शिवसेनाः भाजपची सत्ता गेल्यामुळे महाराष्ट्राच्या मनावरील ओझंही उतरलं #5मोठ्या बातम्या

आजचे पेपर आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.

1. गेली 30 वर्षं आम्ही हे ओझं वाहत होतो: शिवसेना

शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून भाजपावर पुन्हा एकदा टीका करण्यात आली आहे. "ओझे उतरले" नावाच्या या अग्रलेखामध्ये शिवसेना भाजपाबरोबर येईल ही अपेक्षा सोडून द्यावी असा सल्लाही या अग्रलेखातून दिला आहे.

या2019मध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मायबापांनी शब्द पाळला नाही. महाराष्ट्रात त्यांच्यावर राजकीय बेकार होण्याची वेळ आली. आता तर शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून दिल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

आपल्यात आता कोणतेही नाते उरलेले नाही. नात्यांचे तसेही ओझे होतेच. तेही उतरले असे 'सामनाच्या अग्रलेखात' म्हटले आहे.

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे हा प्रयोग गेली 30 वर्षं चालला होता. आम्ही आजही वाटाघाटीस तयार आहोत अशी डबडी वाजवणे बंद केले पाहिजे, अशी टीका सामनाने अग्रलेखातून केली आहे.

2. 'बाळासाहेबांचे हिंदुत्व गुंडाळून शिवसेनेचे घूमजाव'

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला, त्यापायी मतदानाचा अधिकारही गमावला, मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या राजकारणासाठी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला काळिमा फासला असून, हिंदुत्व खोटे ठरवले अशी खरमरीत टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

घूमजाव म्हणजे उद्धव ठाकरे अशी आता व्याख्या झाली असून, देव,देश आणि धर्म यासाठी भाजपबरोबर लोकसभेलाही युती करणाऱ्या शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करून मतदारांचा विश्वासघात केला असा टोला शेलार यांनी लगावला.

बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी प्रदीर्घ लढा दिला. मतदानाचा अधिकार गमावण्याची वेळ आली तेव्हा माझे एक मत गेले तरी चालेल पण करोडो हिंदू बांधव भरभरून मतं देतील अशी भूमिका घेतली. हिंदुत्वाच्या आधारे शिवसेनाप्रमुखांनी राजकारण करून यश मिळवलं. त्या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी घूमजाव करून खोटं ठरवलं आहे.

3. अर्थव्यवस्थेची लक्ष्यपूर्ती होणारच-पंतप्रधान नरेंद्र मोदी

डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेवरून विरोधी पक्ष टीकेची झोड उठवत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला पाच लाख कोटी अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. गेल्या पाच वर्षात देश मजबूत झाला असून हे लक्ष्य साध्य करता येईल असं ते म्हणाले.

असोसिएशन ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाच्या शताब्दी पूर्ततेनिमित्त विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 'महाराष्ट्र टाईम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

देशासाठी काम करताना बराच रोष पत्करावा लागतो. अनेकांची नाराजी सहन करावी लागते. अनेक आरोपांना सामोरं जावं लागतं. असे अर्थव्यवस्था, जीएसटी आणि उद्योगस्नेही वातावरणनिर्मितीच्या बाबतीत बोलताना पंतप्रधान म्हणाले.

4. अजित पवार हे आमचे होणारे उपमुख्यमंत्री-संजय राऊत

सिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून क्लिन चिट मिळाली असतानाच शिवसेनेचे प्रमुख नेते संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याबाबत महत्वपूर्ण व सूचक वक्तव्य केलं आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात एसीबीकडून क्लिन चिट मिळाल्याचा आनंद आहे. ते आमचे होणारे उपमुख्यमंत्री आहेत असं राऊत म्हणाले.

23 किंवा 24 डिसेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता बळावली आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

5. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला असताना शेअर बाजारात तेजी कशी?- अरविंद सुब्रमण्यम

देशाची अर्थव्यवस्था सातत्याने घसरत आहे. देशभरात महागाई वाढू लागली असताना शेअर बाजारात उत्साह कसा काय? हे मोठे कोडे माझ्यासमोर आहे असे उद्गार माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी काढले. 'नेटवर्क 18'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

अरविंद सुब्रमण्यम 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात आर्थिक सल्लागारपदी होते. इंडियन इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट अहमदाबाद इथल्या सेंटर फॉर बिहेव्हिअर सायन्स इन फायनॅन्सच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

या केंद्रात होणारं संशोधन मला पडलेलं कोडं सोडवण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या अभ्यासात मला देशाची अर्थव्यवस्था का घसरत आहे आणि शेअर बाजार कसा वरती जात आहे या शंकेचं निरसन होईल.

नोकऱ्यांवर परिणाम झाला आहे. बँकेत पैसे ठेऊनही त्याचं व्याज मिळत नाही. त्यामुळे पैसे गुंतवावे तरी कसे असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय मात्र अजूनही काही महिने अत्यंत अडचणीचे असल्याचं सुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)