'घर चालवण्यासाठी मी डोक्यावरचे केस विकले तेव्हा...'

माझा सात वर्षांचा मुलगा कलियाप्पन शाळेतून घरी आला. आल्यावर त्याने भूक लागली असं सांगितलं. खायला काही नसल्याने मग तो रडायलाच लागला असं प्रेमा सेल्वम यांनी सांगितलं.

तामिळनाडूमधल्या सेलम जिल्ह्यात 31 वर्षीय प्रेमा राहतात. त्यांना आपल्या मुलांना खायला प्यायला देण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. म्हणूनच त्यांना असहाय्य वाटतं आहे.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

3 जानेवारीला त्याच्याकडे शिधा संपला त्यामुळे त्यांनी स्वयंपाक केला नाही. एकामागोमाग एक घडलेल्या दु:खद घटनांमुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.

'हृदयद्रावक प्रसंग'

"माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही. त्याचं मला वाईट वाटतं. हृदय पिळवटून निघतं. माझ्या मुलांना जर मी जेवू-खावू घालू शकत नसेन तर माझ्या जगण्याचा काय उपयोग?" असं प्रेमा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

प्रेमा यांच्याकडे कोणतीही मालमत्ता नाही, दागिने नाहीत, चीजवस्तू नाहीत. एवढंच नव्हे तर स्वयंपाकघरात वापरली जाणारी भांडीही नाहीत जी विकून पैसे उभे करता येतात.

"माझ्याकडे दहा रुपयांची नोटही नाही. माझ्याकडे फक्त प्लॅस्टिकच्या बादल्या आहेत."

आपल्याकडे विकून पैसे करण्यासारखं काहीही नाही असं त्यांच्या लक्षात होतं.

वजनावर केस विकले

एका दुकानात केस विकले जात असल्याचं मला आठवलं. त्या दुकानात मी गेले. डोक्यावरचे सगळे केस कापू दिले. त्या बदल्यात मला दीडशे रुपये मिळाले असं प्रेमा यांनी सांगितलं.

मानवी केसांची जगभर विक्री केली जाते आणि भारत हा त्याचा सगळ्यांत मोठा निर्यातदार देश आहे. विकलेल्या केसांचा उपयोग गंगावन आणि विग बनवण्यासाठी होतो.

काही हिंदू भाविक देवाकडे केलेला नवस पूर्ण झाला की आपले केस अर्पण करतात. विक्रेते हे केस विकत घेतात आणि परदेशात विकतात.

नवऱ्याची आत्महत्या

प्रेमा यांना केस विकून जी तुटपुंजी रक्कम मिळालेय त्यातून एखाद्या मोठ्या शहरात फक्त एका वेळचं जेवण होऊ शकतं. मात्र गावात राहताना ही रक्कम बरीच मोठी आहे.

प्रत्येकी वीस रुपये या दराच्या तीन भाताच्या पॅकेट्स तीन मुलांसाठी मी विकत घेऊ शकले. प्रेमा यांनी तो भात मुलांना खाऊ घातला मात्र हा तात्पुरता दिलासा आहे.

हातातला शेवटचा पर्यायही निसटून गेल्याचं प्रेमा यांच्या लक्षात आलं आहे. आता कुटुंबासाठी पुढच्या जेवणाचं काय करायचं असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.

गेली अनेक वर्षं प्रेमा आपल्या नवऱ्याबरोबर वीटभट्टीत काम करत होत्या. त्यातून त्या जगण्याला आवश्यक पैसे मिळवत असत.

त्यांच्या नवऱ्याने स्वत:ची वीटभट्टी सुरू करण्यासाठी कर्ज घेतलं होतं. पण ते प्रत्यक्षात साकार होऊ शकलं नाही. त्यांचा नवरा पुरेसे पैसे उभे करू शकला नाही. त्यामुळे त्यांची अवस्था केविलवाणी झाली.

त्यांच्या नवऱ्याने सात महिन्यांपूर्वी आयुष्य संपवलं.

प्रेमा यांचाही आत्महत्येचा प्रयत्न

त्यांनी केस विकले आणि थोडे पैसे मिळवले. त्यानंतर पैसा मिळवण्याचा कोणताच उपाय नसल्याने त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार आला.

त्यांनी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला. एका दुकानदाराने त्यांना रोखलं आणि नंतर बहिणीने त्यांना वाचवलं.

नवऱ्यावरचं कर्ज कसं फेडायचं या चिंतेने त्यांना घेरलं होतं.

काम

नवऱ्याच्या मृत्यूनंतर प्रेमा या घरातल्या एकमेव कर्त्या राहिल्या. वीटभट्टीचं काम त्या करतात. हे काम शारीरिक कष्टाचं आहे. कृषी मजूर म्हणून काम करण्यापेक्षा यात थोडे बरे पैसे मिळतात.

मी जेव्हा कामावर जातो तेव्हा मला 200 रुपये मिळतात. घर चालवण्यासाठी तेवढे पैसे पुरेसे आहेत असं प्रेमा सांगतात.

कामाच्या ठिकाणी त्या दोन मुलांना घेऊन जातात कारण ती मुलं अजून मोठी झालेली नाहीत.

केस विकण्याच्या तीन महिने आधी काम करत असताना त्या आजारी पडत. त्यामुळे त्यांना अपेक्षित पैसे मिळू शकले नाहीत.

मी जड विटा घेऊन जाण्याचं काम करू शकत नसे. अंगात ताप असल्यामुळे बहुतांश दिवस मी घरीच काढले असं त्यांनी सांगितलं.

कर्जाचा वाढता डोंगर

प्रेमा यांच्यावरचा कर्जाचा बोजा वाढला. पतसंस्थांनी कर्जाचा हप्ता चुकवण्यासाठी तगादा लावला तेव्हा त्यांचं नैराश्य वाढलं.

प्रेमा निरक्षर आहेत आणि त्यांना मदत होऊ शकेल अशा सरकारी योजनांची त्यांना माहिती नाही.

देशातल्या बँकिंग यंत्रणांचे कायदेकानू जटिल असल्याने गरीब जनतेला स्वस्त दरात कर्ज मिळणं अवघड होतं.

प्रेमा आणि त्यांच्या नवऱ्याने स्थानिक पतसंस्था, सावकारांकडून कर्ज घेतलं होतं. या कर्जाला कायदेशीर चौकट नसल्याने व्याजाचं प्रमाण वाढत गेलं.

प्रेमा यांचं आजारपण वाढत गेल्याने घरी येणारा पैसा घटत गेला. त्यामुळे त्यांचं आयुष्य ओढग्रस्तीला लागलं.

त्यावेळी त्यांनी स्वत:चे केस विकण्यासारखा टोकाचा निर्णय घेतला. आत्महत्येचा विचारही त्यातूनच डोकावला.

अनोळखी व्यक्तीकडून मदत

आयुष्य रसातळाला गेलं असं वाटत असतानाच त्यावेळी त्यांच्या आयुष्यात एक माणूस देवदूतासारखा धावून आला.

बाला मुरुगन यांना एका मित्राकडून प्रेमा यांच्याबद्दल समजलं. प्रेमा यांचा संघर्ष ऐकून बाला यांना त्यांच्या कुटुंबासमोरचा आव्हानात्मक काळ आठवला.

गरिबीमुळे एखाद्या कुटुंबावर किती विदारक परिस्थिती ओढवू शकते याची कल्पना बाला यांना होती. बाला दहा वर्षांचे असताना त्यांच्या कुटुंबाची जेवायला नाही अशी परिस्थिती होती. बाला यांच्या आईने पुस्तकं आणि रद्दी विकून कुटुंबाची गुजराण केली.

नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या बाला यांच्या आईच्या मनात मुलांसह आत्महत्या करण्याचा विचार डोकावला. अगदी शेवटच्या क्षणी त्यांचं मन परिवर्तन झालं आणि त्यांचा जीव वाचला.

लहानपणी जशी परिस्थिती होती तसं आता बाला यांचं आयुष्य नाही. अनेक वर्षं संघर्ष केल्यानंतर आता ते गरिबीत जगत नाहीत. आता त्यांचं स्वत:चं कॉम्प्युटर ग्राफिक्स सेंटर आहे.

मैत्रीपूर्ण सल्ला

बाला यांनी आपली कहाणी प्रेमा यांच्यासमोर मांडली. त्यातूनच प्रेमा यांना नवा आशेचा किरण सापडला.

बाला यांचे मित्र प्रभू यांनी प्रेमा यांना अन्नधान्य विकत घेण्यासाठी पैसे दिले. बाला यांनी घडलेला प्रसंग सोशल मीडियावर शेअर केला.

एका दिवसाच्या आत 1 लाख 20 हजार रुपये जमा झाले. प्रेमा यांना मी हे सांगितलं तेव्हा त्यांना प्रचंड आनंद झाला. या पैशातून कर्जाची रक्कम फिटेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

प्रेमा यांच्या विनंतीनंतर निधीउभारणीचा प्रयत्न थांबवण्यात आला.

कामावर परतेन आणि उरलेल्या पैशाची परतफेड करेन असं प्रेमा यांनी सांगितलं.

त्यांना विविध पतदारांना प्रत्येकी 700 रुपये द्यायचे आहेत. जिल्हा प्रशासनाने मध्यस्थी करत प्रेमा यांना मदताची तयारी दर्शवली आहे. दूधविक्रीसंदर्भात कामाचं कंत्राट मिळवून देण्याचं आश्वासन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

प्रेमा यांची कहाणी एकमेव नाही. भारताच्या आर्थिक विकासाबाबत चर्चा सुरू असतानाच लक्षावधी लोकांना दररोजच्या जेवणाची भ्रांत आहे.

वर्ल्ड बँकेनुसार, जगातील सगळ्यांत गरीब माणसं असणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक दुसरा आहे. नायजेरिया पहिल्या क्रमांकावर आहे.

प्रेमा यांना चार जणांचं कुटुंब चालवायचं आहे. गरिबातल्या गरीब व्यक्तींमध्ये प्रेमा यांची गणना होते.

नवं आयुष्य

बाला मुरुगन यांनी पाठिंबा कायम राहील असं प्रेमा यांना सांगितलं आहे.

आत्महत्या करणं हा चुकीचा विचार होता असं प्रेमा यांनी सांगितलं. उरलेलं कर्ज मी फेडेन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मिळालेल्या मदतीने मी भारावून गेले आहे असं त्यांनी सांगितलं. लोकांच्या मदतीने मला प्रचंड ऊर्जा मिळाली आहे, त्याने मला नवं आयुष्य मिळवून दिलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)