You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
निर्भया केस : फाशीच्या दिवशी नेमकं काय होतं?
निर्भया बलात्कार प्रकरणातील 4 आरोपींना पहाटे 5.30 वाजता फासावर लटकावण्यात आलं.तिहार तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली.
पण तुम्हाला माहितेय की फाशीच्या दिवशी काय काय होतं? भारतात 30 हून अधिक जेल्समध्ये गुन्हेगारांना फाशी देण्याची सोय आहे. म्हणजे इथे फाशीचा स्तंभ आहे.
प्रत्येक राज्याचं फाशीच वेगळं मॅन्युअल असतं. काही राज्यांमध्ये कैद्यांना फाशीच्या आधी 14 दिवसांचा वेळ दिला जातो. म्हणजे कैदी आपल्या कुटुंबियांना भेटू शकेल आणि आपल्या फाशीची मानसिकरित्या तयारी करू शकेल. जेलमध्ये कैद्यांचं काउन्सिलिंगही होतं. जर कैद्याला आपलं मृत्यूपत्र तयार करायचं असेल तर त्याला त्याची परवानगी दिली जाते. यात कैदी आपली शेवटची इच्छा सांगू शकतो.
जर गुन्हेगाराची इच्छा असेल की आपल्या फाशीच्या वेळेस आपल्या धर्मानुसार पंडित, मौलवी, फादर किंवा इतर धर्मगुरु उपस्थिती राहावेत तर त्याचीही परवानगी दिली जाते. याचं नियोजन तुरुंगाच्या अधिक्षकांनी करायचं असतं.
फाशीच्या कैद्याला वेगळ्या कोठडीत ठेवावं लागतं. फाशीच्या शिक्षेची सगळी जबाबदारी तुरुंग अधिक्षकांची असते. फाशीचा स्तंभ, दोर, कैद्याच्या चेहऱ्यावर टाकायचं कापड, सगळं नीट असावं, वेळेवर मिळावं याची तजवीज त्यांना करावी लागते. त्यांना हेही बघावं लागतं की फाशीचा स्तंभ व्यवस्थित उभा आहे, त्याच्या खटक्याला तेलपाणी केलेलं आहे, तिथली साफसफाई झालेली आहे आणि फाशीचा दोर मजबूत आहे.
फाशीच्या एक दिवस आधी संध्याकाळी फाशीचा स्तंभ आणि दोराची पुन्हा तपासणी केली जाते. फाशीचा दोरावर वाळूचं पोत लटकवलं जातं, ज्याचं वजन कैद्याच्या वजनापेक्षा दीडपट जास्त असतं. फाशी नेहमीच सकाळी सकाळी म्हणजेच सुर्योदयानंतर दिली जाते. कोणता महिना आणि कोणता ऋतू आहे त्यावर फाशीची वेळ ठरते.
अधीक्षक आणि उप-अधीक्षक फाशीच्या काही मिनिटं आधी कैद्याच्या कोठडीत जातात, अधीक्षक आधी कैद्याची ओळख पटवतात आणि हे निश्चित करतात की डेथ वॉरंटवर ज्याचं नाव आहे हा तोच कैदी आहे की नाही. मग ते कैद्याला त्याच्या मातृभाषेत वॉरंट वाचून दाखवतात.
यानंतर अधिक्षकांच्या उपस्थितीत कैद्याचं बोलणं रेकॉर्ड केलं जातं. मग अधीक्षक फाशीच्या ठिकाणी जातात. उप-अधीक्षक मात्र कोठडीतच थांबतात. त्यांच्या उपस्थितीत कैद्याला काळे कपडे घातले जातात. त्याचे हात मागे बांधले जातात.
जर त्यांच्या पायात बेड्या असतील तर त्या काढल्या जातात. आणि मग कैद्याला फाशीच्या स्तंभापर्यंत नेलं जातं. तेव्हा तुरुंगाचे उपाधीक्षक, मुख्य वार्डन आणि 6 वॉर्डन कैद्यासोबत असतात.
दोन वॉर्डन पुढे चालत असतात, दोन मागे आणि दोन्ही बाजूने कैद्याचे दंड पकडून दोन वॉर्डन चालत असतात. फाशीच्या ठिकाणी तुरुंगाचे अधीक्षक, मॅजिस्ट्रेट आणि मेडिकल ऑफिसर उपस्थित असतात.
अधीक्षक मॅजिस्ट्रेटला सांगतात की त्यांनी कैद्याची ओळख पटवली आहे आणि त्याला वॉरंट त्याच्या मातृभाषेत वाचून दाखवलं आहे. कैद्याला मग फाशी देणाऱ्या जल्लादाच्या हाती सोपवलं जातं. आता कैद्याला फाशीच्या स्तंभावर चढावं लागतं. त्याला फाशीच्या दोराखाली उभं केलं जातं. तोपर्यंत वॉर्डननी त्याचे हात पकडून ठेवलेले असतात.
यानंतर त्यांचे पाय घट्ट बांधले जातात. आणि त्याच्या चेहरा कापडाने झाकला जातो. आणि मग कैद्याच्या मानेभोवती फाशीचा दोर आवळला जातो. कैद्याला धरून ठेवणारे वॉर्डन मागे होतात. मग तुरुंगाधिक्षकांनी इशारा केल्याबरोबर फाशी देणार जल्लाद खटका ओढतो.
यामुळे कैदी ज्या लाकडी फळकुटांवर उभा असतो ते खाली पडतात आणि कैद्याचे पाय लटकू लागतात. कैद्याच्या मानेला फास बसतो आणि हळूहळू त्याचा मृत्यू होतो.
मृतदेह अर्धा तास लटकवत ठेवला जातो. अर्धा तासाने डॉक्टर त्याला मृत घोषित करतात. आणि मग मृतदेह खाली उतरवला जातो आणि पोस्ट मॉर्टमला पाठवलं जातं.
पोस्टमॉर्टम नंतर कैद्याचा मृतदेह त्याचा कुटुंबियांना सोपवला जातो. जर सुरक्षितेचं काही कारण असेल तर तुरुंग अधिक्षकांच्या देखरेखीखाली मृतदेहाला जाळलं अथवा पुरलं जातं. फाशी पब्लिक हॉलिडे, म्हणजे सरकारी सुट्टीच्या दिवशी होत नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)