विजय तेंडुलकर नावाच्या अथांग सागरात डुंबण्याची प्रक्रिया...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रोहन नामजोशी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
विजय तेंडुलकरांच्या 'हे सर्व कोठून येते?' या पुस्तकात लेखक श्री. दा. पानवलकर यांचं व्यक्तिचित्रिण केलं आहे.
तुम्हाला ओम पुरींचा 'अर्धसत्य' हा चित्रपट आठवतो ना? पानवलकरांच्याच 'सूर्य' नावाच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात पानवलकर खंगत गेले. त्यात नियतीचा काही भाग असेल किंवा त्यांच्या जडणघडणीचा.
तेंडुलकरांनी त्या अवस्थेचं वर्णन असं केलं आहे की पानवलकर तर आपल्या डोळ्यासमोर उभे राहतातच पण पानवलकरांची ती अवस्था आपल्यातच भिनतेय असं वाटू लागतं.
तो लेख वाचून संपला की एक प्रकारचा मानसिक थकवा येतो. पुढचा काही वेळ काही सुचत नाही. डोळ्यांसमोर कितीतरी वेळ पानवलकर आणि ते लिहिणारे तेंडुलकर गरगर फिरत राहतात.
विजय तेंडुलकर नावाच्या अथांग सागरातील ही एक छोटीशी लाट नुकतीच अंगावर घेतली असते आणि त्या समुद्रात झोकून देऊन त्यांच्या शाब्दिक लाटांबरोबर हिंदोळे घेण्याची अनिवार इच्छा अजून प्रबळ होत जाते.
विजय तेंडुलकरांच्या साहित्याची ओळख कॉलेजमध्ये असताना झाली. त्यांच्याविषयी वाचलं जरी असलं तरी त्यांनी लिहिलेलं फारसं वाचलं नव्हतं. घरी लायब्ररीतून त्यांची पुस्तकं यायची तेव्हा ती थोडीफार वाचून ते फार भडक लिहितात असं वाटलं. गेल्या एक दोन वर्षांपासून त्यांचं साहित्य पुन्हा वाचायला घेतलं आणि त्यांची जादू आजतागायत कमी व्हायला तयार नाही.
सशक्तपणा हा तेंडुलकरांच्या लेखनाचा आत्मा आहे असं मला वाटतं. आजुबाजूच्या व्यक्तीचं, परिस्थितींचं अचूक निरीक्षण, माणसांची पारख, त्यांच्याबरोबर असलेले गहिरे संबंध, त्यातून उमगलेलं आयुष्याचं तत्त्वज्ञान, हे कितीतरी कंगोरे तेंडुलकरांच्या लेखनात जाणवतात. त्यातून आसपासच्या व्यक्तींकडे पाहण्याची वेगळी दृष्टी तेंडुलकर नकळतपणे आपल्याला देतात.
मला तेंडुलकर पत्रकारापेक्षा कथालेखक म्हणून जास्त भावतात. त्यांच्या कथा एका बैठकीत बसून संपवतो असं होत नाही. त्या एक एक करून वाचाव्यात. त्यांच्यावर नीट चिंतन करावं आणि मगच पुढे जावं. नाहीतर मजा नाही.
'तेंडुलकरांच्या निवडक कथा' हे पुस्तक म्हणजे भन्नाट कथांची खाण आहे. एखाद्याने अगदी मन लावून दागिना घडवावा अशा पद्धतीने त्यांनी या कथा रचल्या आहेत. कोणतीही कथा उचलून वाचा, काहीतरी नवीन सापडण्याची हमी मिळतेच.
तेंडुलकरांच्या स्त्री पुरुष नातेसंबंधांवरच्या कलाकृती तर पहायला आणि वाचायलाच हव्यात. सखाराम बाईंडर नाटक हा त्याचा पारिपाक आहे. 'यथेच्छ दारू प्यावी, स्त्रियांचा हवा तसा, हवा तेव्हा उपभोग घ्यावा,' अशा टिपिकल पुरुषी फँटसी त्यांनी या नाटकात मांडल्या आहेत.
नंतर सखारामच्या आयुष्यातील दोन बायका त्याला वेगवेगळ्या पद्धतीने छेद देतात आणि त्याच्या पुरुषी मनोवृत्तीच्या चिंधड्या उडवतात. सखाराम बाईंडर नाटकामुळे गदारोळ उडाला ते उगीच नाही. पण त्या नाटकात त्यांनी जो विचार मांडला आहे तो फारच वेगळ्या पद्धतीचा आहे.

फोटो स्रोत, Tanuja Mohite
'आमच्यावर कोण प्रेम करणार?' कथेत लग्नासाठी नकार दिलेली सावळ्या रंगाची स्त्री त्या पुरुषाकडे जाऊन त्याला जाब विचारते आणि त्याला सळो का पळो करून सोडते.
समलैंगिकता हा जेव्हा गुन्हा होता, त्याविषयी बोलणं टाळलं जायचं तेव्हा तेंडुलकरांनी 'मित्रा' ही कथा लिहिली होती. त्यात त्यांनी समलैंगिक मैत्रिणींचा जो भावनिक गोंधळ मांडला आहे ते फक्त तेंडुलकरच करू जाणे. आज आपण ज्या स्त्री पुरुष समानतेबद्दल बोलतो त्याचे विविध आविष्कार त्यांच्या कथेतून आपल्यासमोर येतात.
'समस्या' या कथेत त्यांची एक मैत्रीण टेनिसपटू असते. तिचं वर्णन करताना ते लिहितात, "अतिसावध माणसं, जवळ कितीही गुण असले तरी फारशी यशस्वी होत नाहीत. माणसापाशी धाडस हवं, थोडा अविचार हवा, थोडा आवेग हवा, बेहोषी हवी, स्वत:ला भिरकावता आलं पाहिजे तिच्यापाशी नेमकं तेच नव्हतं." मानसशास्त्र सर्वसाधारणपणे आपल्याला शांत संयत रहायला सांगतं. पण ही वादळंच तर आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे असं ही कथा वाचताना वाटत राहतं.
'अखेरचे दिवस' या कथेतला बोकील दारिद्र्याचं ढोंग करता करता कसा तुटून जातो हे वाचताना पोटात ढवळून येतं. बाबरी मशीद पडल्यानंतरच्या काळातच योगायोगाने त्यांनी 'रामप्रहर' नावाचा एक स्तंभ लिहिला होता. त्याचं झालेलं पुस्तकही अफलातून आहे.
'कादंबरी एक' नावाच्या कादंबरीत वयाने मोठ्या असलेल्या एका पुरुषाची भावनिक आणि लैंगिक आंदोलनं तेंडुलकरांनी रेखाटली आहेत. वाचताना ते अगदी साधं आणि सरळ लिखाण आहे असं वाटतं पण त्यावर चिंतन केलं की त्यातले पदर आपल्याला कळू लागतात.
एकूणच काय तर तेंडुलकर वाचकाला स्वस्थ बसू देत नाही. एकदा ते तुम्हाला भेटले की तुम्हाला खिळवून ठेवतात. त्यांच्या तावडीतून लवकर सुटका होणं केवळ अशक्यच. त्यांच्या पुस्तकांशिवाय विविध लेखांमधून, काही पुस्तकांत असलेल्या उल्लेखातून तेंडुलकर असे भेटत राहतात.
तेंडुलकरांचं पटकथा आणि नाट्यलेखन हा एक संशोधनाचाच विषय आहे. 'उंबरठा', 'सामना' 'सिंहासन', 'अर्धसत्य' या चित्रपटात त्यांनी लिहिलेले संवाद आजही वेगवेगळ्या प्रसंगी आठवतात आणि तेंडुलकर कालातीत आहे हे लक्षात येतं. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी 'नितळ' चित्रपटात काम केलं. त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी मोठ्या लांबीचे संवाद होते. तेही आव्हान त्यांनी यशस्वीरीत्या पेललं.
एका कोड असलेल्या मुलीशी लग्न करावं की नाही असा प्रश्न या चित्रपटातल्या नायकाला पडतो. त्यावरून घरात गदारोळ माजलेला असतो. आजोबा म्हणजेच तेंडुलकर हे सगळं पाहत असतात. मुलीची गोंधळलेली अवस्था पाहून ते तिला म्हणजे डॉ. नीरजाला सांगतात, "सत्यदर्शनाने निर्माण झालेली इच्छाशक्ती ही नियतीपेक्षा कधीही श्रेष्ठ असते."

फोटो स्रोत, Tanuja Mohite
आज तेंडुलकर जिवंत असते तर आणि त्यांनी मला हे वाक्य ऐकवलं असतं तर मी त्यांच्यापुढे लोटांगणच घातलं असतं. इतकं मला ते वाक्य आवडतं आणि ज्यांच्या मुखातून ते निघालं ते तेंडुलकरही.
19 मे 2008 ला विजय तेंडुलकरांचं निधन झालं. Mysthania Gravis नावाच्या रोगाने त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्याच शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती या रोगामुळे क्षीण होत जाते आणि त्यामुळे एक एक अवयव निकामी होतो.
कायम सामाजिक रुढींचा, प्रस्थापित समजुतींचा तेंडुलकरांनी सातत्याने प्रतिकार केला, विरोध केला. हा प्रतिकार त्यांच्या लेखनातून, त्यांच्या नाटकांतून, पटकथा, संवादातून पदोपदी जाणवतो. कदाचित हा प्रतिकार करता करता त्यांची स्वत:शी लढण्याची शक्ती कमी झाली की काय असा भाबडा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
समुद्राच्या काठावर उभं राहिलं की समुद्र प्रत्येक कोनातून वेगळा दिसतो, किंबहुना भासतो. आपली नजर फक्त कशी आणि कोणत्या बाजूला आहे यावर ते अवलंबून असतं. तेंडुलकर नावाचा समुद्र आताशा कुठे निरखायला सुरुवात केली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








