You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
श्रीराम लागू: 'परमेश्वराला रिटायर करा' असं त्यांनी का म्हटलं होतं?
- Author, हमीद दाभोलकर
- Role, अंनिस कार्यकर्ते
अभिनयाप्रमाणेच मांडलेल्या विचारांसाठी दखल घ्यावी, असे अगदी मोजकेच अभिनेते महाराष्ट्रात आणि देशात पाहायला मिळतील. डॉ. श्रीराम लागूंचे स्थान ह्या यादीत नक्कीच खूप वर असेल.
डॉ. श्रीराम लागूंच्या जाण्याने सामना, पिंजरा सिंहासन, नटसम्राटमधल्या त्यांच्या भूमिकांप्रमाणेच 'परमेश्वराला रिटायर करा' ह्या त्यांच्या भूमिकेचीही अनेकांना आठवण झाली असेल.
कुठल्याही काळामध्ये आणि कुठल्याही देशात जी भूमिका जाहीरपणे घेण्यापूर्वी पट्टीचे तत्त्वज्ञ आणि विचारवंत देखील शंभर वेळा विचार करतील ती भूमिका भारतासारख्या देव आणि धर्म ह्या संकल्पनांच्या विषयी अत्यंत संवेदनशील असलेल्या समाजात घेण्याचे धाडस डॉ. लागूंनी दाखवले.
ते इथेच थांबले नाहीत तर आयुष्यभर सर्व टीका, टक्केटोणपे खाऊन ती भूमिका लढवली. नटाला 'फिलोसॉफर, अॅथलिट' म्हणणाऱ्या डॉक्टर लागूंच्या जीवन धारणेशी ते एकदम सुसंगतच म्हणायला हवे.
माझे वडील डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा डॉ श्रीराम लागूंशी जवळून संबध आल्याने त्यांचे हे वैभवी बुद्धीप्रामाण्य मला जवळून बघयला मिळाले. आज त्यांच्या जाण्याने त्यांच्या अनेक गोष्टी आठवत आहेत.
कोणताही बडेजाव न मिरवणारा अभिनेता
मी साधारण दहा वर्षांच्या आसपास असतानाची गोष्ट असेल. त्यावेळी आम्ही पेठेतील आमच्या जुन्या घरात राहत होतो. आमच्या घराच्या भोवती अचानक माणसांची मोठी झुंबड उडाली. श्रीराम लागू आणि निळू फुले हे मराठी मनावर गारुड घालणारे दोन दिग्गज नट एकाच वेळी साताऱ्यासारख्या गावात गाडीतून उतरताना दिसले तर आणखी काय होणार?
पण त्यांना जवळून बघितल्यावर ह्यांच्यात सिनेमातील नटासारखे काहीच नाही म्हणून झालेला माझा अपेक्षाभंग देखील मला स्पष्ट आठवतो. साधा लेंगा-झब्बा हा पेहराव, नटपणाचा कोणताही बडेजाव नाही आणि बाकीच्या कार्यकर्त्यांसारखं वागणं, हा डॉ. लागूंचा स्वभाव होता. त्यांच्या प्रगल्भ विचारांच्या इतकंच आज मला त्यांच्या साधेपणाचंही अप्रूप वाटतं.
आयुष्याच्या एका क्षेत्रात आपण यशस्वी झालो म्हणजे जगात आता मिळवायचे काहीच शिल्लक राहिले नाही, असं वाटणारे लोक आजूबाजूला बघताना आज राहून राहून मनात येतंय, की किती साधी माणसं होती ही! प्रसिद्धी, मान्यता त्यांना आतमधून अजिबात चिकटलेली नाही आणि म्हणूनच महाराष्ट्रातील तमाम जनतेला हे लोक आपले वाटले.
आपल्या कामातून समाजमान्यता मिळवणे ही एक गोष्ट झाली, पण ती आपल्या विचाराला पटणाऱ्या कामाच्या पाठीशी लोकापवादाचा विचार न करता उभी करण्यासाठी त्या मूल्यांवर जी अविचल निष्ठा लागते, ती डॉ. लागूंमध्ये पुरेपूर होती. त्याशिवाय अशा संवेदनशील विषयावर एका प्रसिद्ध नटानं सातत्यानं तीन दशकं समाजाशी बोलत राहणं ही सोपी गोष्ट नव्हती.
अंनिसच्या कामात महत्त्वाचं योगदान
ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाच्या अगदी सुरुवातीपासून नरेंद्र दाभोलकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. कित्येक वर्षे त्यांच्या प्रत्येक महिन्यातील दोन दिवस हे अंनिसच्या कामासाठी राखीव ठेवलेले असत. डॉक्टर लागूंच्या गाडीमधून त्यांनी आणि नरेंद्र दाभोलकरांनी शब्दश: अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला.
केवळ प्रमुख जिल्हेच नाही तर अनेक तालुक्यांच्या ठिकाणी देखील त्यांनी कार्यक्रम केले. कार्यक्रमाचे नाव होते 'विवेक जागराचा वाद- संवाद.' कार्यक्रमात डॉक्टर लागू 'देव हीच मूळ अंधश्रद्धा आहे आणि ती नष्ट केल्यास बाकीच्या सर्व अंधश्रद्धा आपोआप गळून पडतील,' अशी कठोर बुद्धिवादी मांडणी करायचे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर महाराष्ट्र अंनिसची देव आणि धर्म ह्या विषयीची तटस्थ कल्पना मांडायचे. त्या भूमिकेचा गाभा असा असायचा, की देव आणि धर्म मानणे अथवा न मानणे हा प्रत्येक व्यक्तीचा घटनात्मक अधिकार आहे. पण आपल्या देवा-धर्माच्या संकल्पनेची आपण चिकित्सा केली पाहिजे आणि जिथे देवाच्या आणि धर्माच्या नावावर शोषण होत असेल, तिथे त्याच्या विरोधात उभे राहिले पाहिजे.
डॉ. लागू कार्यक्रमाला असल्याने स्वाभाविकच गर्दी व्हायची. आपले संपूर्ण स्टारडम बाजूला ठेवून समाजाला एका महत्त्वाच्या बौद्धिक प्रश्नावर खेचून घेण्याची डॉ. लागूंची क्षमता अफाटच म्हटली पाहिजे. त्यासाठी ते प्रसंगी अत्यंत कठोर देखील होत असत.
एका अशाच कार्यक्रमाच्या वेळी डॉ. लागू आले आहेत म्हणून संयोजकांनी ठरवलेला 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल' ह्या लावणीवरचा नाच डॉ. लागूंनी कसा थांबवला होता हे मी बाबांच्या तोंडून ऐकले आहे. कमालीची कर्तव्य कठोरता आणि वेळेला बांधील असणे या कार्यकर्त्याला अत्यंत आवश्यक असलेल्या गुणांचा डॉ लागू वस्तुपाठ होते.
अंनिसचा विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून त्यांची तळमळ अत्यंत आंतरिक होती. त्यांच्या विषयी बोलताना बाबा अनेक वेळा, 'तुका म्हणे झरा, आहे मूळचाच खरा' हा अभंग सांगायचे.
बुद्धिप्रामाण्याचा वस्तुपाठ
अंनिस, साधना, सामाजिक कृतज्ञता निधी कुठल्याही सामाजिक कार्यक्रमाला जवळजवळ कधीच त्यांनी नकार दिला नाही. "नरेंद्र, अरे आम्ही तुझे वेठबिगार आहोत का?'' अशी काहीशी प्रेमळ तक्रार मात्र ते बाबांच्याकडे करायचे. कार्यक्रमाला मात्र आवर्जून यायचे.
नरेंद्र दाभोलकरांना ज्या पद्धतीने मृत्यू आला त्याची त्यांना खोलवर बोच लागली होती. ती त्यांच्या बोलण्यातून गेल्या सहा वर्षांत दिसून येत असे. विस्मरणाचे दुखणे बळावत असून देखील अनेक वेळा ते नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी पकडले जात नाही ह्या विषयीच्या निषेधात थोडावेळ का होईना येऊन सहभागी होत असत.
त्यांचा मुलगा तन्वीर ह्याचा जेव्हा अगदी तरुण वयात मृत्यू झाला, तेव्हा देखील त्यांनी आपल्या बुद्धिप्रामाण्याची कास सोडली नाही.
युवाल नोवा हरारी हा आजच्या जगाचा एक महत्त्वाचा भाष्यकार. त्याच्या एका पुस्तकाचे नाव 'होमो देऊस.' डॉ. लागू आपल्यात नाहीत तेव्हा मला हे पुस्तक सतत आठवत आहे. होमो म्हणजे माणूस आणि देऊस म्हणजे लॅटिन भाषेत देव.
'होमो सेपियन' म्हणजे आपण सगळ्यांच्या मानवी उत्क्रांतीतील पुढच्या टप्प्याला हरारी 'होमो देऊस' नाव देतो. आपल्या मानव प्राणी म्हणून असलेल्या मर्यादांच्या पुढे जाऊ शकणारा तो 'होमो देऊस'. हा 'होमो देऊस' कसा असू शकतो आणि कसा असावा? ह्याची झलक आपल्याला दाखवणारा 'नटसम्राट' आता आपल्यात नाही. पण त्याने दिलेला शोधकपणाचा वसा हाच आपल्या अधिक चांगले 'होमो सेपियन' बनण्याच्या वाटेतील सर्वांत जवळचा मित्र बनून राहणार आहे.
(लेखातील विचार लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.)
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)