You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो: 'व्यक्तिपूजा हा अंतिमतः हुकूमशाहीकडे नेणारा मार्ग आहे'
"टीकाकारांना मी भीत नाही. माझी भीती मला सोडून गेलेली आहे. मी आंदोलन केली आहेत. तुम्हाला कुणाची भीती वाटते?" असा सवाल संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केला. उस्मानाबाद येथे होत असलेल्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून त्यांनी ही भूमिका मांडली.
"मी साहित्याच्या मंदिरातला सेवक. सारे भारतीय माझे बांधव आहेत हे मी मानतो. मी येशूचा उपासक आहे. त्याची सावली जरी माझ्या अंगावर पडली तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन. मी संताच्या सहवासात महाराष्ट्रात वाढलेलो आहे. जो मराठी आहे त्याला संतांची गोडी लागलीच पाहिजे. त्या संतांनी माझा अध्यात्मिक पिंड पोसला आहे. मी संतांना विसरू शकत नाही. विशेषता माझ्या लाडक्या तुकोबांना," असं दिब्रिटो म्हणाले.
"जेव्हा आपण गोरगरिबांचा विचार सोडून देतो तेव्हा आपण कमी मानवीय होतो. सर्वधर्मसमभावाची आज देशाला आवश्यकता आहे. सत्ता ही धोकादायक असते," असं ते म्हणाले.
काही लोक स्वतंत्र भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर केला म्हणून तुरुंगात खितपत पडली आहेत हे दुर्भाग्य आहे. सरस्वतीच्या पूजकांना स्कॉलरशिप देत असतात त्यांच्या डोक्यावर काठ्या घालत नसतं. विद्यार्थ्यांना एकटं गाठून मारहाण करण्यात आली. हे आम्ही सहन करणार नाही. तरुणांना काही काळ फसवता येईल त्यांना मेस्मराइज करता येईल. पण हे नेहमीच करता येणार नाही.
द्वेष पसरवून राजकारण करणाऱ्यांना काय मिळवायचं आहे. अशा राजकारणाला काही अर्थ नाही, असं दिब्रिटो म्हणाले.
त्यांच्या भाषणातील महत्त्वपूर्ण मुद्दे
'या खऱ्या समस्या'
आजच्या घडीला आपल्या देशाचे खरे शत्रू दुसरा धर्म, दुसरी जात, दुसरा देश नाही तर बेरोजगारी, बेकारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अतिवृष्टी, अनावृष्टी आणि दुष्काळ, ग्रामीण-शहरी यांच्यातील वाढलेली दरी, धर्मांधता व त्यामुळे होणारे उत्पात हे आहेत.
आर्थिक क्षेत्रातील घसरण, बंद होत चाललेले उद्योगधंदे, लघु उद्योगांवर आलेली संक्रांत, त्यामुळे निर्माण झालेले बेकारांचे तांडे व त्यांचे उद्ध्वस्त होत चाललेले संसार ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे समाजाच्या सहनशीलतेची हद्द होत आहे. आपले राज्यकर्ते त्याची वाट पाहत आहेत काय?
'साहित्यिकांनी पर्यावरणाचा सैनिक व्हावं'
जर माणसं जगली नाही टिकली नाही तर तुमचं साहित्य कोण वाचणार. जगण्याचं व्यवहारीकरण झालं आहे. अर्थकारण झालं आहे. त्याची चार कारणं आहेत.
पहिलं कारण म्हणजे ईश्वराशी असलेला संवाद. हे परम सत्य आहे. सर्व बाजूंनी ऱ्हास होताना दिसत आहे. कुणाचाच धाक नसावा अशी स्थिती झाली आहे. God is ground of being असं रॉबिनसन या विचारवंताने म्हटलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी.
दुसरी गोष्ट म्हणजे आपला निसर्गाशी संवाद तुटला आहे. रात्रीतून 2000 झाडे तोडली गेलीत. तिसरी म्हणजे सत्याशी असलेला संवाद. आपण आत्मकेंद्री बनलेलो आहोत. चौथी गोष्ट म्हणजे आपला एकमेकांशी तुटलेला संवाद. या तुटलेल्या संवादामुळे आपण माणूसपणापासून दूर होऊ शकतो असं दिब्रिटोंनी म्हटलं.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण कटिबद्ध राहू. एक 16 वर्षांची मुलगी ग्रेटा थुनबर्ग उभी राहते आणि ती नेत्यांना सुनावते आहे. निसर्ग उद्ध्वस्त करून हा विकास आपल्याला साधायचा नाही हे या मुलीनी आपल्याला सांगितलं आहे. नैतिकतेच्या आणि अध्यात्मिकतेच्या वनराया आपल्याला उभाराव्या लागतील. त्यासाठीच आपल्याला पर्यावरणाचा सैनिक व्हायचं आहे, असं दिब्रिटो म्हणाले.
'व्यक्तीपूजा ही हुकूमशाहीकडे नेते'
लोकशाहीच्या बुरख्याखाली एकाधिकारशाही नांदू शकते आणि आणीबाणी न लादताही लोकशाहीचा गळा घोटता येतो, हा देखील लोकशाहीला फार मोठा धोका आहे. असं जेव्हा घडतं तेव्हा तेव्हा सर्व स्वातंत्र्यप्रिय नागरिकांनी विशेषतः साहित्यिकांनी व विचारवंतांनी सजग राहून स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे असं मला वाटतं.
लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्यांच्या मते लोकांनी आपलं स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की, जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करेल.
विभूतिपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसते. राजकारणात भक्ती किंवा व्यक्तीपूजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकूमशाहीकडे नेणारा मार्ग आहे, असं दिब्रिटो म्हणाले.
'लोकशाहीवर हल्ला करणाऱ्यांपासून सावध राहा'
प्रसार साधनांचा लोकांच्या मनांवर व मतांवर खूप प्रभाव पडत असतो. प्रसिद्ध झालेली प्रत्येक बातमी ही काही लोकांना धर्म वचनाप्रमाणे वाटते परंतु आज 'पेड न्यूज' आणि 'फेक न्यूज' असे प्रकार सुरू झाले आहेत कधीकधी राजकीय पक्षांचीची भूमिका बातम्यांच्या स्वरूपात अगदी पहिल्या पानावर झळकत असते. हादेखील लोकशाहीवर हल्ला आहे तोसुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे.
'जगातील सर्वांत मोठी लोकशाही' अशा शब्दां आपण आपलीच पाठ थोपटून घेत आहोत. हे सगळं खरं आहे परंतु दुर्दैवाने अधूनमधून आपल्याकडे विचारांची गंगा उलट्या दिशेने वाहू लागते. आपला प्रवास सहिष्णुतेतून असहिष्णूतेकडे, विशालतेकडून संकुचितपणाकडे आणि अहिंसेकडून हिंसेकडे होऊ लागतो. अहिंसेकडून हिंसेकडे चाललेल्या प्रवासाची उदाहरणं म्हणजे नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एस.कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या झालेल्या भेकड हत्या.
'तर सावरकरांच्या विचारांचा पराभव होईल'
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी गायीविषयी केलेली चिकित्सा अतिशय पुरोगामी आहे. गाय जगली पाहिजे, तसा माणूसही जगला पाहिजे. म्हणून गाईच्या नावे केलेल्या हत्या हा सावरकरांच्या विचारांचा पराभव आहे.
कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित होतं?
आज उद्घाटनाच्या कार्यक्रमात माजी संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितिन तावडे उपस्थित आहेत. राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.
संमेलनाबाबतची दिब्रिटोंची भूमिका?
माझी भूमिका धर्मप्रचाराची वाटत असेल तर माझा नाईलाज आहे, अशा शब्दांमध्ये दिब्रिटो यांनी बीबीसी मराठीशी बोलताना भूमिका व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, "मी धर्मप्रसार करतो म्हणजे काय करतो? जे प्रभूने सांगितलंय ते सांगतो, की शत्रूवर प्रेम करा, सगळ्यांना सामावून घ्या. गोरगरिबांना कवेत घ्या. याच्यात कोणाला धर्मप्रचार वाटत असेल तर माझा नाईलाज आहे."
"मी धर्मगुरू असल्याचं कधीही नाकारलेलं नाही. ते स्वीकारलेलं आहे. त्या पदाच्या अडचणीही मी स्वीकारलेल्या आहेत. पण धर्मगुरूने चर्चच्या कंपाऊंडमध्ये राहता कामा नये, अशी माझी भूमिका आहे. लोकांच्या सुखदुःखाच्या प्रश्नांशी आमचं नातं आहे."
"इतर धर्मांमध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत. डबक्यामध्ये राहू नका. बाहेर पडा. तुमचं व्यक्तिमत्त्व विकसित होईल," असंही ते म्हणाले होते.
कोण आहेत फादर फ्रान्सिस दिब्रिटो?
फादर दिब्रिटो यांना जन्म पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात नंदाखाल गावात 4 डिसेंबर 1942 ला झाला. त्यांचं शिक्षण नंदाखालमध्येच सेंट जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये झालं. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी. ए. तर धर्मशास्त्रात एम. ए. पूर्ण केलं.
1972 मध्ये त्यांनी कॅथलिक धर्मगुरू म्हणून दीक्षा घेतली. 1983 ते 2007 या कालावधीत ते मराठी कॅथलिक समाजाशी संबंधित असलेल्या 'सुवार्ता' या मासिकाचे संपादक होते. या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनासाठी महत्त्वाचं कार्य केलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)