आर्थिक पाहणी अहवाल : विकास दर 6 ते 6.5 टक्के राहाण्याची शक्यता

फोटो स्रोत, Getty Images
नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प शनिवारी एक फेब्रुवारी रोजी मांडला जाईल.
त्यापूर्वी म्हणजे आज शुक्रवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 2019-20 या आर्थिक वर्षाचा आर्थिक पाहाणी अहवाल सादर करण्यात आला.
अर्थ मंत्रालयाने तयार केलेल्या आर्थिक पाहणी अहवालाच्या आधारेच अर्थसंकल्प तयार केला जातो.
आर्थिक पाहणी अहवालातील प्रमुख मुद्दे
आर्थिक पाहणी अहवालातील माहितीनुसार 2020-21मध्ये जीडीपीचा वृद्धी दर 6.0 ते 6.5 टक्के राहाण्याची शक्यता आहे.
या अहवालावर भाष्य करताना सरकारने आता आर्थिक सुधारणांवर भर देण्याचे निश्चित केलं आहे.
आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार एप्रिल 2019 मध्ये असणारा महागाईचा दर 3.2 च्या तुलनेत डिसेंबर 2019 मध्ये 2.6 पर्यंत खाली आला होता.
जीएसटी संकलनामध्ये 4.1 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
2019 हे वर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत कठिण होतं, त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही दिसून आल्याचं सरकारनं या अहवालात मान्य केलं आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला अभिभाषण केलं. त्यांनी दोन्ही सभागृहांच्या एकत्रित बैठकीला संबोधित केलं.
तत्पुर्वी गुरुवारी सर्वपक्षीय बैठकही झाली. या बैठकीमध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि एनआरसीवर तणाव दिसून आला.
त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्याचे पदसाद दिसू शकतात. एनआरसी आणि सीएएवरून रालोआमधील घटकपक्ष शिरोमणी अकाली दलाने विरोधी मत प्रदर्शित केलं आहे. तसंच मोदी सरकारला अनेकदा मदत करणाऱ्या बिजू जनता दलानेही याविरोधात भूमिका घेतली आहे.
राष्ट्रपती आपल्या अभिभाषणात म्हणाले, "हे दशक भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या दशकात आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षं पूर्ण होतील. हे दशक आणि हे शतक भारताचं म्हणून ओळखलं जावं यासाठी माझ्या सरकारनं पाया रचला आहे. ही संसद आणि सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येक सदस्याकडून राष्ट्रहित सर्वोच्च स्थानी ठेवून देशातील नागरिकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने आवश्यक कायदे व्हावेत अशी अपेक्षा आपली राज्यघटना ठेवते. गेल्या सात महिन्यांमध्ये संसदेने काम करण्याचे नवे विक्रम केले आहेत त्याचा मला आनंद आहे. या लोकसभेच्या पहिल्या सत्राच्या कामगिरीने गेल्या सात दशकांतील एक विक्रम केला आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









