You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
यशोमती ठाकूरः गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्याने नकारात्मकता दूर होते #5मोठ्याबातम्या
आजचे पेपर आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्याने नकारात्मकता दूर होते
गायीचे दर्शन घेऊन तिच्या पाठीवरुन हात फिरवल्यास आपल्या शरीरातील नकारात्मकता दूर होते. हा चमत्कार आहे, असे वक्तव्य महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. तिवसा तालुक्यातील एका गायीच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या, व्यक्तिमत्त्व विकासाचे अनेक अभ्यासक घेतले जातात. त्यात मोठमोठे लोक प्रशिक्षण घेतात. पण यामुळे आपण संस्कृती विसरतो. आपल्यातील नकारात्मक विचार गायीच्या दर्शनामुळे, गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्यामुळे जातात हे आपण विसरुन जातो. हे सर्व आपल्या संस्कृतीत सांगितले आहे.
गाय म्हणजे माता आहे. हा राजकारणाचा विषय नाही. चहावाल्या सरकारने गायीच्या मुद्द्यावरुन राजकारण केले. आता मात्र सर्वांनी मिळून काम करायचे आहे, असेही त्या म्हणाल्या. लोकसत्ताने हे वृत्त दिले आहे.
2. जम्मू आणि काश्मीरमध्ये हिजबुलचा कमांडर ठार
जम्मू-काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या तीन कट्टरवाद्यांमध्ये हिजबुल मुजाहिदिनच्या कमांडरचा समावेश आहे. विशेष पथकाच्या दहशतवादविरोधी पथकाने पुलवामा जिल्ह्याच्या त्राल भागामध्ये ही कामगिरी केली आहे.
ओमर फय्याज ऊर्फ हमाद खान, आदिल बशीर ऊर्फ अबू दुजाना, फैजान हामिद अशी त्यांची नावं आहेत. हिजबुलचा कमांडर ओमर सीर त्राल या गावातला होता तर आदिल आणि फैजान हे त्रालमधली मोन्घामा आणि मांडुरा या गावातील आहे. टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
3. 'JNUचे कुलगुरु जगदीशकुमार हेच हल्ल्यामागील मास्टरमाइंड'
JNUचे कुलगुरू जगदीशकुमार हेच त्या विद्यापीठातील हिंसक हल्ल्यामागील मास्टरमाइंड असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसच्या सत्यशोधन समितीने केली आहे.
JNU हल्ल्यामागील सत्य शोधून काढण्यासाठी काँग्रेसने चार जणांची समिती नेमली होती. या समितीच्या सदस्या सुष्मिता देव यांनी पत्रकार परिषदेत कुलगुरू एम. जगदीशकुमार, विद्यापीठाची सुरक्षाव्यवस्था सांभाळणारी कंपनी तसेच प्राध्यापकांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी. कुलगुरुंना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे असे त्यांनी सांगितले. या समितीमध्ये सुष्मिता देव, हिबी एडन, सय्यद नासीर हुसेन, अमृता धवन यांचा या समितीत समावेश होता. लोकमतने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
4. 'कमिशन मिळत नाही म्हणून ममतांचा केंद्रीय योजनांना विरोध'
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा देशभरातील आठ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला, मात्र पश्चिम बंगाल सरकारने ही योजना राज्यात लागू केली नाही.
कारण या योजनेत पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. त्यामुळे यात कोणाला कमिशन मिळत नाही म्हणूनच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा केंद्रीय योजनांना विरोध आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
कोलकाता पोर्ट ट्रस्टला 150 वर्षं पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहिल. कोलकाता पोर्ट ट्रस्टचे नाव बदलून श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्ट ट्रस्ट करण्याची घोषणा त्यांनी यावेळेस केली. सामनाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
5. 200 फायटर जेट्स हवाई दलात येणार
भारताच्या हवाई दलात लढाऊ विमानांची कमतरता भासू नये, यासाठी केंद्र सरकार लवकरच 200 फायटर जेट्स विमाने खरेदी करणार असल्याची संरक्षण सचिव अजय कुमार यांनी आज कोलकाता येथे दिली.
हवाई दलात गेल्या काही दिवसांपासून फायटर जेटची संख्या कमी झालेली आहे. ही कमतरता भरुन काढण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले असल्याचे ते म्हणाले. तसेच हिंदुस्तान एरोनॉटिकल्स लिमिटेडकडून तयार करण्यात येत असलेल्या 83 लढाऊ विमानांचे कंत्राट शेवटच्या टप्प्यात असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)