बेळगाव: मराठी नेत्यावरील वक्तव्यानंतर कोल्हापूर-बेळगाव बससेवा बंद

    • Author, स्वाती पाटील
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी कोल्हापूर

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यामधल्या सीमावादानं पुन्हा नव्यानं तोंड वर काढलं आहे. शनिवारपासूनच हा वाद पुन्हा उफाळल्यामुळे आज कोल्हापूर आणि बेळगाव यांच्यामधील बससेवा बंद करण्यात आली आहे.

काल कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना दोन्ही राज्यांच्या सीमेवर गोळ्या घाला असे कथित वक्तव्य केल्यामुळे तणावाला सुरुवात झाली. त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून कोल्हापुरात शिवसेनेने आंदोलन केले तसेच कागलमध्ये भीमाशंकर पाटील यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच कर्नाटकाचा ध्वजही जाळण्यात आला.

त्यानंतर याचे पडसाद बेळगाव शहरात उमटले आणि कन्नड संघटनांनी मराठी फलक असलेल्या दुकानांवर दगडफेक केली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. या तणावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून कर्नाटकला जाणाऱ्या कर्नाटक राज्य परिवहनाच्या बसगाड्या थांबवण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमा प्रकरणावरील सरकारचे प्रयत्न करण्यासाठी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांची नेमणूक केली आहे. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारने कर्नाटकची बाजू घेतल्याचा आरोप केला.

कन्नड सिनेमा पाडला बंद

कोल्हापुरामध्ये अप्सरा थिएटरमध्ये सुरू असलेला 'अवणे श्रीमनारायण' या कन्नड चित्रपटाचा खेळ युवासैनिकांनी बंद पाडला. यामध्ये हर्षल सुर्वे, मंजित माने, बाजीराव पाटील, शशी बिडकर, तानाजी आंग्रे, कृष्णात पवार, जयराम पवार, चेतन अष्टेकर, शेखर बारटक्के, सनराज शिंदे यांनी सहभाग घेतला.

'कर्नाटक नवनिर्माण सेनेवर बंदी घाला'

याबाबत बोलताना शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "बेळगाव सीमावाद हा अनेक वर्षांपासून प्रलंबित न्यायालयीन लढा आहे पण अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती मराठी माणसांना गोळ्या घालण्याची भाषा करत असेल तर त्यावर कर्नाटक शासनाने कारवाई करणं गरजेचं आहे.

मराठी माणसाला संरक्षण देण्याची, अस्मिता जपण्याची गरज आहे. कन्नड भाषिक महाराष्ट्रात स्वतःला सुरक्षित समजतो याउलट गेली 60 वर्ष सीमावासीय महाराष्ट्रात परत येण्याची इच्छा का बाळगतो याच चिंतन कर्नाटक सरकारने करायला हवे. मुख्यमंत्र्यांचा अवमान करणाऱ्या व्यक्तीला अटक व्हायला हवी तसंच कर्नाटक नवनिर्माण सेना ही विकृत सेना आहे. भाषिक तेढ निर्माण करणाऱ्या संघटनेवर बंदी घालायला हवी. सीमावादवर केवळ न्यायालयात भाष्य होणं आवश्यक आहे. "

'प्रसिद्धीसाठीच अशी वक्तव्यं'

कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या अध्यक्ष भीमाशंकर पाटील याला बेळगाव इथं कुणी ओळखत नाही. केवळ प्रसिद्धीसाठी त्याच्याकडून अशी वक्तव्यं केली जात आहेत. अशा वक्तव्यामुळे बेळगावात वातावरण दूषित करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप बेळगावच्या माजी महापौर सरिता पाटील यांनी केला.

त्या म्हणाल्या, "कनसे संघटनेकडून मराठी माणसाला सीमेवर गोळ्या घालू असं केलेलं वक्तव्य चुकीचं आहे. मात्र महाराष्ट्र एकीकरण समिती अशा लोकांना घाबरत नाही. सीमालढ्यात आमच्या अनेक बांधवांनी हौतात्म्य पत्करले आहे. पण गेली 60 वर्ष सुरू असलेला हा लढा आता निर्णायक वळणावर आहे. त्यात महाराष्ट्र सरकारने आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमावासीयांच्या पाठीशी उभे राहिले असल्याने कर्नाटकमध्ये पोटशूळ उठला आहे. त्यातूनच अशी वक्तव्यं केली जात आहेत. महापौर असताना माझ्यावर किरकोळ कारणासाठी राजद्रोहाचा गुन्हा टाकला होता मात्र अशा संघटनावर कारवाई तर होत नाही च उलट त्या नेत्याला पोलीस संरक्षण देण्यात येत आहे हे चुकीचं आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)