रावसाहेब दानवे यांचा शिवसेनेला टोला, 'आता वाघाची शेळी झाली'

1. शिवसेनेला टोलाः आता शिवसेनेची शेळी झाली- दानवे

राज्यामध्ये शिवसेनेचे सरकार फार काळ टिकणार नाही. असे सांगत आता या वाघाची शेळी झाली आहे अशा शब्दांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. लातूर जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात राहिल. सरकार बदलण्याचा जिल्ह्याच्या सत्ताकारणावर परिणाम होणार नाही असे मत दानवे यांनी व्यक्त केले. लोकसत्तानं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

तसेच नागपूर येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निडणुकीसाठी झालेल्या प्रचारात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. राज्यात तयार झालेलं सरकार विश्वासघात आणि बेईमानीचं सरकार आहे.

शिवसेना स्वार्थासाठी कुठेही जाऊ शकते. कुठेही स्थायिक होऊ शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेनेने बेईमानी वृत्ती दाखवली आहे. बेईमानानी आणि विश्वासघातानं बनलेलं सरकार सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही असं फडणवीस यांनी सांगितलं. एबीपी माझानं हे वृत्त प्रसिद्ध केलं.

2. 'मातोश्री'मध्ये घुसण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकरी वडील आणि त्यांच्या लहान मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी लोकसत्ताने दिली.

देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पनवेलवरून वांद्रे येथील मातोश्री येथे आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दोघंही आज दुपारी 12 च्या सुमारास मातोश्रीवर जाण्याच्या प्रयत्नात होते. आपल्या शेताच्या लोन संदर्भात झालेला गैरप्रकार सांगण्यासाठी ते रविवारी 'मातोश्री'वर आले होते अशी प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेले शेतकरी आणि त्यांची मुलगी दोघंही पनवेल येथे वास्तव्यास असल्याचं समजतंय. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी त्यांनी 'मातोश्री'त प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवले आणि ताब्यात घेतले.

3. दंगेखोरांच्या हातात राज्य देणार का?- अमित शहा

दिलीतल्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केजरीवाल यांच्या सरकारवर टीका केली. गेल्या पाच वर्षांमध्ये केजरीवाल सरकारने काम केले नाही. कार्यकाळ संपत आल्यानंतर ते कामाला लागले आहेत. असा आरोपही शहा यांनी केला.

दिल्ली सरकार जनतेची फसवणूक करत आहे. दिल्लीची जनता केजरीवाल सरकारचा जुना हिशेब चुकता करेल असेही अमित शहा म्हणाले. आगामी निवडणूक ही केवळ प्रचारसभेच्या माध्यमातून नाही तर लोकांच्या घराघरांमध्ये जाऊन लढायची आहे, असा सल्लाही त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला. हिंदुस्तान टाइम्स मराठीनं हे वृत्त प्रसिद्ध केलं.

4. 'टाटा समूहप्रमुख म्हणून परतण्यात स्वारस्य नाही'

टाटा उद्योगसमुहात टाटा सन्सचे अध्यक्षपद किंवा टीसीएस, टाटा टेलिसर्विस, टाटा इंडस्ट्रीजमध्ये संचालक होण्यात स्वारस्य़ नसल्याचे सायरस मिस्त्री यांनी स्पष्ट केले आहे.

टाटा समुहाचे अध्यक्षपद आणि इतर कंपन्यांच्या संचालकपदी त्यांची पुन्हा नियुक्ती करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यावरहोणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मिस्त्री यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

कंपनी लवादाने आपल्या बाजूने निर्णय दिला असला तरीही मी कोणत्याही पदासाठी इच्छुक नाही. टाटा समुहाचे हित कुणाही व्यक्तीच्या हितापेक्षा अधिक महत्त्वाचे असून या समुहाच्या भल्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केली आहे.

5. दोन दिवसांमध्ये सोने हजार रुपयांनी महागले

अमेरिका आणि इराकमधील तणावामुळे दोनच दिवसांमध्ये सोन्याच्या आण चांदीच्या दरात हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

सोने 40 हजार 600 रुपये प्रतीतोळा चांदी प्रतिकिलो 48 हजार रुपयांवर पोहोचली आहे. या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे सोने व्यापारी बोलून दाखवत आहेत.

एका डॉलरसाठी 71.76 रुपये मोजावे लागत असल्यामुळेही सोने आणि महाग झाल्याचे सांगितले जात आहे. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)