You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Modi in Kolkata: CAA-NRC आंदोलनांदरम्यान नरेंद्र मोदी-ममता बॅनर्जी यांच्यात भेट
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात जोरदार निदर्शनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय कोलकाता दौऱ्यामुळे वातावरण तापलं आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकात्यात भेट घेतली.
"आमचा नागरिकत्व सुधारणा कायद्याला तसंच राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर यांना ठाम विरोध आहे, असं मी पंतप्रधान मोदींना सांगितलं. CAA आणि NRC मागे घेण्यात यावं, अशी मागणीही मी केली आहे," असं या भेटीनंतर ममता बॅनर्जी म्हणाल्याचं ANI वृत्तसंस्थेने सांगितलंय.
मात्र या भेटीपूर्वीच तृणमूल अध्यक्षांवर टीका झाली होती.
डाव्या पक्षांनी आणि काँग्रेसने मोदींच्या दौऱ्याला विरोध करण्याची घोषणा केली आहे. मात्र मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते सुजन चक्रवर्ती म्हणतात, "डावे पक्ष आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोदींच्या दौऱ्याच्या वेळी मोठ्या प्रमाणात निदर्शनं करतील.
"ममता बॅनर्जींनी अमित शाह आणि मोदी यांच्याशी राजकीय पातळीवर तडजोड केली असून राज्य सरकार त्यांच्या स्वागताची मोठ्या प्रमाणावर तयारी करत आहे," असंही ते म्हणाले. डावे पक्ष, काँग्रेस आणि सामान्य लोक CAA-NRCच्या विरोधात रस्त्यावर उतरतील. "जर तृणमूल काँग्रेसचा CAA आणि NRC ला विरोध असेल तर त्यांनी पंतप्रधानांचं स्वागत करतील."
या भेटीनंतर लगेचच तृणमूल काँग्रेसच्या वतीने एक ट्वीट करण्यात आलं. यात पक्षाचे खासदार डेरेक ओ'ब्रायन म्हणाले, "एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेऊ या... आजची ही भेट केंद्र सरकार आणि बंगाल सरकार यांच्यामधली होती. तृणमूलला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही.
"हे आंदोलन आम्हीच सुरू केलं आणि आता ही एक लोकचळवळ बनली आहे. तुम्ही किती चळवळींमध्ये स्वतः चाललात? किती चळवळींचं नेतृत्व तुम्ही केलं? त्यामुळे आम्हाला शिकवू नका."
पंतप्रधानांचा कार्यक्रम
पंतप्रधान आज एका विशेष विमानाने कोलकात्यात दाखल झाले. CAA-NRCच्या मुद्द्यावरून डावे पक्ष आणि काँग्रेसने मोदींच्या विरोधात निदर्शनं करण्याची घोषणा आधीच केली आहे. डावे पक्ष आणि काँग्रेसचा विरोध लक्षात घेता सुरक्षाव्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. विमानतळ ते राजभवन च्या रस्त्याचं छावणीत रूपांतर झालं आहे, तसंच जिथे पंतप्रधानांचे कार्यक्रम होणार आहेत तिथेही सुरक्षाव्यवस्था कडक आहे.
जुनी करंसी बिल्डिंग, बेल्वेडर हाऊस, मेटकॉफ हाऊस आणि व्हिक्टोरिया मेमोरिअल या स्थळांनाही ते भेट देतील. त्यांच्या डागडुजीचं आणि सजावटीचं काम सांस्कृतिक मंत्रालयाने घेतलं आहे.
मोदी संध्याकाळी पाच वाजता करंसी बिल्डिंगला जातील, त्यानंतर सात वाजता मिलेनियम पार्कमधील आयोजित एका कार्यक्रमात ते सहभागी होतील. त्यानंतर ते बेलूर मठात जातील. तिथून परतल्यानंतर ते राजभवनात रात्री राहतील. नंतर हावडा ब्रिजवर नव्याने सुरू झालेल्या लाईट अँड साऊंडशोचं ते उद्घाटन करतील.
रविवारी पंतप्रधान कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त नेताजी इनडोअर स्टेडिअम मध्ये आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करतील.
ममता बॅनर्जींनी CAA आणि NRC या दोन्ही मुद्यांवर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे या कार्यक्रमात ममता त्यांच्याबरोबर एका मंचावर राहतील किंवा नाही, यावर सध्या अनिश्चितता कायम आहे.
राज्य सरकार किंवा तृणमूल काँग्रेस या कोणत्याही मुद्द्यावर भाष्य करण्यास तयार नाही. पोर्ट ट्रस्टकडून या कार्यक्रमासाठी ममता बॅनर्जींनाही आमंत्रण पाठवण्यात आलं आहे.
निदर्शनांची तयारी
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीशी संबंधित विद्यार्थी संघटना SFI चे प्रदेश सचिव श्रीजन भट्टाचार्य म्हणतात, "नरेंद्र मोदींच्या बंगाल दौऱ्यात मोठ्या प्रमाणात निदर्शनं केली जातील. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अब्दुल मन्नान विचारतात, "जर मोदींच्या भाजपाला आसाममझ्ये येऊ दिलं नाही तर मग पश्चिम बंगालमध्ये पाय ठेवण्याची परवानगी का दिली जात आहे?"
तिथे भाजपचे खासदार आणि नेत्यांचं एक शिष्टमंडळ 12 जानेवारीला सकाळी भेटून राज्याच्या परिस्थितीबद्दल माहिती देतील.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणतात, "राज्य शासनाच्या विरोधामुळे बुधवारी होणारा डाव्या पक्षांचा बंद अयशस्वी झाला. आता शनिवारी सरकार डाव्या पक्षांना अराजकता पसरवण्यापासून थांबवू शकेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल."
पंतप्रधानच्या दौऱ्याला होणारा विरोध पाहता सुरक्षा यंत्रणा कोणताही धोका पत्करायला तयार नाहीत.
कोलकात्याला छावणीचं रूप
संपूर्ण कोलकात्याला सध्या छावणीचं स्वरूप आलं आहे. ज्या ठिकाणी पंतप्रधानांचा कार्यक्रम आहे त्या जागांचा एसपीजी आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी घेतला आहे.
तिथल्या आसपासच्या उंच इमारतींवर कमांडोंना तैनात करण्यात आलं आहे. एक ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की एअरपोर्ट वर एक हेलिकॉप्टर तयार असेल.
सुरक्षा दलांनी गुरुवारपासूनच एअरपोर्ट ते राजभवनाकडे जाणाऱ्या रस्त्याचं सर्वेक्षण केलं. तसंच निदर्शनांना तोंड देण्याची तयारी चालवली आहे.
राज्याच्या गुप्तचर संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळ ते राजभवन या मार्गावरच त्यांना तीन ठिकाणी आंदोलकांना सामोरं जावं लागू शकतं.
याआधी अशी सुरक्षा व्यवस्था मोदींच्या दौऱ्यासाठी कधीही केली नव्हती, असं गुप्तचर विभागाचे एक वरिष्ठ अधिकारी सांगतात. संपूर्ण रस्त्यात बॅरिकेड लावण्यात आले आहेत. एकही व्यक्ती पंतप्रधानांया ताफ्यात येणार नाही, यासाठी तजवीज केली जात आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)