Saina Nehwal: बॅडमिंटनपटू सायना नेहवालने भाजप प्रवेश का केला?

फोटो स्रोत, ANI
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
निवडणुकीच्या राजकारणाला आपण गंमतीने राजकीय आखाड्याची उपमा देतो. पण नुकतीच झालेली हरियाणा विधानसभा निवडणूक आणि येऊ घातलेली दिल्लीची निवडणूक बघितली तर ही उपमा अगदीच सार्थ आहे.
हरियाणामध्ये कुस्तीपटू बबिता फोगट आणि योगेश्वर दत्त यांनी अलीकडेच भाजपाकडून निवडणूक लढवली. यावर्षी लोकसभा निवडणुकीत माजी क्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या तिकिटावर निवडूनही आले. तर कृष्णा पुनिया आणि विजेंदर सेहवाग यांनीही काँग्रेसकडून आपापलं नशीब आजमावलं.
त्यातच आता भारताची बॅडमिंटन क्वीन, ऑलिम्पिक ब्राँझ विजेती आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित सानिया नेहवाल आज अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीत सामील झाली.
क्रिकेटशिवाय इतर खेळांत ज्या कमी लोकांनी देशासाठी नाव कमावलं आणि यशस्वी कारकीर्द घडवली, त्यातली एक सायना आहे. तिला देशात फॅन फॉलोइंग आहे. अशावेळी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्याची तयारीही तिने दाखवली आहे. भाजपाच्या निवडणूक कॅम्पेनचा चेहराच त्यामुळे बदलणार आहे.
सायनाचा राजकारण प्रवेश कधी आणि कसा ठरला?
सायनाला सोशल मीडियावर सक्रीय आहे. तिचे ट्वीट्स आणि फेसबुक पोस्ट बऱ्याचदा ती स्वत: टाकते आणि 2019मध्ये लोकसभेत नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले, त्या दिवशीच्या सायनाच्या एका ट्वीटने सगळ्यांचंच लक्ष वेधलं होतं. 'फिर एक बार मोदी सरकार' असा हॅशटॅग वापरून तिने मोदी सरकारला दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. हा हॅशटॅग भाजपाचं प्रचाराचं वाक्य होतं.

फोटो स्रोत, Twitter
दिवाळीत अनेक सेलिब्रिटींनी नरेंद्र मोदी यांचा महिला सक्षमीकरणाचा संदेश रिट्वीट करत मोदी सरकारचे आभार मानले होते. त्यातही सायना आघाडीवर होती.
पण, सायनाचा राजकीय कल भाजपाच्या बाजूने तयार करण्याचं श्रेय खऱ्या अर्थाने भाजपाचे माजी अध्यक्ष अमित शाह यांना द्यावं लागेल. 2019च्या निवडणुकीपूर्वी शाह अध्यक्ष असताना त्यांनी देशभरात भाजपा संपर्क यात्रा काढली होती.
प्रथितयश लोकांच्या घरी स्वत: जाऊन भाजपाचा जाहीरनामा त्यांनी समजून सांगितला होता. उघड आहे की, त्यातच पुढे यातल्याच अनेकांना पक्षाची निवडणूक रणनीती म्हणून भाजपाने तिकीटही देऊ केलंय.
त्यात एक नाव सायनाचंही होतं. सायना आणि भाजपा यांच्यातला हा पहिला अधिकृत संवाद म्हणावा लागेल. तिथून पुढे सायना राजकीयदृष्ट्या जास्त सजग झाली, हे तिच्या ट्वीटवरून सहज सांगता येईल.

फोटो स्रोत, Twitter / @NSaina
आजही सायनाने मीडियाशी बोलताना आपली राजकीय भूमिका सांगितली. ती सांगताना तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नरेंद्र मोदी सर असा उल्लेख केला. सायना तिचे गुरू पुलेला गोपीचंद आणि बॅडमिंटनमधल्या सर्व वरिष्ठ खेळाडूंना सर म्हणते. आज तोच मान तिने मोदींना दिला.
शिवाय "ते आपल्या सारखे मेहनती आहेत, आपलाही मेहनतीवर भर असतो. त्यामुळे देशासाठी काही करायचं असेल तर अशा व्यक्तीबरोबर काम करायला आवडेल," असं ती म्हणाली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
राजकीय प्रवेशाचं टायमिंग
कुठल्याही खेळात चपळता आणि बरोबरीनं महत्त्वाचं ठरतं ते टायमिंग. राजकारणातही टायमिंगला तेच महत्त्व आहे. आणि इथं टायमिंग आहे ते येऊ घातलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीला. 8 तारखेला मतदान होणार आहे. आणि त्यापूर्वी स्टार प्रचारक म्हणून पक्षाबरोबर राहण्याचं कर्तव्य बजावायला सायना तयार आहे.
सायनाबरोबरच तिची बहीण चंद्रांशू नेहवालही भाजपात आली आहे. चंद्रांशू गेली 10-15 वर्षं दिल्लीत स्थायिक आहे. स्वत: सायनाचं दिल्लीत घर आहे. या कृतीतून दोघा बहिणींची राजकारणाकडे बघण्याचं गांभीर्य नक्कीच जाणवत होतं. त्यामुळे पुढे मागे सायना निवडणूक लढवताना दिसली तर आश्चर्य वाटू नये.
2020 हे ऑलिम्पिक वर्षं आहे. सायनाही जुलै महिन्यात होणाऱ्या या महास्पर्धेसाठी तयारी करतेय. जागतिक क्रमवारीत ती सध्या 9व्या स्थानावर आहे. पण अलीकडेच सायनाला जडलेल्या दुखापतींमुळे ती पुढे किती काळ खेळत राहील हा प्रश्न आहे. अशावेळी सगळं सुरळीत झालं तर पुढच्या लोकसभा किंवा तेलंगाणा निवडणुकीचं लक्ष्य सायना ठेवू शकते.
सायनाचे वडील हरविंदर नेहवाल हैद्राबादच्या कृषी विद्यापीठात शास्त्रज्ञ होते. त्यांचा लोकसंपर्कही दांडगा आहे. त्यांच्याकडूनही जनसंपर्काचे बाळकडू सायनाला मिळालेलं असू शकतं. सध्यातरी भारतीय जनता पार्टी आणि सायना नेहवाल या दोघांनाही या निमित्तानं आपलं ब्रँड मूल्य वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
राजकीय नेता म्हणून कशी असेल सायना?
आजच्या घडीला सायना राजकारण प्रवेशावरून उत्साही आहे. राजकीय विचारसरणी तिने आतापर्यंत कधीच मांडली नाहीये. पण, सध्याचा तिचा आवेश काहीतरी करून दाखवण्याचा आहे. आता प्रश्न एवढाच आहे की तिची दूरदृष्टी काय आहे?
यापूर्वी अनेकांनी राजकीय वाट धुंडाळली आहे. आताही दोन उदाहरणं ठळक समोर येतात - मेरी कोम आणि सचिन तेंडुलकर. दोघे राज्यसभेवर असले तरी एकीकडे सचिन कसाबसा एका राज्यसभेच्या सेशनला हजर राहिला. तर मेरी कोम मणिपूरची प्रतिनिधी म्हणून खमकेपणाने दिल्लीत पाय रोवून आहे. तिथल्या लोकांचे प्रश्न ती मांडते. खासदार निधीचा वापर त्यांच्यासाठी करते.
सायनासाठी या सगळ्या चर्चा अंमळ लवकर आहेत. कारण, सध्यातरी ती निवडणूक लढवणार नाहीये. पण, इथे तिचं लक्ष्य नेमकं काय आहे, हे तिने कृपया उलगडून सांगावं.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









