'मी न्यूड मॉडेल झाले, कारण मला पैशांची गरज होती'

फोटो स्रोत, BBC/Prashant Nanaware
- Author, धनलक्ष्मी मणी मुदलियार
- Role, बीबीसी मराठीसाठी
धनलक्ष्मी मणीमुदलियार... या त्याच आहेत ज्यांच्या आयुष्यावर रवी जाधव दिग्दर्शित 'न्यूड' चित्रपटबेतलेला आहे.या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच या व्यवसायाविषयी आणि कलेविषयी मोकळेपणानं चर्चा सुरू आहे झाली. बीबीसी मराठीसाठी प्रशांत ननावरे यांनी धनलक्ष्मी मणीमुदलियार यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी धनलक्ष्मी यांनी त्याच्या आयुष्य आणि कलेविषयी मनमोकळेपणानं माहिती दिली. धनलक्ष्मी यांचे बोल प्रशांत यांच्या शब्दांकनात.

पाच वर्षांची होते तेव्हा चेन्नईहून मुंबईत आले. आम्ही दोन भाऊ आणि एकूण चार बहिणी होतो. महालक्ष्मीला झोपडीत रहायचो.
आई-वडील दोघेही अशिक्षित. त्यामुळे कचरा उचलण्यापासून मिळेल ते काम करायचे. म्हणून आई-वडीलही अनेकदा कामाचा कंटाळाच करायचे. आम्हालाही भीक मागायला पाठवायचे.
महालक्ष्मीनंतर आम्ही धारावी झोपडपट्टीत राहायला गेलो. तेव्हा रोजच्या जेवणाची भ्रांत होती. त्यामुळे शिक्षणाचा पत्ताच नव्हता. तरीही काही काळ आम्ही भावंडं माटुंग्याच्या लेबर कँपमधल्या महानगरपालिकेच्या शाळेत जायचो.
शिक्षणानं काही होणार नाही म्हणून तिनं मला शाळेतून काढून घरकामाला पाठवलं. त्यामुळे मी अशिक्षितच राहिले.
धारावीवरून भात, कालवण आणि तळलेले मासे बनवून टोपातून नेऊन आम्ही ते ग्रांट रोडला निशा थिएटरच्या बाहेर विकायचो. त्यामुळे लहानपणापासूनच चित्रपटांचं आकर्षण होतं.
'शोले' मी थिएटरमध्ये पाहिलेला पहिला चित्रपट. आई-वडिलांनाही तो खूप आवडला होता. थिएटरमध्ये जाऊन आम्ही तो चित्रपट चार वेळा पाहिला आहे. त्याकाळी रंगीत टीव्ही नव्हते. शनिवार, रविवारी दूरदर्शनवर चित्रपट दाखवले जायचे. तेव्हा झोपडपट्टीत चित्रपट पाहायचे आठ आणे लागायचे.
कालांतरानं वडिलांनी धारावीची झोपडीसुध्दा विकली आणि आम्ही पुन्हा माटुंग्याच्या सरस्वती शाळेसमोरच्या फुटपाथवर झोपडी बांधून राहू लागलो.
वयाच्या बाराव्या वर्षी मी माहीम चर्चसमोर एका मुस्लीम कुटुंबाकडे घरकामाला जायचे. माझे वडील नशा करायचे आणि आईला खूप मारायचे. मग आई तिथं येऊन रडत बसायची. शेवटी मला तिथल्या मालकीण बाईंनी कामावरून काढून टाकलं. ते काम सुटल्यावर मी ससून डॉकला कोळंबी सोलण्याचंही काम केलं आहे.
एव्हाना मोठ्या भावा-बहिणीची लग्नं झाली होती. आईला माझ्या लग्नाची चिंता सतावत असायची.
त्याच वेळी आईच्या ओळखीचा मणी नावाचा एक इसम आमच्या घरी यायचा. माझ्यापेक्षा वयाने तो दहा-बारा वर्षांनी मोठा होता. घरच्यांनी त्याला माझ्याशी लग्न करायची गळ घातली.
मी तेव्हा चौदा वर्षांची होते. पण मुलींची लग्न लहान वयात करू नये, इतकी समज माझ्या आई-वडिलांमध्ये नव्हती. अखेर त्या मणीशी माझं लग्न लावून देण्यात आलं.
माझा मोठा भाऊ चरस-गांजा पिऊन मेला आणि दुसरा भाऊ रेल्वे अपघातात गेला. मोठी बहीणसुध्दा तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर पळून गेली.
त्यानंतर भावाच्या आणि बहिणीच्या लहान मुलांचा मीच सांभाळ केला. दुसऱ्यांच्या मुलांचा मी सांभाळ करणं, हे माझ्या नवऱ्याला आवडायचं नाही. त्यामुळे माझ्यावर तो अत्याचार करायचा. मी कमावलेले पैसे दारूत उडवायचा.
तिकडे माझे वडीलही आईला मारहाण करायचे. शेवटी तिनं एक दिवस रागाच्या भरात माहीमला रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केली.
'लोकांना माझं शरीर हवं होतं'
माझा मोठा मुलगा श्री सहा वर्षांचा होता तेव्हा मी दुसऱ्यांदा गरोदर होते. त्याचवेळेस माझ्या नवऱ्याचं निधन झालं. खूप कमी वयात मी विधवा झाले. त्यामुळे मुलांच्या पालनपोषणाची सर्व जबाबदारी माझ्यावर आली.
तरुणपणी मी खूप सुंदर होते. तेव्हा मी कामासाठी भरपूर भटकायचे. पण अनेक जण वाईट नजरेनंच माझ्याकडे पाहायचे.

फोटो स्रोत, BBC/Prashant Nanaware
माझं व्यवहारज्ञान कमी असल्यानं त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला कळायचा नाही. त्यांना मला काम द्यायचं होतं, पण कामाच्या बदल्यात माझं शरीर हवं होतं. मला ते अजिबात आवडायचं नाही आणि मी कधीही त्या नादाला लागले नाही.
'तुझा बांधा चांगला आहे'
माहीमलाच राहणारी राजम्मा जे. जे. महाविद्यालयात कामाला होती. मी तिच्याकडेही सतत काम मागायचे पण ती टाळाटाळ करायची. आपण जे. जे. मध्ये झाडू मारायचं काम करतो, असं ती मला सांगायची.
एक दिवस मी तिचा पाठलाग करत महाविद्यालयात पोहोचले. त्यावेळेस मी चोवीस-पंचवीस वर्षांची असेन. संपूर्ण महाविद्यालय पालथं घातलं पण राजम्मा सापडली नाही. पण तिला शोधल्याशिवाय इथून जायचं नाही, असं मी ठरवलं. काम तर मला हवंच होतं.
पाणी प्यायला म्हणून मी एका बंद वर्गाच्या शेजारी गेले आणि आत डोकावून पाहू लागले. मला राजम्माचे उघडे पाय दिसले. पण तेवढ्यात एका विद्यार्थ्यांनं मला हटकलं. मी त्याला राजम्मा आहे का, असं विचारलं. विद्यार्थ्यानं माझं नाव विचारून मला आत घेतलं. तेव्हा मी जे काही पाहिलं त्यावर माझा विश्वासच बसला नाही!
राजम्मा कपडे काढून नग्नावस्थेत उभी होती!
'इथे का आलीस' म्हणून राजम्मा माझ्यावर ओरडली. मला मराठी येत नाही, त्यामुळे आम्ही तामीळमध्ये संवाद साधत होतो.

फोटो स्रोत, BBC/ Prashant Nanaware
मी तिला म्हटलं, "काय करू राजम्मा? माझी मुलं लहान आहेत. मला कामाची अतिशय गरज आहे. तुझ्या विश्वासावर मी बसले आहे. पण हे कसलं काम तू करतेयस?"
राजम्मा म्हणाली, "हेच काम आहे. तू आता आतमध्ये आली आहेस आणि सर्व पाहिलं आहेसच तर उपाशीपोटी मरण्यापेक्षा तू सुध्दा हे काम कर. बाहेर जाऊन गोंधळ घालू नकोस."
पण मी कामाला नकार दिला. हे कोणत्या पध्दतीचं काम आहे याचा मी विचार करत होते.
त्याचवेळी एस. एम. पवार आणि एम. पी. पवार सर आत आले. त्यांनी राजम्माला मी काम करू शकेन का, असं विचारलं. राजम्मासुध्दा त्यांना हो म्हणाली. तुझी नोकरी फिक्स झाली आहे, मला राजम्मानं सांगितलं.
पण मी विचार करून सांगते म्हणाले. राजम्मानं मला दरडावलं - "विचार नंतर कर, आधी कामाला सुरुवात कर. दिवसाचे साठ रुपये मिळतील. साधं म्हणजे कपडे घालून बसलो तर पन्नास रूपये मिळतात. न्यूडचं काम कधीतरीच मिळतं. पण तुझा बांधा चांगला आहे. तुला सर्व वर्गांत काम मिळेल."
त्याच दिवशी मी कामाला सुरुवात केली. नवीन मॉडेल आली म्हणून मुलांची धावपळ सुरू झाली. एकानं मला बसण्यासाठी टेबल आणून ठेवलं. प्रत्येकजण चांगला अँगल मिळावा यासाठी चांगली जागा पकडू लागला.
सर वर्गात आले आणि त्यांनी मला नाव विचारलं. माझं नाव धनलक्ष्मी असल्याचं मी सांगितलं. तर ते खूश होऊन म्हणाले, "व्वा! तुझ्या नावात धन आणि लक्ष्मी दोन्ही आहेत."
मला मनात विचार आला, आपल्याकडे दोन्हीपैकी काहीच नाही. पण आईवडिलांनी नाव चांगलं ठेवलं हेच खूप झालं.
न्यूड होण्याचा पहिला अनुभव
मला अजूनही लाज वाटत होती. "इथे पार्टिशन नाहीये का?" मी विचारलं.
"पार्टिशन कशाला हवंय? त्यामागे कपडे काढून तू लांबून चालत येणार का?" राजम्मानं विचारलं. "फार विचार करू नकोस. इथेच कपडे काढ आणि तिथे बाजूला खुर्चीवर ठेव."
दीपक नावाच्या मुलाला सांगून तिनं टेबल मागवून घेतलं. तेव्हा मला खूप रडू आलं.
माझा मुलगा दोन वर्षांचा होता. अजूनही तो अंगावर दूध पित होता. त्यामुळे माझी छाती भरलेली होती. पण विद्यार्थांनी मला समजावलं. तुम्ही काहीही काळजी करू नका. तुम्ही जितका वेळ बसू शकाल तितका वेळ बसा. तुम्हाला विश्रांती हवी असल्यास तसंही सांगा.
कसंबसं करून मी अंगावरचे कपडे काढून अवघडूनच बसले. मुलं चित्र काढत असताना मला पान्हा फुटत होता. मी इकडेतिकडे पाहत होते. हळूच हाताने दूध पुसत होते. विद्यार्थ्यांना माझी चलबिचल लक्षात आली. उद्या परत येण्याच्या बोलीवर त्या दिवशी मला अर्ध्या दिवसानेच घरी जायची परवानगी मिळाली.
60 रुपये ते 1000 पर्यंतचा प्रवास
राजम्माला तेव्हा कॉलेजमध्ये खूप मान होता. मुलं येऊन तिच्या पाया पडायची हे पाहून मला आश्चर्य वाटायचं. मी नवीन होते आणि वयानंही लहान होते, त्यामुळे माझ्या पाया कोणी पडत नसत.
काही काळानं मी विद्यार्थ्यांसोबत चांगलीच रुळले. त्यांच्याशी गप्पा मारायचे. काम करता करता खूप शिकले. ही मुलं काय काम करतात आणि का करतात याची माहिती होत गेली. त्यामागची विचारसरणी लक्षात आली. गेली वीस-पंचवीस वर्षं मी हे काम करत आहे. पण जे.जे.च्या नावाला कधीच बट्टा लागू दिला नाही.
आता न्यूड पेंटिगचे एक हजार मिळतात आणि साधं बसण्याचे चारशे रुपये. हळूहळू मीच मॉडेल आणायला सुरुवात केली. त्यांना कामासाठी तयार करण्याची जबाबदारी माझी असते. आता विद्यार्थी माझ्यादेखील पाया पडतात.

फोटो स्रोत, BBC/Prashant Nanaware
अनेक कलाकार माझा खूप सन्मान करतात. मी वांद्र्याला जगताप सरांकडेही खूप काम केलं आहे. पूर्वी मोबाईल नव्हते. तेव्हा PCOवरून फोन करून ठरलेल्या ठिकाणच्या स्टुडिओमध्ये जावं लागत असे.
वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम केलं. त्यांनीही मला खूप मदत केली. कधीच कुठल्याच कलाकारानं चुकीच्या नजरेनं पाहिलं नाही. काम पूर्ण झालं की मी गॅलरीत जाऊन आवर्जून कलाकारांची प्रदर्शनंही पाहते.
सर जे.जे. महाविद्यालयाच्या जॉन डग्लस सरांनींही खूप मदत केली. आमच्यासाठी मुलांच्या परीक्षेचा काळ खूप महत्त्वाचा असतो. घरी कुणी मेलं तरी आम्हाला यावंच लागतं. कारण मुलांच्या भविष्याचा तो प्रश्न असतो. त्यासाठी कसलीही तडजोड केली जात नाही.
रवी जाधव, कल्याणी मुळ्ये ही चांगली माणसं आहेत. त्यांनी येऊन माझ्याशी गप्पा मारल्या. 'न्यूड' चित्रपटात माझीच गोष्ट आहे. मला हा चित्रपट आवडला, पण त्याचा शेवट आवडला नाही.
एप्रिल महिन्यात जे.जे. महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमामध्ये कल्याणी स्टेजवर आली, तेव्हा जेवढ्या टाळ्या वाजल्या नाहीत त्याच्यापेक्षा अधिक टाळ्या लोकांनी माझ्यासाठी वाजवल्या. तो सर्वांत आनंदाचा क्षण होता.
चित्रपटाचं खूप कौतुक होतंय. लोकांना वाटतंय मला या चित्रपटासाठी खूप पैसे मिळालेत. पण फक्त एक साडी आणि वीस हजार रुपये एवढंच मानधन माझ्या पदरी पडलंय. जे पैसे मिळाले ते सर्व कर्ज फेडण्यात गेले.
मुलांना माझा अभिमान वाटतो
मी न्यूड मॉडेलचं काम करते हे माझ्या मुलांना कधी सांगितलं नाही. महाविद्यालयात झाडू मारणं, प्राध्यापकांना चहा बनवून देणं, मॉडेल म्हणून बसणं ही कामं करत असल्याचं मी त्यांना सांगत असे.
पण चित्रपट प्रदर्शित होण्याआधी माझ्यावर चित्रपट येतोय म्हणाले होते. चित्रपटात मी नसले तरी कथा माझीच आहे, असं मी त्यांना सांगितलं होतं. ते त्यांनी हसण्यावारी नेलं. नंतर चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यांना खरी हकिगत कळली. मुलांना सुरुवातीला वाईट वाटलं, पण मी त्यांना सर्व समजावून सांगितलं.

फोटो स्रोत, BBC/Prashant Nanaware
जे.जे.मध्ये मोठा कार्यक्रम झाला तेव्हासुध्दा मी माझ्या कुटुंबीयांना बोलावलं नाही. नंतर त्यांनी हे सर्व टीव्हीवर पाहिलं. तेव्हा त्यांना बरं वाटलं. आपल्या आईला बाहेर किती सन्मान आहे, हे पाहून त्यांना आनंद झाला. त्यांना माझा अभिमान वाटला.
माझ्या मोठ्या सुनेनंही हसतमुखानं हे वास्तव स्वीकारलेलं आहे, हे ऐकून बरं वाटलं.
चणचण कायम
इतकी वर्षं न्यूड मॉडेल म्हणून काम केल्यानंतरही हाती काहीच नाही. सध्या मी मुलांसोबत कुर्ल्याला राहते. पण डोक्यावर हक्काचं छप्पर नाही. पोटाची खळगी भरण्याच्या नादात मुलांना शिकवू शकले नाही, याची आता खंत वाटते. माझी दोन्ही मुलं परळला मोबाईच्या दुकानात काम करतात. मोठ्या मुलाचं लग्न झालंय. त्याला चार वर्षांचा मुलगा आहे. त्यामुळे पैशाची नड कायम भासत असते.
सुट्टीनिमित्त महाविद्यालयं बंद आहेत. त्यामुळे चर्नी रोडच्या एका लेडीज टॉयलेटमध्ये दिवसाचे २०० रुपये या पगारावर सुपवायझरचं काम करतेय.
अनेक कलाकार मोठे झाले. पण आमच्यासारख्यांकडे कुणीच लक्ष दिलं नाही याचं वाईट वाटतं. मी विधवा आहे. आम्हाला पेन्शन नाही. सरकार दरबारीही आमच्यासाठी काहीच योजना नाहीत. आमचं शरीर चांगलं आहे, तोपर्यंत काम सुरू राहील. त्याच्यापुढे काय - ही भीती कायम सतावत राहते.
(शब्दांकन - प्रशांत ननावरे)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









