यावं लागतं. त्यातही प्रत्येक वयोगटासाठी नॉस्टाल्जिया वाटण्याचा काळ वेगवेगळा असतो. 20 वर्षांचा तरुण आणि 50 वर्षांची एखादी व्यक्ती, यांचा नॉस्टाल्जियाचा काळ वेगवेगळा असतो.

"जे एखाद्या 50 वर्षांच्या व्यक्तीला नॉस्टाल्जिक वाटतं ते 20 वर्षांच्या मुलाला वाटणार नाही, कारण त्याला ती गोष्ट कदाचित माहितीच नसेल. नॉस्टाल्जिया म्हणजे भूतकाळ आठवणं. त्यामुळे एकच कॅम्पेन सगळ्यांसाठी चालत नाही. जाहिरात करताना याचा विचार करणं अतिशय महत्त्वाचं असतं."

"पण एखाद्या उत्पादनासाठी नॉस्टाल्जिया फॅक्टरचा फायदा म्हणजे ते नाव ओळखीचं असतं, तो शब्द ओळखीचा असतो. आपल्याला भूतकाळ हा वर्तमानकाळापेक्षा नेहमीच चांगला वाटतो. भूतकाळातल्या वाईट गोष्टी आपण बाजूला ठेवतो. त्यामुळे लोकांच्या मनात जुन्या गोष्टींविषयी पॉझिटिव्ह भावना असतात. अॅडव्हर्टायजिंगमध्ये याचा फायदा होतो. ब्रँड नेम किंवा ब्रँड कॉन्सेप्टला याचा फायदा होतो," असं सांगतात.

आपण नॉस्टाल्जियात का रमतो?

'Nostos' म्हणजे परतणे (return) आणि 'algos' म्हणजे वेदना (pain) या मूळ ग्रीक शब्दांवरून या Nostalgia शब्दाची व्युत्पत्ती झाली. 'नॉस्टाल्जिया' (Nostalgia) हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला 17व्या शतकात. घरापासून दूर असणाऱ्या स्विस सैनिकांमधली एक विशिष्ट भावना सांगण्यासाठी हा शब्द वापरण्यात आला.

काळानुसार याची व्याख्या बदलली आणि त्यामध्ये घराची आठवण येणं म्हणजेच homesickness, याशिवाय इतर गोष्टींचाही समावेश झाला. एखादी व्यक्ती, वस्तू वा घटनेशी 'कनेक्ट' होण्यासाठी ही भावना महत्त्वाचं काम करते.

याच नॉस्टॅल्जियाचा वापर राजकीयदृष्ट्या करण्याचाही वापर सर्रास होतो. त्यामुळेच तामिळनाडू ते अगदी दिल्लीपर्यंत राजकीय नेत्यांवरचे बायोपिक सर्वत्र पाहायला मिळतात.

उदाहरण द्यायचं झालं तर, गेल्या वर्षी ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आलेला 'ठाकरे' हा सिनेमा.

"बाळासाहेबांची इमेज वारंवार लोकांपुढे आणणे आणि त्यातून शिवसैनिकांना प्रेरणा देणे, यासाठीच हा सिनेमा काढला गेला आहे," असं मत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश आकोलकर यांनी तेव्हा बीबीसी मराठीशी बोलताना मांडलं होतं.

आधीच्या पिढ्यांसाठी मोजके फोटो, वस्तू वा आठवणी याच भूतकाळात रमण्याचं माध्यम होत्या. पण टेक्नॉलॉजीमुळे आजची पिढी ही जास्त 'नॉस्टाल्जिक' झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

या टेक्नॉलॉजीमुळे आजच्या पिढीला त्यांच्या बालपणातल्या गोष्टी, क्षण पुन्हा अनुभवता येतात. याविषयी सांगताना मानसोपचार तज्ज्ञ मानसी जोशी म्हणतात, "जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने तणाव कमी होतो आणि आनंदी भावना जागृत होते हे सिद्ध झालेलं आहे.

"नॉस्टाल्जिया मार्केटिंगचा ट्रेंड काम करतो, कारण ही भावना तरुण पिढीला आणि पन्नाशीच्या पुढच्या ज्येष्ठांना भुरळ पाडतो. धकाधकीच्या, तणावाच्या आणि सोशल मीडियाने एकाकी केलेल्या आयुष्यात नॉस्टाल्जिया गतकाळाशी नाळ जोडून ठेवण्याचं काम करतो, सामाजिक बंध निर्माण करतो. आपलेपणाची, सामायिकतेची भावना देतो. जी या दोन्ही वयोगटांना स्वाभिमान देते."

तुम्ही कोणत्या गोष्टींविषयी नॉस्टाल्जिक आहात? कोणती एखादी वस्तू किंवा ब्रँड तुम्हाला परत आणायला, विकत घ्यायला किंवा पाहायला आवडेल?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)