महिला राजकारण्यांना होते शिवीगाळ आणि मिळतात बलात्काराच्या धमक्या

बलात्काराच्या धमक्या, शिव्या, घाणेरड्या अश्लील कमेंट्स आणि महिलाविरोधी भाषा असं सगळं सहन करतात भारतीय महिला राजकारणी.

ट्रोल पेट्रोल इंडिया, एक्सपोजिंग ऑनलाईन अब्यूज फेस्ड बाय वूमन पॉलिटिशियन्स या नव्या अभ्यासात ही गोष्ट समोर आली आहे. ट्विटरवर अनेकदा महिला राजकारण्यांना शिवीगाळ होते, त्यांना अपमानकारक वक्तव्याचा सामना करावा लागतो हेही समोर आलं आहे.

अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या सहकार्यांने केलेल्या या रिसर्चमध्ये 95 भारतीय महिला राजकारण्यांची नाव घेऊन केलेल्या, किंवा त्यांना केलेल्या रिप्लाइजचा अभ्यास केला. हा अभ्यास 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान केला गेला होता.

या रिसर्चमध्ये लक्षात आलं की या 95 महिला नेत्यांना mention करून किंवा रिप्लाय म्हणून जितके ट्वीट केले गेले होते, त्यापैकी 13.8 टक्के ट्वीट अपमानकारक, सेक्सिस्ट अशा स्वरूपाचे होते. टक्केवारी कमी वाटली, तर या ट्वीटचा आकडा 10 लाखाहून अधिक होता.

फक्त मार्च 2019 ते मे 2019 या काळात हे ट्वीट केलेले होते. म्हणजेच, रोज जवळपास 10 हजार ट्वीटस, ज्यात महिला नेत्यांच्या जातीबद्दल, धर्माबद्दल वक्तव्य केली गेली होती.

या अभ्यासाचे निष्कर्ष

  • अम्नेस्टी इंटरनॅशनच्या या अभ्यासानुसार काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या.
  • भारतातल्या महिला नेत्यांना अमेरिका, युके आणि इतर अनेक देशांच्या तुलनेत जास्त ऑनलाईन ट्रोलिंग सहन करावं लागतं.
  • या महिला नेत्यांविषयी केल्या गेलेल्या प्रत्येक 7 पैकी एक ट्वीट अपमानकारक होतं.
  • महिला नेता जितकी जास्त लोकप्रिय, तितकं जास्त ट्रोलिंग.
  • मुस्लीम महिला नेत्यांना हिंदू महिला नेत्यांच्या तुलनेत 55 टक्के जास्त ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
  • दलित तसंच मागासवर्गीय महिला नेत्यांना जातीवाचक शिवीगाळ झाली, त्यांना 59 टक्के जास्त ट्रोलिंग सहन करावं लागलं.
  • एकल, मग अविवाहित असतील, घटस्फोटीत किंवा विधवा, अशा नेत्यांना विवाहित महिला नेत्यांच्या तुलनेत 40 टक्क्यांहून जास्त शिवीगाळ करणारे तर 30 टक्क्यांहून जास्त अपमान करणाऱ्या ट्वीटला सामोरं जावं लागलं.
  • भारतीय जनता पक्षांच्या महिला नेत्यांना इतर पक्षांच्या नेत्यांच्या तुलनेत कमी ट्रोलिंग झालं. भारतीय जनता पक्षांच्या महिला नेत्यांबद्दल केलेले 18 टक्के ट्वीट अपमानकारक होते, तर काँग्रेसच्या महिला नेत्यांच्या बाबतीत केलेले 20 टक्के ट्वीट अपमानकारक होते आणि इतर पक्षांच्या नेत्यांच्या बाबतीत झालेले 21 टक्के ट्वीट आपत्तीजनक होते.
  • ज्या महिला नेत्या निवडणूक हरल्या त्यांना जास्त शिवीगाळ झाली.
  • सगळ्यांत जास्त अपमानकारक ट्वीट हिंदी, त्यापाठोपाठ इंग्लिशमध्ये झालेत. मराठीमध्ये अशाप्रकारच्या शिवीगाळीचं प्रमाण 5 टक्के आहे.

महिला नेत्यांचं म्हणणं काय?

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या कविता कृष्णन म्हणतात, "नुस्त्या बलात्काराच्याच धमक्या मिळतात असं नाहीये, बऱ्याचदा लोक तू किती कुरुप आहेत, शी तुझ्यावर कोण बलात्कार करणार हेही म्हणतात. कधी कधी तर माझ्या प्रायव्हेट पार्टसची वर्णनं लिहितात, तर कधी माझ्यावर किती घृणास्पदरितीने बलात्कार करावा याची वर्णनं असतात."

महिला नेत्यांच्या शरीरावर, त्यांच्या कुटुंबावर अनेकदा घाणेरड्या कमेंट केल्या जातात.

काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख हसीबा अमीन म्हणतात की, "लोक माझ्या चारित्र्यावरून कमेंट करतात. मी म्हाताऱ्या पुरुषांशी सेक्स करते असं लिहितात. हे खूप त्रासदायक आहे. माझ्या मुस्लीम असण्यावरही टीका केली जाते, शिवीगाळ केली जाते."

भाजपच्या शाझिया इल्मी म्हणतात, "जितक्या घाणेरड्या गोष्टी माणसाच्या मनात येऊ शकतात, त्या सगळ्या मी सहन करते. ज्या लोकांना माझी मत पटत नाहीत, ते लोक माझ्याशी चर्चा वगैरे करत नाहीत, तर शक्य त्या भाषेत मला वेश्या म्हणून मोकळे होतात."

ट्विटरचं उत्तर

या रिसर्चवर प्रतिक्रिया देताना ट्विटरने म्हटलंय की, "अशी घाणेरडी भाषा, स्पॅम आणि ऑनलाईन छळापासून या प्लॅटफॉर्मला मुक्त करणं ही आमची प्रायोरिटी आहे. आम्ही त्याच दिशेने काम करत आहोत आणि आमचा प्रयत्न आहे की लोकांचा ट्विटरचा अनुभव सकारात्मक असावा. अर्थात अनेक महिला नेत्यांचं या प्रतिक्रियेमुळे समाधान झालेलं नाही. त्यांचं म्हणणं आहे की ट्वीटर महिलांचं संरक्षण करण्यात अयशस्वी ठरलं आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)